Home » आसमंत » सिंधूतट सभ्यता

सिंधूतट सभ्यता

डॉ. योगेश मुरकुटे |

mohenjo-daro-civilizationसिंध प्रांतात लारखाना नावाचे शहर आहे. या शहराजवळ कमी उंचीची एक टेकडी होती. स्थानिक प्रजाजन तिला ‘मोहेंजोदडो’ म्हणत असत. मृतांची थडगी असलेली टेकडी, असा मोहेंजोदडो शब्दाचा अर्थ आहे.
सन १९२२ साली राखालदास बॅनर्जी नावाच्या संशोधकाच्या समवेत शेकडो माणसे टेकडी खोदायला लागले. टेकडी खोदता खोदता अनेक पुराणवस्तू सापडल्या. सर्व खोदकामाच्या अंती जमिनीच्या पोटात गडप झालेले एक मोठे शहरच सापडले! सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे ते शहर होते.
पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी असे आणखी एक शहर खोदकामातून सापडले, त्याचे नाव हडप्पा! जरी या दोन शहरांमध्ये खूप अंतर असले तरी सापडलेल्या पुराणवस्तूंमध्ये मात्र सारखेपणा होता. संशोधनातून असे लक्षात येते की, पाच ते साडेपाच हजार वर्षांपूर्वी या भूभागात विकसित मानववसाहत होती. पुरातत्त्ववेत्त्यांनी मोहेंजोदडो किंवा हडप्पासारख्या सांस्कृतिक खुणा असलेल्या जवळपास १४०० जागा सप्तसिंधू नद्यांच्या खोर्‍यांतून शोधून काढल्या आहेत.
सिंधूतटावरील शहरांची रचना
मोहेंजोदडो अथवा त्या काळच्या इतर शहरांची रचना अत्यंत सुबकपणे आखीव आरखड्यांनुसार केलेली दिसून येते. रस्त्यांच्या दोन्हीही बाजूंनी घरं बांधलेली दिसतात. काही इमारती एक मजली तर काही दुमजली असावी, अशा बांधकामाची दिसून येतात. दुमजली इमारत किंवा ज्याचे आकारमान मोठे आहे, अशा इमारती बहुधा श्रीमंत लोकांच्या असाव्यात. एक मात्र खरे आहे की, घरं पक्क्या विटांनी बांधलेली आहेत. इमारतींच्या बांधकामात लाकडांचा व गवताच्या वेगवेगळ्या प्रजातीचा उपयोग होत असावा, असेही जाणवून येते. त्या काळी असणार्‍या शिक्षणपद्धतीमध्ये वास्तुविशारद हासुद्धा एक अभ्यासक्रम राहिला असेल, असे प्रकर्षाने लक्षात येते.
घरांच्या समोरून पाणी साचू नये म्हणून व पाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटारे आहेत. घरातील सगळे सांडपाणी त्यातून वाहून जात असे. घरांच्या रचनेवरून असे जाणवून येते की, सिंधू नदी किंवा तिच्या उपनद्यांना नेहमीच पूर येत असावा. पुराचे पाणी घरात शिरू नये म्हणून लोकांनी आपली घरं उंच जोत्यांवर बांधलेली दिसून येतात. आकाशातून अधिक उंचीवरून खाली बघितलं तर लक्षात येतं की, रस्त्यांची रचना ही चौकोनी, त्रिकोणी किंवा गोलाकार आहे. रस्त्यांच्या चौकाचौकांत कचरा टाकण्यासाठी कुंड्या केलेल्या आढळून येतात. यावरून असे लक्षात येते की, सिंधू-पुत्र आरोग्य आणि स्वच्छता यांची विशेष काळजी घेत असावेत. शहराच्या एका बाजूला सार्वजनिक स्नानगृह बांधलेले असायचे. त्यात पोहण्यासाठी सार्वजनिक तलाव बांधून काढलेले होते. कपडे बदलण्यासाठी शेजारीच खोल्याही बांधलेल्या आढळून येतात. खराब पाणी वाहून जाण्यासाठी बाजूलाच मोरी असायची व तिथून सगळे सांडपाणी वाहून जायचे.
पिण्याच्या पाण्यासाठी या लोकांनी जागोजागी पक्क्या विटांनी विहिरी बांधून काढल्या आहेत. साधारणतः घरोघरी विहिरी आढळून येतात. विहिरींच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा विटांनी बांधलेला आहे. म्हणजेच विहिरींच्या लगतचा परिसरात पाणी साचून घाण होऊ नये, याचीसुद्धा काळजी घेतलेली जाणवते.
काही उपयुक्त जागेत धान्याची कोठारे आहेत. बहुतेक करून त्या काळच्या परिस्थितीनुसार कर म्हणून लोक धान्य देत व ते धान्य अशा कोठारात साठवून ठेवत असत. शहरांमधील एकूणच अशी आराखडाबद्ध आखीव व्यवस्था पाहून लगेचच जाणवून येते की, पाच ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीही सिंधूतटावरील लोक सुधारलेले, पुढारलेले आणि सुसंस्कृत होते.
वेदांतील ऋचांच्या मांडणीनुसार आणि वेगवेगळ्या मंत्रांतून समजून येणार्‍या विश्‍लेषणातून लक्षात येते की, या लोकांचा मूळ व्यवसाय शेतीचा होता. गहू, जव, तीळ, तांदूळ इत्यादी पिके ते पिकवीत. विटा तयार करून त्या भाजण्याचा धंदा त्यांना जमू लागला होता. यामुळेच मुख्य बांधकाम त्या वेळी विटांचेच असायचे. या शिवाय गुरे पाळणे, मासेमारी हे उद्योगही ते लोक करीत. वेगवेगळ्या धातूंबद्दल त्यांना विशेष ज्ञान होते. त्यामुळे यज्ञात आहुती टाकताना त्या वस्तू मिळाव्यात, असा उच्चार ते आवर्जून करीत असत. यातील काही ऋचा पुढीलप्रमाणे-
व्रीहयश्‍च मे यवाश्‍च मे माषाश्‍च मे तिलाश्‍च मे
मुदगाश्‍च मे खलवाश्‍च मे प्रियङ्‌वश्‍च मेऽणवश्‍च मे
शामाकाश्‍च मे नीवाराश्‍च मे गोधूमाश्‍च मे
मसूराश्‍च मे यज्ञेन कल्पन्ताम् (यजुर्वेद ८-१२)
अर्थ ः हे यज्ञदेवता (लोककल्याणासाठी) आम्हाला अनेक प्रकारचे धान्य, जव, उडीद, तीळ, मूग, चणा, मटर, सांबा, कोंद, तांदूळ व त्याच्या प्रकारचे जंगली धान्य, गहू, मसूर असे विविध प्रकारचे अन्न प्रदान कर.
अश्माच मे मृत्तिका च मे गिरयश्‍च मे पर्वताश्‍च मे
सिकताश्‍च मे वनस्पतयश्‍च मे हिरण्यं च मे
शामं चे लोहं च मे सीसं च मे त्रपू च मे
यज्ञेन कल्पन्ताम् (यजुर्वेद ८-१३)
अर्थ ः हे यज्ञदेवता (लोककल्याणासाठी) आम्हाला खडक, माती, गोवर्धनसारखे छोटे छोटे पर्वत, हिमालयासारखे मोठे पर्वत, वाळू, वनस्पती, सोनं, तांबं, लोह, शिसे व इतर अष्टधातू प्रदान कर.
सिंधू-पुत्रांचे राहणीमान
सिंधूतटावर राहणारे सिंधू-पुत्र अंगपिंडाने धिप्पाड होते. हे लोक दूध, उडीद, मूग, गहू, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, खजूर आणि फळे खात. पुरुष, डोक्यावरील केस आणि दाढीचे केस राखीत, कंबरेला एक वस्त्र गुंडाळीत आणि अंगावर दुसरे वस्त्र पांघरून घेत. वेलबुट्टीचे कापड ते अंगावर घेत असत. हाच त्यांचा पोषाख होता. महिलांचा पोषाख साधरणत: असाच असे. त्यांच्या कानात कर्णफुले असायची, गळ्यात निरनिराळे दागिने व कंबरेला पट्टाही असायचा. त्यांचे दागिने सोनं, चांदी, तांबे, मणी, हस्तिदंत आणि भाजलेल्या चिकणमातीपासून तयार केलेले असत. कांसे नावाच्या धातूपासून तयार केलेले आरसे हे लोक वापरीत होते, असा उल्लेख आणि पुरावा सापडतो.
पुरातत्त्ववेत्त्यांना सापडलेल्या भांड्यांवरून, हे लोक प्रगत अवस्थेत राहात होते, असे सिद्ध होते. त्यांच्या भांड्यावर निरनिराळ्या पशुपक्ष्यांची चित्रे किंवा विविध आकाराचे ठसे आहेत. काही भांड्यांवर फुलं, पानंसुद्धा कोरलेली आहेत. उत्खननात सापडलेल्या एका भांड्यावर तर मासे पकडणार्‍या कोळ्याचे चित्र आहे. लहान मुलांसाठी मातीचे बैल, माकड, खाट, गिट्टी, चेंडू इत्यादी गमतीची खेळणी आहेत.
नृत्य, गायन आणि वादन या तिन्हीही कला त्यांना अवगत होत्या. काही प्रजाजन या कलांमध्ये पारंगत होते. उत्खननातून मिळालेल्या वस्तूंसोबतच नर्तिकेचे चित्र मिळालेले आहे. तिने केसांची सुंदर अशी रचना केली आहे. हातात वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घातल्या आहेत. या शिवाय आपला वेळ मजेत घालविण्यासाठी ते लोक सोंगट्या खेळत. साधारणतः पुरुष मंडळी धनुष्यबाण, भाला अथवा गोफण घेऊन शिकार करीत असत. या व्यतिरिक्त, सिंधू-पुत्रांना लिहिता-वाचता येत असे. शहरात काही मुद्रादेखील सापडलेल्या आहेत. त्यावरून लक्षात येते की, चित्ररूप खुणा ही त्या वेळी त्यांची एक प्रकारची लिपी होती. लिखाण कलेचा पूर्ण विकास झालेला असल्यामुळे मंत्रातील अक्षरांचा, वर्णाचादेखील अभ्यास पूर्णत्वास गेलेला होता, असे समजून येते.
सिंधू-पुत्रांचा विकास
कृषी हा सिंधू-पुत्रांचा मूळ व्यवसाय असल्यामुळे, गुरे ही त्यांची संपत्ती होती. खोर्‍यातील कुरणांमध्ये ते आपली गुरे चारीत. असा दिनक्रम अनेक वर्षे चालू होता. काळानुरूप कुरणे कमी पडू लागली. टोळ्यांच्या रूपात सिंधू-पुत्र मुख्य प्रदेश सोडून दूर दूर जाऊ लागले. पुढे अनेक वर्षांनंतर सप्तसिंधूचा प्रदेशही या लोकांना अपुरा पडू लागला. लोकसंख्याही वाढू लागली. म्हणूनच जागेच्या, कुरणांच्या, सुपीक जमिनींच्या कमतरतेमुळे सिंधू-पुत्रांच्या टोळ्या पुढे सरकल्या आणि गंगा व यमुना नद्यांच्या खोर्‍यांत त्यांनी प्रवेश केला. या सुपीक प्रदेशात त्यांनी काही वसाहती केल्या, राज्ये स्थापन केलीत. टोळ्यांच्या म्होरक्यावरून त्यांच्या वसाहतींच्या भूभागाला कुरू, पांचाल, कोसल, विदेह, गांधार इत्यादी अनेक नावे रूढ झाली. काही प्रदेशात अगोदरच राहाणार्‍या लोकांनी- ज्यांना आपण द्रविड या नावाने संबोधतो-त्यांनी या टोळ्यांना विरोधसुद्धा केला. तथापि, यांच्या टोळीसामर्थ्यापुढे त्यांचा टिकाव न लागल्यामुळे द्रविडांना दक्षिणेकडे सरकावे लागले. तरीपण सिंधू-पुत्र आणि द्रविड एकमेकांपासून फार काळ दूर राहिले नाही. दक्षिणेतील द्रविडीयन संस्कृतीत व्यापार, उद्योगधंदे, कला-कौशल्याची कामेदेखील भरभराटीस आलेली होती. दोघांनीही धार्मिक उत्सव, कलाकौशल्य व सामाजिक चालीरीतींची देवाणघेवाण केली. यातूनच नागपूजा, वृक्षपूजा आणि वेगवेगळ्या देवतांच्या पूजनाची प्रथाही पडली. शत्रूंचा नाश करणारा पराक्रमी इंद्र, सोसाट्याने वाहणारा वारा, शेती पिकवणारा पाऊस, प्रकाश व ऊर्जा देणारा सूर्य, गारठ्यात ऊब देणारा अग्नी, पहाटेला पूर्वेला लालसर रंगात प्रकट होणारी उषा या नैसर्गिक देवतांची उपासना वाढली. त्यांना संतुष्ट करण्यासाठी मंत्रजाप करून यज्ञ होऊ लागले. स्तुतिस्तोत्रेसुद्धा रचिली गेली आणि रूढ झालीत.
सप्तसिंधू खोर्‍यात, निरनिराळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या ऋषींनी रचलेली कवने किंवा सूक्ते पुढे एकत्रित केली गेली व त्यातूनच वेदांची रचना झाली असावी, असा एक मतप्रवाह आहे. साधारणतः एकाच प्रकारच्या बांधणीच्या आणि अर्थांच्या ऋचा एकत्र संग्रहित केल्या गेल्यात. यातूनच चार वेदांची घडवणूक झाली. ऋग्वेदावरून आपल्याला धर्म व त्यांची जीवनप्रणाली या संबंधीची माहिती मिळते. यजुर्वेदात यज्ञविधींची माहिती विस्तृत स्वरूपात मिळते. तालासुरावर आधारित गाण्यासाठी उपयोगात येणारी सूक्ते सामवेदात आहेत. भीती, रोगराई, दुःख इत्यादींचे निवारण करण्यासाठी रचलेली सूक्ते अथर्ववेदात आहेत. अशी सर्व सूक्ते मूळ संस्कृत भाषेत आहेत.
प्रारंभी सिंधू-पुत्रांमध्ये जाती नव्हत्या. ते वेगवेगळा व्यवसाय करीत. यावरून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वर्ण पडले. ब्राह्मण वर्ण इतर वर्णांसाठी देवतांची प्रार्थना करीत. मंत्र म्हणत. लोकांना ते शिकवीत व यज्ञ करीत असत. यज्ञांच्या रक्षणार्थ क्षत्रिय वर्ण उभा झाला. पुढे ते मोठे मोठे युद्ध करू लागले व यातूनच राज्यकारभार चालविण्याचे वेगळे तंत्र विकसित झाले. यज्ञांसाठी आणि लोकोपयोगी निरनिराळ्या वस्तूंची जमवाजमव वैश्य लोक करीत. प्रारंभी ते गुरे पाळीत, शेती करीत, पुढे पुढे ते व्यापार करू लागले. समाजातील इतर सर्व महत्त्वाची कामे करणारा वर्ग शूद्र वर्ण म्हणून उदयास आला. हीच चातुर्वर्ण्य व्यवस्था, ज्यामध्ये कामाच्या स्वरूपावरून वर्ण ठरत असे. एखाद्या व्यक्तीने लढण्याचे काम सोडून देवतांची प्रार्थना करण्याचे काम स्वीकारले तर तो क्षत्रियाचा ब्राह्मण होत असे. काळाच्या ओघात मात्र वाडवडिलांचा उद्योग, मुले वंशपरंपरेने करू लागली. कामाच्या स्वरूपावरून वर्ण ठरणे बंद झाले. पुढे परंपराच अशी झाली की, जन्मावरून वर्ण ठरू लागला आणि या पासूनच निरनिराळ्या जाती-जमाती वाढल्या.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत (441 of 470 articles)


  प्रसाद पवार | तेज, यश, सुख, ऊर्जा, उत्साह, आशा, विकास, सकारात्मकता या सार्‍यासार्‍यात अक्षरशः न्हाऊन निघावे ही मनीषा प्रत्येकाच्या मनात ...