पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी
16 Sep 2018वृत्तसंस्था
मुंबई, १५ सप्टेंबर –
भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी वापरावी, अशी इच्छा पाकिस्तानने वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानकडे व्यक्त केली आहे, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत जॉन बास यांनी दिली.
भारतातून अफगाणिस्तानमध्ये जाणार्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी पाकिस्तानने कित्येक वर्षांपासून मज्जाव केला असताना, या देशाने व्यक्त केलेली इच्छा महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अफगाणिस्तानमधून हवाई मार्गाद्वारे भारतात होणारी निर्यात वाढली आहे. तसेच मागील दोन महिन्यात अफगाणिस्तान व उझबेकिस्तानचे आर्थिक संंबंध मजबूत झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने भारत-अफगाणिस्तान व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी वापरू देण्याची इच्छा अफगाणिस्तानकडे व्यक्त केली आहे, असे बास यांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या विकासात भर घालण्यासाठी भारतीय कंपन्या तेथे गुंतवणूक करीत आहेत, असे मुंबई येथे होत असलेल्या भारत-अफगाणिस्तान व्यापार मेळावा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर जॉन बास यांनी सांगितले. मागील वर्षी झालेल्या मेळाव्यात भारताने २ कोटी ७० लाख डॉलर्सची गुंतवणूक अफगाणिस्तानमध्ये केली होती. या व्यतिरिक्त दूरदर्शीपणा दर्शवित भारतीय कंपन्यांनी २० कोटी डॉलर्सची केलेली गुंतवणूक उपयुक्त ठरत आहे.
दीर्घकालीन फायद्यासाठी अफगाणिस्तानसोबत राजकीय तडजोड करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या जी स्थिती आहे ती कायम ठेवण्यावर आम्ही भर दिला, तर दोन्ही देशांकडून व्यापारात वाढ होणे, अफगाणमार्गे मध्य आणि दक्षिण आशियाचा संपर्क वाढवणे यासारख्या चांगल्या संधींपासून पाकिस्तानला मुकावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो आणि संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी मागील आठवड्यात दिलेल्या भारत भेटीदरम्यान, इराणवरील प्रतिबंधांचा फटका छाबार बंदराला बसत असल्याचे भारताने अमेरिकेला सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली. या भेटीमध्ये भारताने छाबार बंदरामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होऊन अफगाणिस्तानचा दक्षिण आशियासोबत संपर्क वाढेल, असे अमेरिकेला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही घातलेल्या प्रतिबंधांबाबत फेरमूल्यांकन करीत असून, प्रक्रिया करून इराणवरील प्रतिबंधांमधील तरतुदींमध्ये फेरफार करण्याचा विचार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry