बार बार देखो…

रसार्थ : चंद्रशेखर टिळक |

baar-baar-dekho-box-office-5कतरिना कैफचा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपणाची कमाल मर्यादा असेल. पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘बार बार देखो’ हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहातो.
सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणुकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात. अगदी या सिनेमामधल्या कतरिनासारख्या. तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच. शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत-नकळत टाईम मशिनमध्ये बसलात तर त्याही तशाच
बसल्या आहेत असं वाटत राहाते; आणि तुम्ही कालानुरूप म्हातारे वाटत असताना त्या कतरिनारूपी चिरतरूण गुंतवणुकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त जास्त आकर्षक होत जातात. वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही, पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहाते. अगदी तुमच्या आयुष्याला पुरून उरेल अशी. एशियन पेंट्‌स , केस्ट्रोल , एचडीएफसी, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान लिवर, आयटीसी, कोलगेट, लार्सन टूब्रो , स्टेट बँक, रेलीस, हवेलस, टीसीएस अशा शेअर्ससारखी.
दुसरे म्हणजे, तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असला तरी या सिनेमामधल्या सारिकासारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी, संधी, व्यक्ती, बाबी तुमच्या आयुष्यात असतात. त्या एकाच वेळेस तुमच्यावर मायाही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात. त्याला  डोळस मायेचा अनुभव असे म्हणतात. असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्यासारखा तुम्हाला सांगता होतो की हनिमूनला गेला आहेस तर बायकोबरोबर मजा कर; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस. एकंदरीतच काय तर Things on hand, Deeds at hand always need attention, if not full concentration हे प्रेमात, मधुचंद्रात, वैवाहिक आयुष्यात, व्यावसायिक जीवनात आणि गुंतवणुकीतही कार्यरत असताना (आता इथे कामात किंवा काममग्न असताना कसं म्हणू!) महत्त्वाचे असते.
तिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय, ही क्षेत्रे निव्वळ Calculations, Solutions, Formulations ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते.
चौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते. आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे, तर सुखदही करण्यासाठी हे गृहीतक सदैव ध्यानात ठेवावेच लागते. असं गृहीतक अस्तिवात नसेलही, पण आचरणात आणावेच लागते. अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडताना नाही का असली गृहीतके असतात. Law of Diminishing Margiinal Utility चे गृहीतक काय तर म्हणे सगळेच
आंबे एकसारख्याच चवीचे, रंगाचे, आकाराचे, वासाचे… तुम्हाला एकापाठोपाठ एक मिळाले… एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती…? या न्यायाने उद्या गृहीतक म्हणून सांगाल की दीपिका, कतरिना,अनुष्का, प्रियांका एकाच वेळेस प्रेयसी म्हणून मिळाल्या तर… मग लक्षात येते की हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला गृहीतक म्हणायचे असते.
म्हणून तो सिद्धांत ही Law of Diminishing Marginal Utility असतो; Law of Equi – Marginal Utility नाही.
पाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद. त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतःही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BA­ LA­NCE हा असलाच पाहिजे.
वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे. गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल?
सहावे म्हणजे या सिनेमातील एका दृश्यात तो गुरुजी-भटजी-पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो. त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते. ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोकं असे धरतो आणि सांगतो की यातले एक टोक हा भूतकाळ आहे. कितीही इच्छा असली तरी आपल्याला तो जरा सुद्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते. या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य काळ. पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकी कोणालाच माहीत नसते. अशा वेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्यरीत्या उपयोगात आणले पाहिजे. अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही ‘वापरले पाहिजे’,  हाच शब्दप्रयोग अगदी समर्पक आहे .
अशा वेळी विंदा करंदीकर यांची,
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
त्यावर चढूनी भविष्य वाचा
या काव्यपंक्ती आठवायला लागतात. अगदी त्याचा अर्थ या संवादापेक्षा वेगळा असूनही…
सातवी गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं|  असं म्हणते. योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे-मतलबी झाल्याशिवाय राहील काय?
आठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवटपर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे. अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो. पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जसजसा पुढे जात राहातो , तसतसे बदलत जाते. तू माझी मैत्रीण आहेस, तू माझी बायको आहेस, तू आपल्या दोन मुलांची आई आहेस असे टप्पे हे उत्तर घेत राहाते.
आणि मग एका टप्प्यावर तो तिला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण,‘तुम मेरा बीता हुआ कल हो,  तुम मेरा आनेवाला कल हो; और तुम मेरा यह, अब, इस वक़्त का पल हो|’
हे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो. पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेव्हा ती त्याला मिश्किलपणे विचारते की, हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला?
आपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होत असतं ना…
नववा मुद्दा म्हणजे या सिनेमात ड्रायव्हर कोण आणि पेसेंजर कोण असा एक संवाद दोन-तीनदा नायक-नायिकेमधे आहे. आपणही तो प्रश्‍न आपल्या एकंदरीतच आयुष्याला; आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे. कारण प्रवाहात पोहणे, प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्‍चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणामही वेगवेगळा असतोच असतो.
अशा वेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकांची नावं अनुक्रमे ‘जय’ आणि ‘दिया’ आहेत हेही किती सूचक वाटू लागते ना!
अजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो. सुधारतो. बिघडतो. पण बदलतो. त्यात सहवासाचाही भाग असेल! काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगणचा, दीपिका पदुकोणच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंहचा, रणबीर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफचा अभिनय सुधारला. ‘राजनीती’मध्ये कतरीना बाहुली वाटते; तीच ‘कतरिना’ बार बार देखो हा सिनेमा तारून नेते. त्या न्यायाने गुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना, काळाच्या ओघात आपली गुंतवणूक ‘केली आहे, झालं’ ते  ‘तारणहार’ असा मुद्दा आहे. अगदी प्रश्‍न नसला तरी!
आता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे ‘बार बार देखो’ असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या गुंतवणुकीचा असा ‘बार बार देखो’ हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्‍न.
तुम्ही या प्रश्‍नाचे उत्तर तुमचे तुम्हालाच देईपर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणुकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप-क्षालन कसे करावे ते बघतो.
‘अरसिकेशू कवित्व निवेदनम, सिरसि मा लिख लिख’’ असं कोणी कधी म्हणायला नको!!

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under आसमंत, रसार्थ : चंद्रशेखर टिळक, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, रसार्थ : चंद्रशेखर टिळक, स्तंभलेखक (515 of 565 articles)

  chinese_crackers_baned
  वेधक : शेफाली वैद्य | दिवाळीचे फटाके आणायला दुकानात गेले होते. सगळ्या स्टॉल्स मध्ये अनिल, स्टॅण्डर्ड, अनमोल हे भारतीय बनावटीचेच ...