तोयबा, तालिबान अमेरिकेसाठी घातकच
6 Oct 2018►ट्रम्प प्रशासनाची स्पष्ट भूमिका,
वॉशिंग्टन, ५ ऑक्टोबर –
पाकिस्तानच्या भूमीत राजेरोसपणे वावरत असलेली लष्कर-ए-तोयबा आणि तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दोन्ह दहशतवादी संघटना अमेरिकेसाठी घातक असल्याची स्पष्ट भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मांडली आहे.
इसिस आणि अल् कायदा या दोन प्रमुख गटांव्यतिरिक्त पाकच्या भूमीत सक्रिय असलेल्या सुमारे १० ते १२ दहशतवादी संघटना अमेरिकन हितावर आघात करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. दक्षिण आशियात जिथे जिथे अमेरिकन नागरिक राहतात, त्यांना ठार मारण्यावरच या संघटनांचा भर असतो, असे व्हाईट हाऊसने गुरुवारी जारी केलेल्या दहशतवादविरोधी पत्रकात म्हटले आहे.
तोयबा, तालिबान आणि बोको हराम यासारख्या संघटना स्थानिक सरकार अस्थिर करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती तयार करून, त्यानुसार हल्ले करीत असतात. यातील बहुतांश संघटनांचे इसिस आणि अल् कायदासोबतही संबंध आहेत. त्यांच्या आदेशावरूनही या संघटना आपल्या कारवाया करीत असतात, असेही यात नमूद आहे.
बब्बर खालसाचेही नाव
व्हाईट हाऊसच्या या पत्रकात अमेरिकन हितावर आघात करणार्या काही फुटीरतावादी संघटनांचाही उल्लेख असून, यात शीख संघटना बब्बर खालसाचे नाव आघाडीवर आहे. भारतात शिखांचे वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी अस्तित्वात आलेली बब्बर खालसा इंटरनॅशनल ही संघटना सध्या पाकच्या आश्रयात आहे. भारतात विशेषत: पंजाबसह इतर काही राज्यांमध्ये या संघटनेने अनेक मोठे हल्ले केले आहेत, असेही यात स्पष्टपणे नमूद आहे.
दहशतवादी व त्यांच्या पाठीराख्यांचा पाडाव करणारच
अमेरिकेच्या मुळावर उठलेल्या दहशतवादी संघटना, त्यांचे आश्रयदाते आणि त्यांच्या पाठीराख्यांचा संपूर्ण पाडाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण शक्तिनिशी आम्ही ही लढाई लढणार आहोत, असा स्पष्ट निर्धार अमेरिकेने केला आहे.
व्हाईट हाऊसने दहशतवादविरोधी लढ्याची नवी रणनीती गुरुवारी जाहीर केली. यात, पाकिस्तानने तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यासारख्या गटांवर तातडीने आवर घालावा, अन्यथा अमेरिकेला बळाचा वापर करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय हित आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वच उपलब्ध साधनांचा वापर करणार आहोत. शत्रूंचा संपूर्ण पाडाव, हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नवी रणनीती जाहीर करताना पत्रपरिषदेत सांगितले.
दहशतवादात आम्ही कुठलाही फरक करणार नाही. सर्वच प्रकारचा दहशतवाद घातकच आहे. त्यांची गय तर होणार नाही, शिवाय त्यांच्या पाठीराख्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.

Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry