इंडोनेशियात भूकंप, त्सुनामीचा कहर ४०० ठार
30 Sep 2018►अनेक इमारती उद्ध्वस्त, हजारांवर जखमी,
पालू, २९ सप्टेंबर –
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी ७.५ इतक्या तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर काही वेळातच त्सुनामीच्या लाटाही उफाळून आल्या. यात आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारांवर लोक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या हादर्याने अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
पालू या किनारपट्टीच्या शहराला त्सुनामीचा जोरदार फटका बसला. या त्सुनामीत बहुतांश नागरिकांचा मृत्यू झाला. त्सुनामीच्या लाटा इतक्या उंच होत्या की, साडेतीन लाख लोकसंख्या असलेले हे शहर काही वेळातच जलमय झाले. अनेक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र होते. शुक्रवारी सायंकाळी बीच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हजारो लोक जमा झाले होते. त्सुनामीच्या उफाळून आलेल्या लाटांनी परत जाताना अनेकांना समुद्रात ओढले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा कितीतरी जास्त असू शकतो, अशी भीती राष्ट्रीय आपात् संस्थेच्या अधिकार्यांनी दिली.
शेकडो लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही, हजारो जखमींना विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बिछाण्यांची संख्या कमी असल्याने अनेकांवर रुग्णालयाच्या बाहेर खुल्या जागेतच उपचार केले जात आहेत. त्सुनामीच्या सुमारे सहा ते सात फूट उंच लाटा उसळल्या आणि पालू शहरात घुसल्या. अनेक इमारती व लहान घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच्या ढिगार्याखाली अनेक जण दबले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry