Home » आसमंत, डॉ. विजय चौथाईवाले, स्तंभलेखक » उदयोन्मुख ‘मोदी सिद्धान्त’

उदयोन्मुख ‘मोदी सिद्धान्त’

डॉ. विजय चौथाईवाले |

narendra_modi_0कुठल्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचे संवर्धन करणे हा असतो. राष्ट्रीय हिताचे मुद्दे बदलू शकतात. मात्र, कुठल्याही परिस्थितीत देशहिताविषयी दुमत होऊ शकत नाही. अर्थात, परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आपल्या स्वत:च्या हिताचे संवर्धन करणे हाच असतो.
या संदर्भात आमच्या विदेश धोरणाच्या उद्देशात काही सातत्य आहे, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे. हे आमच्या समृद्ध संस्कृती, मूल्ये, लोकाचार आणि राष्ट्रीय बाणा यावर आधारित आहे. आमच्या येथे ‘जगा आणि जगू द्या’या तत्वाची समृद्ध परंपरा राहिली आहे आणि येथे नेहमी साम्राज्यवाद, वसाहतवाद अथवा जाती-धर्माच्या आधारावरील सर्व प्रकारच्या भेदभावांचा विरोध करण्यात येतो. भारताने नेहमीच जागतिक समुदायाच्या सहकार्याने या उद्देशांची  पूर्तता करण्याच्या दिशेने कार्य केले आहे. आमच्या दृष्टीने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ केवळ एक नारा नाही, तर संस्कृतीचा मूळ गाभा आहे. त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सर्वत्र तीव्र संतापाची भावना असूनही मोदींनी पाकिस्तानच्या नागरिकांना संयुक्तपणे गरिबीविरुद्ध लढण्याचे आवाहन केले, यात काहीही आश्‍चर्य नाही.
त्याच वेळी ही गोष्टही अतिशय स्पष्ट आहे की, आमचे राष्ट्रीय हित, आमच्या गरजा आणि आकांक्षा एवढेच महत्त्वाचे आहे. बदलत्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच उदयोन्मुख संधी आणि आव्हानांबरोबरच परराष्ट्र धोरण साचेबद्ध राहू शकत नाही. याचे समर्पक उदाहरण द्यायचे झाल्यास अलिप्ततावादी (नाम) चळवळीचे देता येईल. शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावादी चळवळीने ‘तिसर्‍या आवाजा’च्या स्वरूपात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मात्र, आता त्याचे औचित्य किती, हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे ‘मोदी सिद्धान्ता’वर चर्चा करण्यापूर्वी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मोदी सिद्धान्त कठोर, स्थितिशील आणि पोलादाप्रमाणे नाहीत. मात्र, पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे ‘भारत सर्वप्रथम’ या सिद्धान्तावर ते आधारित   आहेत.
‘मोदी सिद्धान्त : भारताच्या परराष्ट्र धोरणातील नवीन मापदंड’ या पुस्तकाचे प्रकाशन करते वेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘‘२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर नव्याने जगाकडे दृष्टी टाकल्यावर आमच्या असे लक्षात आले की, आम्ही जगाला अधिक योगदान देऊ शकतो आणि भविष्याला आकार देऊ शकतो. त्यामुळे प्रभावी व धाडसी धोरणांच्या साहाय्याने अधिक महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून आमचे सरकार कार्यरत झाले. दोन वर्षांत खूप प्रगती झाली आहे. या प्रयत्नांच्या बाह्य पैलूंकडे लक्ष देतानाच देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात संतुलन साधणे अतिशय आवश्यक आहे.  धोरण आणि प्राधान्यक्रम वेगळ्या पद्धतीने भूतकाळाशी जोडावे लागणार आहेत. जगात भारताच्याही दृष्टिकोनाला विशेष स्थान आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर आपले संबंध आणि वास्तव, म्हणजे वेगाने कायापालट करणार्‍या विश्‍वाची जाण आहे.’’ अधिक विस्तृतपणे सांगायचे झाल्यास, वरील उद्गार म्हणजे मोदी सिद्धान्तचे मूलभूत सार आहे.
अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणात दृढ एकात्मता : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अंतर्गत विकास अजेंडा राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाशी असलेल्या संबंधांचा पुरेपूर उपयोग केला आहे. उदाहरणार्थ- अनेक देशांची सरकारे आता आमचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम, जसे- मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट शहरे, रेल्वेचे आधुनिकीकरण या क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य करीत आहेत. या प्रयत्नांमुळे भारतात थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) उल्लेखनीय वाढ झाली आहे.
गतकालीन अनिश्‍चित, अस्थिर परिस्थितीवर नियंत्रण : भूतकाळात बहुतांश वेळी भारताचे परराष्ट्र धोरण बचावात्मकच होते. १९७१ चा बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा उल्लेखनीय अपवाद वगळता, भारताचे परराष्ट्र धोरण अनिश्‍चित अथवा अंतर्गत राजकारणाने प्रेरित होते. मोदी सरकारने ही अनिश्‍चितता आणि संभ्रम संपुष्टात आणला. अन्य देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार स्वत:चा अजेंडा स्थापित करीत आहे. या संदर्भात सौदी अरेबिया आणि इराणचे उदाहरण देता येईल. भारताने सौदी अरेबिया आणि इराणशी (जे एकमेकांविरुद्ध संघर्ष करीत आहेत) आपले संबंध अधिक सुदृढ केले आहेत आणि त्याच वेळी इस्रायलबरोबरच्या संबंधांना नव्या उंचीवर नेले आहे. वस्तुस्थिती ही आहे की, काही आठवड्यांच्या अल्प कालावधीत सौदी अरेबिया आणि इराणने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान मोदींना बहाल केला.
असाध्य ते केले साध्य : गेल्या दोन वर्षांत भारताने अनेक नवीन देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे या देशांत गेल्या अनेक वर्षांत भारताच्या बाजूने या संदर्भात कुठलाही पुढाकार घेण्यात आला नव्हता अथवा विशेष दौर्‍याचे आयोजनही झाले नव्हते वा द्विपक्षीय शिखर संमेलनही झाले नव्हते. या देशांशी भारताने दोन वर्षांत अतिशय उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत, हे विशेष! कॅनडा, संयुक्त अरब अमिरात, इराणसारख्या महत्त्वाच्या देशांचाही यात समावेश आहे. या देशांचे भारताशी व्यावसायिक आणि व्यापारी संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अन्य कॅबिनेट मंत्र्यांनी एकत्रितपणे १४० देशांचा दौरा केला आहे. दस्तुरखुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी १७० पेक्षा अधिक देेशांतील वरिष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली, संवाद साधला. जगात असे ६८ देश आहेत की, जेथे कधीच कुठल्याही भारतीय मंत्र्याने दौरा केला नव्हता. मात्र, २०१६ च्या अखेरपर्यंत या सर्व ६८ देशात एक कॅबिनेट मंत्री भेट देईल, अशी योजना आखण्यात आली आहे. या पृथ्वीतलावरील सर्व १९२ देशांना भारतातील प्रतिष्ठित नागरिकांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे.
नेतृत्वाची भूमिका : आमच्या ऐतिहासिक अनिश्‍चिततेवर, संभ्रमावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवतेच्या हितासाठी विविध मुद्यांवर प्रमुख भूमिका वठवत आहे. भारताने दिल्लीत सर्वात मोठ्या भारत-आफ्रिका शिखर संमेलनाचे आयोजन केले होते. पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय सौर परिषदेत भारताने जो प्रस्ताव ठेवला होता, त्याला तत्काळ जागतिक स्तरावर प्रतिसाद मिळाला; तसेच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याविषयक भारताच्या प्रस्तावाला जवळजवळ सर्व देशांनी तातडीने मान्यता दिली. दहशतवादाविरुद्ध भारताने घेतलेल्या  रोखठोक व स्पष्ट भूमिकेला आता जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा लोक याच्या उपयुक्ततेविषयी साशंक होतेे. पण, या मुद्यामुळेच बलुचिस्तानातील पाकिस्तानचे अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले गेले.
सांस्कृतिक सेतू : जरी व्यापार आणि व्यवसाय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे पैलू असले, तरी भारताचे प्राचीन काळापासून जगाशी असलेले प्रगाढ सांस्कृतिक संबंध ही आमची आगळीवेगळी शक्ती आहे. जपान, चीन, मंगोलिया, श्रीलंका, बांगलादेश या देशांना पंतप्रधान मोदींनी दिलेली भेट विशेष उल्लेखनीय आहे. या देशांशी प्राचीन काळापासून आमचे संबंध आहेत आणि आजही ते कायम आहेत. पंतप्रधानांनी प्रामुख्याने सामायिक मूल्ये, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा या संदर्भात चर्चा केली, यामुळे मनुष्यांमधील तसेच मानव व निसर्ग यांच्यातील संघर्ष टळू शकतो. त्यांनी विविधता आणि मतभेद यातील संघर्ष टाळण्यावर, त्यांच्यात योग्य समन्वय राखण्यावर भर दिला. पंतप्रधान मोदी यांनी संघर्ष टाळण्यावर तसेच जागतिक हवामान बदलावर (क्लायमेट चेंज) भर दिला, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, जागतिक हवामान बदलाचा (जलवायू परिवर्तन) गरीब आणि दलित-पीडितांवर सर्वाधिक प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे ‘जलवायू न्यायाची’ गरज त्यांनी प्रतिपादित केली.
जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद : भारतातील बुद्धिमंत येथे न राहता जगात सर्वत्र नोकरी-व्यवसायासाठी जातात.  याला ‘प्रतिभा पलायन’ अर्थात ब्रेन ड्रेन म्हणून संबोधले जाते. मात्र, आमच्यासाठी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ही केवळ आपली आर्थिक शक्ती आहे असे नसून, परदेशातील या लोकांमुळे  बहुमूल्य विदेशी चलन आमच्या देशात येते. जगातील विविध भागात भारतीयांनी उद्योग, व्यापार तसेच बौद्धिक आणि तांत्रिक क्षेत्रात आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. जेव्हापासून भाजपा सरकार सत्तेवर आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सातत्याने विदेशातील भारतीयांशी संवाद साधून आहेत, सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत. नियम सोपे व सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परदेशस्थ भारतीयांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे आणि त्यांना सरकारच्या समग्र विकास अजेंड्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. या घटनांमुळे एनआरआय समुदाय मातृभूमीशी आपले नाते अधिक घट्‌ट करीत आहे व त्यांनी आपापल्या देशात आपली प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावली आहे.
त्याच वेळी ही गोष्टही महत्त्वाची आहे की, मूळ भारतीय वंशाच्या या लोकांना संकटाच्या वेळी तत्काळ मदत केली पाहिजे. आम्ही युक्रेनमधून १००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास मदत केली आहे. इराकमधून ४६ परिचारिकांसह ७००० हून अधिक भारतीय कामगारांना बाहेर काढले आहे. लीबियातून ३००० हून अधिक आणि येमेनमधून जवळजवळ ४००० भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात परत आणले आहे.
सामरिक नियंत्रण : पाकिस्तानला वारंवार आवाहन करूनही त्या देशाने भारतविरोधी दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याचे आपले धोरण बदललेले नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने मुत्सद्दीपणा दाखवून लष्करी व राजनयिक समन्वय साधून पाकिस्तानची जबर कोंडी केली. एवढे असूनही पंतप्रधानांनी आपल्या जाहीर भाषणातून भारत-पाकिस्तान संबंधांना नवीन आकार देण्याचा प्रयत्न केला, हे उल्लेखनीय! केरळमधील कोझिकोड येथे भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत भाषण करताना- ‘‘पाकिस्तानने निरक्षरता, गरिबी आणि बेरोजगारीविरुद्ध युद्ध करावे, या क्षेत्रात भारताशी स्पर्धा करावी,’’ असे आव्हानच पंतप्रधानांनी दिले.
उरी येथील लष्करी शिबिरावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ भारतीय सैनिक ठार झाले. अखेर भारताने २९ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले. ही अतिशय दुर्मिळ, अभूतपूर्व घटना होती. इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. कारण सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सरकार आणि लष्कराने सार्वजनिक रीत्या सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या दोन वर्षांत राजनयिक प्रभाव निर्माण केल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक अधिकच परिणामकारक झाले. स्ट्राईकमागे असलेली आमची क्षमता आणि इच्छाशक्ती जगाला दिसली.  राजनयिक आणि कूटनीतिक धोरण आखून पाकिस्तानला जगात एकटे पाडून आणि लष्कराला सामरिक व कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने काम करण्यासाठी खंबीर राजकीय नेतृत्वाची गरज असते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, पहिल्यांदाच भारताने खूप ठोस आणि समन्वित पद्धतीने तात्त्विक, सांस्कृतिक, सामरिक व व्यूहरचनामत्क आयुधे वापरून परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य केले आहे. अर्थात, पुढील मार्गावर अनेक आव्हाने आहेत. स्वत:चे हित साधण्यासाठी काही देश अद्यापही,  ‘पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे’ हे सार्वजनिक रीत्या मान्य करण्यास तयार नाहीत. एनएसजीत अथवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळावे, या भारताच्या मागणीला चीनचा असलेला विरोध त्या (सी. राजा मोहन यांच्या शब्दांत) देशाचा ‘शक्ती सिद्धान्त’ दर्शवितो. एवढेच नव्हे, तर आयएसआयएसचा भौगोलिक विस्तार वाढत आहे. इसिसची विचारसरणी, दहशतवादाचे नवीन आणि अधिक परिष्कृत स्वरूप हे जगापुढे फारच मोठे आव्हान आहे. भविष्यातील संकटे लक्षात घेता, या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘मोदी सिद्धान्त’ पुढेही असेच अंमलात आणले जातील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही…!
– डॉ. विजय चौथाईवाले
प्रभारी, परराष्ट्र व्यवहार विभाग, भारतीय जनता पार्टी
‘मोदी सिद्धान्त : भारताच्या परराष्ट्र धोरणातील नवीन मापदंड’ या पुस्तकाचे सहसंपादक.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under आसमंत, डॉ. विजय चौथाईवाले, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, डॉ. विजय चौथाईवाले, स्तंभलेखक (511 of 565 articles)

  shimon-peres
  अनय जोगळेकर | जागतिक शांततेसाठी १९९४ सालचा नोबेल पुरस्कार, तीन वेळा पंतप्रधानपद, ७ वर्षं राष्ट्रपतीपद, याशिवाय परराष्ट्र, संरक्षण, अर्थ, प्रादेशिक ...