माझे हेलिकॉप्टर पाकच्याच हद्दीत होते
2 Oct 2018इस्लामाबाद, १ ऑक्टोबर –
रविवारी ज्या हेलिकॉप्टरमधून मी प्रवास करीत होते, ते नियंत्रण रेषेच्या अतिशय जवळ असले, तरी पाकिस्तानच्याच हद्दीत होते. आम्ही हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही आणि तसेही ते लष्करी हेलिकॉप्टर नसल्याने त्याच्या उड्डाणाविषयी भारतीय अधिकार्यांना सूचना देण्याची काहीच आवश्यकता नव्हती, अशी मुजोरी गुलाम काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर यांनी केली.
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हैदर यांच्या हेलिकॉप्टरने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषा ओलांडून हवाई हद्दीचे उल्लंघन केले असल्याचा स्पष्ट व्हिडीओ व्हायरल झाला होता. तथापि, भारतीय जवानांनी गोळीबार केल्यानंतर ते माघारी फिरले होते. गुलपूर सेक्टरमध्ये हे हेलिकॉप्टर आले होते आणि घिरट्या घातल्यानंतर ते परत फिरले होते, असा दावा भारतीय अधिकार्यांनी केला होता.
यावर सफाई देताना हैदर म्हणाले की, मी माझ्या दोन मंत्र्यांसह या हेलिकॉप्टरमधून उड्डाण घेतले होते. माझ्या एका मंत्र्याच्या भावाचे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मी जात होतो. अब्बासपूरहून जात असताना भारतीय लष्करी जवानांनी गोळीबार केला. सुदैवाने आम्ही बचावलो आणि हेलिकॉप्टरचेही नुकसान झाले नाही.
आमचे हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेच्या अतिशय जवळ होते, ही सत्यता आहे, पण आम्ही हवाई हद्द ओलांडली नव्हती. तसेही, ते लष्करी हेलिकॉप्टर नसल्याने भारतीय अधिकार्यांना त्याची सूचना देण्याची काहीच गरज नव्हती, असे ते म्हणाले.

Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry