अल्जेरियाचे विमान कोसळून २५७ ठार
12 Apr 2018►उड्डाण घेतल्यानंतर लगेच कोसळले,
वृत्तसंस्था
बोयुफारीक, ११ एप्रिल –
विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अल्जेरियाचे लष्करी विमान लगेच एका शेतात आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत २५७ सैनिक मृत्युमुखी पडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अल्जेरियन सरकारने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सूत्रांनुसार, लष्करी सैनिक, अधिकारी यांचा समावेश असलेल्या विमानाने स्थानिक वेळेनुसार आज सकाळी आठ वाजता बोयुफारीक विमानतळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर लगेच ते शेतामध्ये कोसळले. यानंतर विमानाने पेट घेतला. परिसरात आगीच्या ज्वाळा, काळा धूर मोठ्या परिसरात पसरला. विमानात शस्त्रसाठा असल्याने आगीत आणखी भर पडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. मलब्यातून अनेक शव काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. १० अग्निशमन दलासह १४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, शवांचा शोध घेण्यात येत आहे. अपघाताचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, अल्जेरियातील सत्ताधारी एफएलएन पार्टीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात पश्चिम सहाराच्या पोलीसारियो स्वतंत्रता आंदोलनाचे २६ सदस्य होते. पक्षाचे सरचिटणीस डीजामेल यांनी खासगी एन्नहार वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिली. सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीचे मुख्य प्रवक्ते मोहम्मद अचूर यांनी सांगितले की, या अपघातात १०० पेक्षा अधिक सैनिकांचा मृत्यू झाला असून, अजूनही नक्की आकडा सांगता येणार नाही.
बोयुफारीक उत्तर अल्जेरियात असून भूमध्य समुद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये अल्जेरियन वायुसेनेचे लॉकहीड सी-१३० हरक्युलस विमान पूर्व अल्जेरियाच्या पर्वतरांगांमध्ये कोसळले होते. त्या दुर्घटनेत ७७ जणांचा मृत्यू झाला होता.
रशियन हेलिकॉप्टर कोसळले, ६ ठार
व्लादिवोस्तोक – वोस्तोक एअरलाईन्सचे हेलिकॉप्टर खाबारोव्स्क शहरात आज सकाळी ११.३० वाजता अपघातग्रस्त झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
वृत्तसंस्थानुसार, एमआई-८ हेलिकॉप्टर प्रवाशी आणि कार्गो फ्लाईटची सेवा प्रदान करते.आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ते खाबारोव्स्क शहरावरून उडत असताना ते कोसळले. सरकारी सूत्रानुसार, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. अधिकार्यांनुसार, हेलिकॉप्टरच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी केल्यानंतर अपघाताच्या कारणांबद्दल सांगता येईल.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry