अश्‍वत्थामा

अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष गोपाळ देशपांडे |

ashwathama‘‘अश्‍वत्थामाबलिर्व्यासोहनुमंश्‍चविभीषण:
कृप:परशुरामश्‍च सप्तै ते चिरजीवन:’’
म्हणजे; अश्‍वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सात विकार चिरंजीव आहेत. पैकी, अश्‍वत्थामा हा मत्सर-द्वेष-सूड यांचा खलिफा आहे. तो शंकराचा म्हणजे रुद्राचा अवतार होता. ‘अनावर संतप्तां’साठी ‘रुद्रावतार’ हा शब्द अश्‍वत्थाम्यामुळेच प्रचलनात आला!
भीष्माचे पतन झाल्यावर अश्‍वत्थाम्याचा बाप द्रोणाचार्य हा कौरवांचा सरसेनापती झाला. ‘‘युधिष्ठिराला धरून तुझ्यापुढे आणून उभा करतो.’’ ही द्रोणाचार्याची वल्गना नव्हती. पण, त्याजपर्यंत युधिष्ठिराला जाऊच दिले जात नव्हते. कृष्ण म्हणाला, ‘‘युधिष्ठिराने जाऊन सांगावे, ‘अश्‍वत्थामा मेला’; की सत्यवचनी युधिष्ठिरावर विश्‍वास ठेवून गुरुवर्य शस्त्रत्याग करून शोक करू लागतील.’’ युधिष्ठिर खोटे कसे बोलणार. तर, भीमाने अश्‍वत्थामा नावाचा हत्ती मारला. रणांगणात युधिष्ठिर द्रोणापुढे गेला. द्रोण त्याला धरू गेला तर त्याने अशुभ समाचार सांगितला, ‘‘अश्‍वत्थामा मारला गेला.’’
द्रोणाचार्यांना माहीत होते की, कोणतेही शस्त्र अश्‍वत्थाम्यास क्षती करू शकत नाही. आपला पुत्र मरणे शक्य नाही. पण, युधिष्ठिर सत्यवचनी आहे. द्रोणाचार्य संभ्रमित झाले, ‘‘कोण? मनुष्य की हत्ती?’’
‘‘नरो वा कुंजरो वा’’
-आपल्यास दु:ख होईल म्हणून, युधिष्ठिर खरेखोटे बोलायचे टाळत आहे, असे त्यांना वाटले! आपला पुत्र मरण पावला म्हणून ते शस्त्रास्त्रे टाकून शोक करू लागले. अशा नि:शस्त्र मनुष्याला कोणीही मारण्याची शक्यता नव्हती. अर्जुनाचा साळा धृष्टद्युम्न हा पांडवांचा सरसेनापती होता! त्याने, आपल्या बापाचा सूड म्हणून, शोकनिमग्न द्रोणाचार्यांचा, त्यांच्या रथावर चढून, शिरच्छेद केला.
तेव्हापासून अश्‍वत्थाम्याने रुद्रावतार धारण केला. धृष्टद्युम्नाला मारेपावेतो तो स्वस्थ बसणार नव्हता. महारथी अश्‍वत्थामा युद्धात महापराक्रमी बुद्धिमान धृष्टद्युम्नाचा वध करू शकला नाही. तेव्हा युद्ध संपून, पांडवांचा विजय झाल्यावर, पांडवांच्या शिबिरात शिरून निद्रिस्त धृष्टद्युम्नाचा अश्‍वत्थाम्याने गळा आवळला. धृष्टद्युम्न त्याला विनंती करीत राहिला की, तू माझा शिरच्छेद करून बदला घे; पण, नाही! अर्धवट झोपेत असलेल्या पांडवांच्या सरसेनापतीला, अश्‍वत्थाम्याने हाल हाल करून मारले.
रुद्रावतार धारण करणे म्हणजे नुसता थयथयाट करणे नव्हे!
पराकोटीचा डास धरून, बुद्धी वापरून मारणे!
त्या रात्री, अश्‍वत्थाम्याने पांडवांची छावणी कापून काढली. अश्‍वत्थामा कृष्णनीतीनेच वागला म्हणतात. सतराव्या शतकात, आदिलशहा व जहांगीर यांचे, दोन लाखांचे सैन्य झोपेत असताना, शहाजी राजांनी गारद केले. तीही कृष्णनीती आहे. तथापि, स्वातंत्र्य आणि चांगलेपणा यांसाठी जे असेल ते सत्कारास योग्य असून जे अभद्रपणासाठी असते ते निंदनीयच होय.
बापाचा सूड म्हणून, अश्‍वत्थाम्याने नारायणास्त्राचा प्रयोग पांडवांवर केला. पण, कृष्णालाही नारायणास्त्र चालविता येत असे. त्याच्या निरासाची युक्तीही त्याला माहीत होती. त्याने सांगितले, ‘‘जमिनीवर झोपा. हा बॉम्ब उसळून फुटतो. निजलेल्यावर असर होत नाही.’’ -तरी एक अक्षोहिणी पांडवसैन्य मारले गेले!
महाभारतीय युद्धात, कौरवांकडून लढणारे तर सर्वच मारले गेले होते, पण याच अपरात्री अश्‍वत्थाम्याने, आपला मामा कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या साह्याने, पांडवांकडून लढणार्‍या सर्वांना मारून टाकले. एकूण अठरा अक्षोहिणी सैन्याचा ‘नरसंहार’ या महायुद्धात घडला. कौरवांकडील तिघे आणि पाच पांडव, सहावा कृष्ण. सातवा सात्यकी अशी दहा माणसे जिवंत राहिली.
‘‘अश्‍वत्थाम्यास कोणीच हरवू शकत नाही. त्याच्याशी युद्ध करू नका.’’ असा सल्ला कृष्णाने पांडवांना दिला. पूर्वी, नीच दुर्योधनाकडे वस्ताद आजोबा भीष्म यांनी अश्‍वत्थाम्याला इंट्रोड्यूस करून देताना म्हटले होते, ‘‘याच्याशी पंगा घेऊ शकेल, असा जगात कोणीच नाही. याला तू आपल्या बाजूला दाखल करून घे!’’
पांडवांना कळले की, अश्‍वत्थामा व्यास मुनींच्या आश्रमात दडून बसला आहे. वास्तविक, अश्‍वत्थाम्याने घाबरायचे काही कारणच नव्हते. तो अमरच आहे. पांडव येताच त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. काय वाट्टेल ते झाले, तरी या प्रयोगाने शत्रुपक्ष पूर्ण संपवू! पण, दुसर्‍या बाजूकडेही ऍटमबॉम्ब असू शकतो, हे समजण्याची अक्कल पाहिजेे! दोन्ही हायड्रोजन बॉंब्ज एकमेकांवर आदळले तर संपूर्ण पृथ्वी ‘बेचिराग’ होईल, हे ‘किम’ला किंवा पाकिस्तानच्या टेररिस्ट संरक्षणमंत्र्याला कळत नाही.
द्रोणाचार्य हा अवडंबर माजवणारा गुरुघंटाल असून आपल्याला ब्रह्मास्त्र शिकवणार नाही, हे समजण्याएवढी बुद्धी अर्जुनाला होती. म्हणून, पक्षपाती द्रोणाचार्य जेव्हा चोरून अश्‍वत्थाम्याला ब्रह्मास्त्र शिकवीत तेव्हा अर्जुनही चोरून ते शिकून घेत असे. सबब, अर्जुनालाही ब्रह्मास्त्र येत होते. त्यानेही ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला.
कृष्ण वेडपट नव्हता. त्याने हा हाहाकार टाळण्याची विनंती दोघांनाही केली. अर्जुनाने त्वरित ब्रह्मास्त्र मागे घेतले. पण, अश्‍वत्थाम्याने लबाडी केली. अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटातल्या गर्भावर त्याने दूषितीकरणाचे अस्त्र चालवले. परीक्षित राजा तिथेच मेला असता, तर कौरवांप्रमाणे पांडवांचाही निर्वंश झाला असता. संतप्त कृष्णाने उत्तरेचा गर्भ तर वाचवलाच, पण, भ्रूणहत्येचा प्रयत्न करणारा रुद्रावतारी टेररिस्ट अश्‍वत्थामा यास शाप दिला. आधी त्याने अश्‍वत्थाम्याचा, कपाळावरील तिसरा डोळा असलेला, शिवमणी काढून घेतला. तिथली ‘‘जखम कायम भळभळत राहील. कधीही दुरुस्त होणार नाही,’’ असे तळपट सांगितले. कपाळावरल्या शिवमण्यामुळे अश्‍वत्थाम्यास कधीही थकवा येत नसे; अन्न-पाण्याची गरज़ राहत नसे. लहान असताना, त्याच्या बापापाशी त्याला दूध पाजण्याचेही पैसे नसल्यामुळे, अश्‍वत्थाम्याने पिठात पाणी मिसळून आपल्या ओठांवर लावले होते. (टोण्ड मिल्कचे पेटंट, खरे तर त्याचेच असावयास हवे!)
आता शिवमणी नसल्यामुळे तहानभुकेने गलितगात्र अश्‍वत्थामा फिरत असतो. त्याच्या कपाळावरल्या जखमेतून वरचेवर रक्त येत असते. घाणेरड्या वासाचा पू येतो. मृत्यूची भीक मागतो तो देवाकडे. पण, मृत्यू त्यास ‘भेटत’ नाही. पाच हजार शंभर वर्षांपासून तो रानोमाळ भटकत आहे. अंगावर अतोनात फोड येतात, त्याला राहायला घर नाही. त्याला जरी कोणी दारात उभे करीत नाहीत, तरी रुद्रावतारी सूडाच्या भावनेने पेटून उठतातच लोक. त्यांना हे कळण्याचा वकूब नाही की, आपल्यासाठी जन्नतची दारे उघडून सात सुंदर्‍या वाट पाहत नसतात. नरकाग्नीत अब्जावधी वर्षे जळत राहाणे, हेच ‘जळणार्‍या’ लोकांचे प्राक्तन असते. अश्‍वत्थाम्याची आताची गत पाहा. लगेच कळून येईल.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष देशपांडे, आसमंत, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष देशपांडे, आसमंत, स्तंभलेखक (602 of 649 articles)


  समाजकारण : डॉ. भीमराव गस्ती | १८१८ ते १८७० पर्यंत बेरड रामोशी, कैकाडी, वडार लमाणी या जमातीच्या लोकांनी इंग्रजांना झोपूही ...