Home » आसमंत » पाकिस्तानच्या मदतीसाठी चीनचा डाव

पाकिस्तानच्या मदतीसाठी चीनचा डाव

राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन

brahmaputraपाकिस्तानने चिथावल्याने चिनी ड्रॅगनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीनने तिबेटमध्ये ‘ब्रह्मपुत्रा’ नदीची उपनदी शियाबुकुचे पाणी अडवले आहे. चीनचा येथे मोठा हाइड्रो प्रोजेक्ट आहे. त्यासाठी नदीवर भलामोठा बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. चीनच्या या कुरघोडीमुळेे भारतासह अनेक देशांना मिळणार्‍या ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर ‘पाणी’ फिरणार आहे. बंधार्‍यामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावरही परिणाम होणार आहे.
‘शिन्हुआ’ न्यूज एजन्सीने शनिवारी प्रोजेक्टचे ऍडमिनिस्ट्रेशन ब्युरोचे प्रमुख झांग युनबाओ यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला यारलुंग जांगबू संबोधले जाते. चीनने ब्रह्मपुत्रेची उपनदी शियाबुकुचे पाणी अडवले आहे. या नदीवर चीनचा ‘लाल्हो’ नामक एक मोठा हायड्रो प्रोजेक्ट सुरू आहे. चीनने आतापर्यंत या प्रोजेक्टवर ७४० मिलियन डॉलर (४.९५ बिलियन युआन) खर्च केले आहेत.
भारतीय लष्कराने पाकच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करून उरी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तान चांगला संतापला आहे. पाकिस्ताननेे चीनच्या मदतीने शियाबुकु नदीचे पाणी अडवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारत-पाकमध्ये झालेल्या ऐतिहासिक सिंधू पाणीवाटप करारासंंदर्भात रिव्ह्यू केला होता. त्यामुळेच सिंधूचे पाणी अडविण्याची चर्चा भारतात टीपेला पोहोचली असताना चीनमार्फत ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखण्याची भाषा करण्यापर्यंत या देशाची मजल जाते, यातच सारे आले. त्यानंतर पाकिस्ताननेे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडवण्याची धमकी दिली होती.
पाकिस्तानला मदत करण्यासाठी चीनने ब्रह्मपुत्रा नदीच्या एका उपनदीचा प्रवाह जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका ईशान्य भारतातील प्रदेशाला बसणार आहे. झियाबुकु नामक उपनदीचा प्रवाह अडवून चीन तेथे ७४० दशलक्ष डॉलर्स खर्च करून एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. तिबेटच्या झिगाझे प्रांतामध्ये लाल्हो नावाने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुळात चीनची ही चाल आजची नाही. पूर्वीपासूनच चीन तिबेटवर आपला हक्क सांगत आला आहे आणि चीनने तिबेटवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. लाल्हो हा भाग सिक्कीमला लागून आहे. झिगाझेमधूनच ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. या प्रकल्पाचे काम २०१४ च्या जूनमध्ये सुरू झाले आहे आणि ते २०१९ मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे. चीनची ही योजना पूर्णत्वाला गेल्यास भारत आणि बांगलादेशातील ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहांवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे.
ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारताची जीवनवाहिनी
भारतातील अनेक भागांत ब्रह्मपुत्रा नदी ही जीवनवाहिनी आहे. भारतीय संस्कृतीनुसार या नदीला पवित्र मानण्यात आले आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही जगातील सर्वात उंचावरून वाहणारी नदी आहे. तिबेट हे भारत, बांगलादेश तसेच दक्षिण-पूर्व आशियामध्ये वाहणार्‍या अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. तिबेटमध्ये खूप ठिकाणे कायमस्वरूपी बर्फाच्छादित असल्यामुळे अनेक नद्या येथे उगम पावतात. ब्रह्मपुत्राही तिबेटमध्येच उगम पावते. तिबेटमध्ये जवळपास ४ हजार मीटर उंचावर कैलास मानसरोवर पर्वतातील एका ग्लेशिअरमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा ही जगातील सर्वात वेगवान प्रवाह असणार्‍या नद्यांपैकी एक आहे. पूर्वेकडे वाहणारी ही नदी तिबेटमध्ये २००० किलोमीटर अंतर पार करून अरुणाचल प्रदेशातील सियॉंग जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तेथून पुढे ती आसाम, मेघालय असा प्रवास करत बांगलादेशात जाते. उगम स्थानापासून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेपर्यंतची तिची लांबी जवळपास २९०० किलोमीटर इतकी आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये सँगपो यॉरलॉग असे म्हटले जाते. ज्यावेळी ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते, त्यावेळी तिचे नाव सियांग होते.
पुढच्या २० वर्षांमध्ये हिमालयातून वाहणार्‍या नद्यांमधील पाण्यात २५ टक्के कमतरता
चीनने ब्रह्मपुत्रेच्या पाण्याबाबत नेहमीच वर्चस्ववादाची भूमिका घेतली आहे. त्याला कारणही तसेच आहे. गतवर्षी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप या थिंक टँकने केलेल्या संशोधनातून एक माहिती पुढे आली होती. त्यानुसार पुढच्या २० वर्षांमध्ये हिमालयातून वाहणार्‍या नद्यांमधील पाण्यात २५ टक्के कमतरता येणार आहे. कारण, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि हिमकडे हे वितळत आहेत आणि त्यामुळे येणार्‍या काळात पाण्याचा दुष्काळ वाढत जाणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीतून भारतात येणार्‍या पाण्याचे प्रमाण हे १९९९ पासून कमी होत चालले असून सध्या ते जवळपास १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती एका पाहणीतून समोर आली होती. साधारणपणे २०३० पर्यंत चीनमध्ये २५ टक्के पाणीटंचाई जाणवणार आहे. चीनचा फार मोठा भाग वाळवंटी आणि डोंगराळ आहे. यामुळे इथे पाण्याची नेहमीच कमतरता असते. यामुळे चीनने त्यांच्या प्रदेशात वाहणार्‍या यांगसे या नदीवर जगातील सर्वात मोठे थ्री गॉर्जेस नावाचे धरण बांधले आहे. त्यानंतर यलो या नदीवरदेखील त्यांनी मोठे धरण बांधले आहे आणि आता चीनमध्ये कोणतीही नदी धरण बांधण्यासाठी शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळेच चीनने २००२ पासून आपले लक्ष ब्रह्मपुत्रा नदीकडे वळवलेले आहे. आता ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने धरणे बांधण्यास सुरुवात केली आहे. आपण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये धरणांच्या उभारणीचे काम पाहात असतो. तसा प्रकार चीनमध्ये नाही. चीनने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट प्रगती केली आहे. तसेच तेथे लोकशाही नाही. त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी होण्याची गती तेथे भारतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेवर बांधण्यात येणार्‍या धरणांचे बांधकाम निर्धारित काळात पूर्ण होऊ शकते, हे विसरता कामा नये.
ब्रह्मपुत्रा नदीवर २८ नवी धरणे उभारण्याचा चीनचा मनोदय
एका अंदाजानुसार ब्रह्मपुत्रेचे जवळपास एक तृतीयांश पाणी वापरण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चायनीज सोसायटी ऑफ हायड्रोपॉवर इंजिनीअर्सच्या डेप्युटी जनरल सेक्रेटरी झांग बोटिंग यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, चीनमध्ये विजेची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला जलविद्युत प्रकल्पांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर तब्बल २८ नवी धरणे उभारण्याचा चीनचा मनोदय आहे. हे सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास भारतातील ब्रह्मपुत्रा नदी कोरडी होण्याची दाट शक्यता आहे. चीन मात्र याबाबत जगाची दिशाभूल करत आहे. या धरणांमधून अडवले जाणारे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जात असून वीजनिर्मितीनंतर ते पुन्हा ब्रह्मपुत्रेच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या पात्रात येणार्‍या पाण्यात कमतरता येणार नाही, असा चीनचा युक्तिवाद आहे; परंतु तो धादांत फसवा आहे. याबाबत भारतीय तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी काही वर्षांपूर्वीच भारत सरकारचे लक्ष वेधले होते. अशी धरणे बांधली गेली तर भारताचे किती मोठे नुकसान होईल, या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहून भारताचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. कमिंग वॉटर वॉर्स, बिवेअर द फ्युचर या पुस्तकांचा अभ्यास केल्यास चीनच्या या घातकी मनसुब्यांची सहज कल्पना येते. चीनला अतिप्रचंड प्रकल्प उभारायची सवय आहे. चीनने यांगसे नदीवर बांधलेले थ्री गॉर्जेस धरण हे जगामध्ये असलेल्या इतर धरणांपेक्षा चार पट मोठे आहे. त्यामुळे येत्या काळातही गे्रड बेंडसारखे किंवा त्यापेक्षाही मोठे प्रकल्प चीनकडून उभारले जाऊ शकतात. म्हणूनच भारताने या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
भारताने त्याला कसे उत्तर द्यायचे?
दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहाण्याचा निर्णय चीनने घेतल्यानंतर आता प्रश्‍न उरतो तो भारताने त्याला कसे उत्तर द्यायचे?
याबाबत सर्वप्रथम चीनला आर्थिक धक्के देणे आवश्यक आहे. यासाठी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे. याबाबत संपूर्ण देशभरातून एकजूट दिसून आली पाहिजे. सध्या चीन आर्थिक मंदीने चिंतातुर बनत चालला आहे. अशा वेळी जर भारतात होणारी चिनी वस्तूंची निर्यात मंदावल्यास त्यांना आर्थिक फटका बसू शकतो.
दुसरे, चीन केवळ भारताचेच पाणी पळवत आहे, असे नाही. व्हिएतनाम आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांचेही पाणी पळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिएतनाम आणि दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांची एक मोट बांधून चीनशी होणार्‍या संभाव्य पाणीलढाईची तयारी भारताने केली पाहिजे.
एकीकडे हे करत असतानाच भविष्यात ब्रह्मपुत्रेचे पाणी कमी झाल्यास ईशान्य भारतात आणि आसाममध्ये निर्माण होणारा पाणीप्रश्‍न  सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबतचे विचारमंथन आणि कृती कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे. ब्रह्मपुत्रा नदीला भारतात उगम पावलेल्या अनेक नद्या म्हणजे सीयोम, सुबानसीरी, लोहित, सरली आणि हुरी या नद्या आसामच्या पठारावर मिळतात. या नद्याही आपल्याबरोबर बरेचसे पाणी वाहून आणतात आणि ब्रह्मपुत्रा नदीत सोडतात. खबरदारीचा उपाय म्हणून या नद्यांचे पाणी अडवण्याचे प्रकल्प भारताने हाती घेतले पाहिजेत. कारण, या नद्यांवर धरणे उभारण्यासाठी १० ते १५ वर्षांचा काळ लागू शकतो.
चीन सिंधू करार नाही. चीन आणि भारताचा ब्रह्मपुत्रेवरदेखील करार नाही, जो होण्याची नितांत गरज आहे. तरीही चीनने ज्या त्वेषाने ब्रह्मपुत्रेवर धरणे बांधायला घेतली आहेत, त्यांचा आपल्या सीमा राज्यांवर परिणाम होत आहे. सतलज आणि सिंधूदेखील चीनमध्येच उगम पावतात आणि त्यावरील धरणांनी होणारे परिणाम आपण भोगतच आहोत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविरोधात दबाव वाढवण्यासाठी आपल्याला अन्य देशांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. चीनने ब्रह्मपुत्रेच्या उपनदीवर एका नव्या जलविद्युत प्रकल्पाची घोषणा करून या नदीचे पाणी अडवण्याची आपली जुनी रणनीती तीव्र केल्याचे दिसून आले आहे. भविष्यात ब्रह्मपुत्रेवर २८ धरणे उभारण्याचा चीनचा मनोदय आहे. तसे झाल्यास भारतातील ब्रह्मपुत्रेचा प्रवाह कोरडा होणार आहे. याचा मोठा फटका ईशान्य भारतातील प्रदेशाला बसणार आहे. चीनच्या या कावेबाज खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे.
थोडक्यात, आता  पावले उचलून आपला पश्‍चिम नद्यांवरचा हक्क संयमी पद्धतीने प्रस्थापित करणे ज्यात फक्त मोठी धरणे नाही, तर छोटी धरणे, छोटे जलविद्युत प्रकल्प हेदेखील सामील आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. विसाव्या शतकामधील युद्धे ही जमिनीसाठी झाली. एकविसाव्या शतकातील युद्धे ही तेलासाठी झाली आणि येणार्‍या बाविसाव्या शतकातील युद्धे ही पाण्यावरून होणार आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी याबाबतची भाकीते वर्तवली आहेत. त्यामुळेच भारताने या संभाव्य वॉटर वॉरसाठी तयार राहाणे आवश्यक आहे.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत (446 of 455 articles)


  विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले इस्लामी धर्मसंस्थापक मुहंमद यांचा जन्म सन ५७१ साली झाला. अरबस्तान म्हणजे आजच्या सौदी अरेबिया या ...