Home » आसमंत, उलट तपासणी : भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » तिवारींच्या इ‘शाप’नीती

तिवारींच्या इ‘शाप’नीती

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर |

पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांना चिंता आहे, ती मोदी आणि संघाची. भारतीय सेनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार मोदी किंवा संघाचे संस्कार असलेल्या कोणाकडे असतील, तोपर्यंत आपली धडगत नाही, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. त्यामुळे भारताची सत्तासूत्रे व पर्यायाने भारतीय सेनेची अधिकारसूत्रे कॉंग्रेसच्या हातामध्ये आली पाहिजेत; असे पाक संसदेने ठरवलेले धोरण आहे. म्हणजे भारतीय सेनेच्या मुस्क्या कॉंग्रेस बांधणार आणि पाकसेनेला गोळीही न झाडता भारतीय सैनिकांचे मुडदे पाडता येणार; अशी ही रणनीती आहे.

manish-tewariमनीष तिवारी नावाचा एक फाकडू इंग्रजी बोलणारा विशुद्ध बेअक्कल इसम कॉंग्रेस पक्षात आहे. त्याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापाशी किती नीतिमत्ता शिल्लक आहे, असा प्रश्‍न पडला आहे. ज्यांना नैतिकता कशाला म्हणतात, त्याचा पत्ता नाही, ते नैतिकतेविषयी बोलू लागले; मग मजाच व्हायची ना? पर्रीकर यांनी एका कार्यक्रमात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आपल्यात व मोदींमध्ये संघाच्या संस्कारामुळे आली, असे विधान केले आहे. त्यामुळे हे तिवारी नावाचे गृहस्थ कमालीचे विचलित झाले आहेत. त्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना इतिहासाचे अनेक दाखले दिले आहेत. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण किंवा माणेकशॉं अशी मंडळी संघाच्या शाखेत गेली होती काय; असाही सवाल केला आहे. अर्थात त्यांच्या बुद्धीला यापेक्षा अधिक झेप घेता येणार नाही, हे मान्यच करावे लागेल. अन्यथा त्यांना पर्रीकरांचे विधान समजून घेण्याची गरज भासली असती आणि त्यांच्या मुखकमलातून इतके बेअक्कल सवाल विचारले गेले नसते. पाकिस्तानशी झालेली युद्धे आणि त्यातली सेनेची वा तत्कालीन राज्यकर्त्यांची कामगिरी, यासंबंधी पर्रीकर मुळातच बोललेले नाहीत. सर्जिकल स्ट्राईक आणि दोन देशातील युद्ध यात फरक असतो, हेही तिवारींना उमजलेले नाही. अन्यथा त्यांनी असे प्रश्‍न कशाला विचारले असते? पर्रीकरांनी भारतीय सेनेची हनुमानाशी तुलना केल्यानेही हे माकड पिसाळले आहे. त्याला हनुमान आणि माकड यातलाही फरक कळलेला नाही. राम-रावणाचे युद्ध खूप नंतर झाले. अगोदर हनुमानाने सीतामाईची खबरबात काढायला लंकेची वारी केली होती आणि त्यात आडव्या आलेल्या रावणाच्या साथीदारांना धडा शिकवण्यासाठी एकट्यानेच लंका पेटवली होती. अल्पावधीतला तो हल्ला व नुकसान आणि सर्जिकल स्ट्राईकमधले साम्य कळायला बुद्धी शाबूत असावी लागते ना?
मनीष तिवारींनी या संबंधात कुणा पत्रकारासमोर मुक्ताफळे उधळली आणि त्या पत्रकारानेही आपल्या अकलेचे प्रदर्शन घडवण्याची संधी सोडली नाही. एका विधानासाठी संरक्षणमंत्र्यांकडे राजीनामा मागणार काय, असा प्रतिप्रश्‍न तिवारींना विचारला. मग फक्कड इंग्रजीत त्यांनी आणखी अक्कल पाजळली. ज्यांच्याकडे थोडीफार नैतिकता शिल्लक असते त्यांच्याकडे राजीनामा मागितला जातो. पर्रीकरांकडे राजीनामा मागून आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही, असे तिवारी म्हणाले. मग आधी जी प्रतिक्रिया दिली, त्याला वेळ सत्कारणी लावले असे म्हणायचे काय? तुमचा वेळ अधिक कारणी लावण्यासाठी जरा पक्षाची संघटना बांधा. तिथे काम शून्य! पक्षाचा व संघटनेचा बोर्‍या वाजला आहे. तिथे द्यायला वेळ नाही आणि रोजच्या रोज बाष्कळ बडबड कॅमेर्‍यासमोर करायला भरपूर वेळ असतो. त्याने वेळ वाया घालवायचा नाही, असे बोलणे, हा विनोद नव्हे तर मूर्खपणा असतो. शिवाय नीतिमत्ता किंवा नैतिकता कशाशी खातात, हे तरी तिवारी महोदयांना ठावूक आहे काय? त्यांच्याच नावाचे एक वयोवृद्ध कॉंग्रेस नेते आहेत. त्यांना जग नारायणदत्त तिवारी म्हणून ओळखते. त्यांच्यावर कुठले कुठले नैतिक कार्य केल्याचा आरोप आहे? मनीषला ते तरी ठावूक आहे काय? राजभवनात राज्यपाल म्हणून काम करताना विविध महिलांशी केलेले चाळे उघडकीस आले; म्हणून त्या तिवारींकडून या तिवारींच्याच सरकारला राजीनामा घ्यावा लागलेला होता. त्यानंतर जुन्या प्रकरणातून जन्माला आलेल्या अनौरस पुत्राला कोर्टात दावा लावून वयोवृद्ध तिवारी आपलाच जन्मदाता असल्याचे सिद्ध करावे लागलेले होते. अशा नीतिमान पक्षाचे प्रवक्ते म्हणून मनीष तिवारी पर्रीकरांच्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह लावतात. तेव्हा अनैतिकताही लज्जेने मान खाली घातल्याशिवाय राहाणार नाही. कॉंग्रेसची तिवारी मंडळी कुठल्या नैतिकतेत वेळ वाया घालवतात, ते आणखी वेगळे सांगण्याची गरज आहे काय?
असो. राहिला मुद्दा पर्रीकरांच्या विधानाचा व त्यातल्या संघविषयक उल्लेखाचा! इंदिराजी, शास्त्रीजी वा माणेकशॉं संघात गेले होते की नाही, ठावूक नाही. पण सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी संघाचे संस्कार कशासाठी आवश्यक होते, त्याचा खुलासा पाकिस्तानच्या संसदेनेच केला आहे. इंदिराजी वा शास्त्रींची कॉंग्रेस वा सरकारे वेगळीच होती. त्यांचा सोनिया-राहुलच्या कॉंग्रेसशी काडीमात्र संबंध नाही. कारण तेव्हा कॉंग्रेस राष्ट्रवादी व देशभक्तांचा तरी पक्ष होता. भ्रष्टाचारी असला तरी पाकिस्तानचा हस्तक असलेल्यांचा पक्ष, अशी कॉंग्रेसची ओळख नव्हती. आज कॉंग्रेसला पाकिस्तान आपला तारणहार वाटतो आहे. भारतात सत्तेवर येण्यासाठी कॉंग्रेसला पाकिस्तानच्या मदतीची गरज भासू लागलेली आहे. त्यामुळेच अशा पक्षाच्या कारकीर्दीत शौर्यशाली भारतीय सेनेच्या मुस्क्याच बांधलेल्या होत्या. मोदीविरोधात तर कॉंग्रेसला आपला पाकनिष्ठ चेहराही लपवण्याची गरज भासलेली नाही. पाकिस्तानात जाऊन कॉंग्रेसचे उच्चशिक्षित नेते मणिशंकर अय्यर मोदींना घालवण्यासाठी पाकची मदत उघडपणे मागत होते.
आता तर त्याचा उल्लेख पाकिस्तानी संसदेतच आलेला आहे. पाक संसदेचा घटक असलेल्या सिनेटमध्ये त्याची चर्चा झाली व एक धोरणात्मक टिपणही जाहीर झालेले आहे. भारताला पराभूत करून संपवायचे असेल, तर लढाईची गरज नाही. मोदी व संघविरोधी ज्या शक्ती भारतात कार्यरत आहेत, त्यांनाच हाताशी धरून भारताला नामोहरम् करता येईल, अशी टिप्पणी त्यात केलेली आहे. थोडक्यात कॉंग्रेस व मनीष तिवारीसारखे त्याचे नेते, पाकिस्तानचे बाहू पसरून स्वागत करतील. अडथळा जर काही असेल, तर तो फक्त मोदी व संघाचा असणार आहे. याची कबुली पाकिस्तानच देतो आहे. त्यामुळे संघाचा सर्जिकल स्ट्राईकशी काय संबंध आहे; त्याचा खुलासा होऊ शकतो. फक्त आपला बचाव करण्यासाठीच नव्हे, तर देशाला वाचवण्यासाठी आता संघाला पुढे येण्यास गत्यंतर राहिलेले नाही.
पर्रीकर कुठल्या अर्थाने बोलले आणि कुठल्या संदर्भाने संघाची प्रेरणा म्हणाले, त्याचा खुलासा असा पाकिस्तानी सिनेटच्या प्रस्तावातच आलेला आहे. पाकिस्तानला आता भारत वा भारतीय सेनेची भीती उरलेली नाही. त्यांना भारतीय सेनेच्या शौर्याविषयीही काडीमात्र शंका नाही. पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांना चिंता एकाच गोष्टीची आहे, ती मोदी आणि संघाची. भारतीय सेनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार मोदी किंवा संघाचे संस्कार असलेल्या कोणाकडे असतील, तोपर्यंत आपली धडगत नाही, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. त्यामुळे युद्धाशिवाय पाकिस्तानला जिंकायचे असेल, तर भारताची सत्तासूत्रे व पर्यायाने भारतीय सेनेची अधिकारसूत्रे कॉंग्रेसच्या हातामध्ये आली पाहिजेत; असेच पाकच्या संसदेने ठरवलेले धोरण आहे. म्हणजे पर्यायाने भारतीय सेनेच्या मुस्क्या कॉंग्रेस बांधणार आणि पाकसेनेला गोळीही न झाडता भारतीय सैनिकांचे मुडदे पाडता येणार; अशी ही रणनीती आहे.
पर्रीकर संघाचे वा मोदींचे कौतुक करण्यासाठी असे काही दर्पोक्तीयुक्त अजीबात बोललेले नाहीत. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या व तथाकथित भारतीय पुरोगाम्यांच्या पाकनिष्ठेमुळे भारतीय सेना किती निकामी होते; तेच सांगण्यासाठी हे विधान केलेले आहे. संघात कार्यरत असलेल्या व त्याचे हितचिंतक असलेल्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पर्रीकरांनी हे विधान केलेले आहे. बत्थड मेंदूच्या तिवारींना यापैकी कही समजणे या जन्मी तरी शक्य नाही. पुढला जन्म पाकिस्तानात झाला तर कदाचित थोडेफार कळू शकेल. पण तोपर्यंत संघ स्वयंसेवक मोदी-पर्रीकरांनी पाकिस्तान शिल्लक ठेवला तर तिवारींचा जन्म तिथे होऊ शकेल. ती शक्यता फारच कमी आहे. तेव्हा या जन्मी लाथा झाडण्याचे आपले इतिकर्तव्य त्यांनी असेच चालू ठेवले तरी खूप झाले. कारण त्यातूनच कॉंग्रेस उकिरड्यावर आली आहे ना? त्यांची ही इशापनीती भाजपाला लाभदायकच ठरली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, उलट तपासणी : भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, उलट तपासणी : भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (615 of 649 articles)


  •विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले गर्दपेक्षा जास्त नशिला आणि कमालीचा घातक पदार्थ पश्‍चिमेच्या अमली बाजारपेठेत आलासुद्धा! त्याचं नाव आहे, कारफेन्टानिल; ...