Home » आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक » माध्यमांमध्ये लक्षात घ्यावा लागणारा बदल?

माध्यमांमध्ये लक्षात घ्यावा लागणारा बदल?

•वेधक : शेफाली वैद्य |

अर्णब गोस्वामींचा राजीनामा ही काही दिवसांपुर्वीची सोशल मीडियातली ’सबसे बडी खबर’ होती, त्यावरूनच अर्णब गोस्वामींच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. पण अर्णब गोस्वामी आता पुढे काय करतील ह्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत.

arnab-goswamiटाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आणि सोशल मीडियाला जणू भूकंपाचा झटकाच बसला. अर्णब गोस्वामींचा ’न्यूज अवर’ हा रोज रात्री दहा वाजता प्रक्षेपित होणारा कार्यक्रम नेहमीच प्रचंड लोकप्रिय असायचा. अगदी पहिल्या दिवसापासून सतत चर्चेत राहिलेला हा कार्यक्रम ’नॉइज अवर’ ह्या छद्मी नावानेही ओळखला जायचा. अर्णब पाहुण्यांना स्टुडिओत बोलावतात, पण त्यांचा अपमान करतात, त्यांना  बोलूच देत नाहीत अशी टीकाही अर्णब यांच्यावर सतत व्हायची, पण अर्णब गोस्वामींचा हा कार्यक्रम अगदी २००७ पासून सतत प्रथम क्रमांकाचे टीआरपी रेटिंग्स खाऊन होता.
केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर राजकारणी, इतर पत्रकार आणि विविध क्षेत्रातले मान्यवर देखील हा एक कार्यक्रम आवर्जून बघायचे. हल्लीच शेखर गुप्ता ह्या पत्रकाराला एनडीटीव्ही वर मुलाखत देताना प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांनी देखील म्हटले होते की ते टीव्हीवर आवर्जून बातम्यांचा एकच कार्यक्रम दररोज बघतात आणि तो म्हणजे अर्णब गोस्वामींचा ’न्यूज अवर’! स्वतः सीएनएन न्यूज १८ ह्या वाहिनीचे मालक असलेल्या अंबानी ह्यांच्या ह्या कबुलीने शेखर गुप्तांसकट बर्‍याच पत्रकारांच्या नाकाला मिरच्या झोम्बल्या होत्या. टाईम्स नाऊ म्हणजे अर्णब आणि अर्णब म्हणजेच टाईम्स नाऊ असे समीकरण बनलेले होते. त्याच अर्णब गोस्वामींनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर वावड्यांना नुसता ऊत आला.
गोस्वामींनी टाईम्स नाऊ ही वाहिनी का सोडली असावी ह्याबद्दल असंख्य तर्कवितर्क करण्यात आले. कुणी म्हणालं की अर्णब गोस्वामींचे टाईम्स ग्रुपचे सीईओ विनीत जैन ह्यांच्याशी त्यांच्या ’अमन की आशा’ ह्या भारत-पाक कलाकारांच्या मैत्रीच्या कार्यक्रमावरून तीव्र मतभेद होते, आणि करण जोहरच्या ए दिल है मुश्किल ह्या चित्रपटाच्या वितरणाच्या वेळी चव्हाट्यावर आले, कारण विनीत जैन पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याच्या विरोधात होते तर अर्णब गोस्वामींनी आपल्या कार्यक्रमात बरोबर विरुद्ध बाजू घेतली होती. तर काही सूत्रांनी असे म्हटले आहे की टाइम्स नाऊ मध्ये सतत दहा वर्षे काम करून त्यांना कंटाळा आला होता व स्वतःची नवीन वृत्तवाहिनी सुरु करायची गोस्वामींची इच्छा होती म्हणून त्यांनी टाइम्स नाऊला रामराम ठोकला. ट्विटर मध्ये अश्याही बातम्या फिरत आहेत की खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याबरोबर अर्णब गोस्वामी भागीदारीत एक माध्यमसमूह सुरू करणार आहेत.
खरे-खोटे काळच ठरविल पण टाइम्स नाऊच्या लोकप्रियतेला अर्णबच्या जाण्यामुळे गळती लागणार आहे हे नक्कीच. बरखा दत्त, सागरिका घोस आणि राजदीप सरदेसाई वगैरे अर्णबच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या प्रतिस्पर्ध्यांनी मात्र नक्कीच सुटकेचा निःश्वास सोडला असेल. उद्या उसेन बोल्ट निवृत्त झाला तर जिल्हा पातळीवर धावणार्‍या लोकांना कसे हायसे वाटेल तसे काहीसे ह्या मंडळींना काल वाटले असेल.
अर्णब गोस्वामींचा राजीनामा ही काही दिवसांपुर्वीची सोशल मीडियातली ’सबसे बडी खबर’ होती, त्यावरूनच अर्णब गोस्वामींच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. दोन-तीनच दिवसांपूर्वी एनडीटीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या विक्रम चंद्रा ह्यांनीही आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता, पण त्यांच्या राजीनाम्याची फार कुणी दखलही घेतली नव्हती. पण अर्णब गोस्वामी आता पुढे काय करतील ह्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक (580 of 667 articles)


  •अर्थकारण : नरेंद्र जोशी | ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा रद्दबातल ठरविण्याच्या निर्णयाने बँकांकडे मोठा प्रमाणात पैसा जमा होणार ...