सिगिरीयाची नवलकथा : १

•टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे |

sigriaश्रीलंकेत भटकंती करताना काही मजेदार गोष्टी दिसल्या. त्यातील एक अद्भुत वाटणारी म्हणजे सिगिरीयाचा किल्ला होय. केगालकडून गाडी वर चढून येते तो समोर सिगिरीयाचा प्रचंड मोठाकातळ दिसतो. सिंहगिरीचे हे अपभ्रष्ट रूप होय. सिंहली भाषेत असे अनेक संस्कृत शब्द अपभ्रष्ट रुपात आपल्या समोर येतात. मार्गात आपल्याला दुतर्फा छान रान दिसते. हिरवाकंच प्रदेश पाहून मन अगदी हरखून जाते. एका वळणावर अचानक ही टेकडी सामोरी येते. लांबून पाहताना तिची भव्यता जाणवत नाही. चढताना भल्या भल्यांना घाम फोडेल अशी चढण आहे. मुख्य म्हणजे असमांतर पायर्‍या आणि मध्येच लोखंडी अर्धवर्तुळाकार जिना अशी काहीशी रचना आहे.त्याच्याकाठांना धरून वर चढले की शिळेच्या पोटात एक भली मोठी भेग दिसते. त्यातून आत पाहिले कि अनेक स्त्रियांची चित्रे दिसतात. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार त्या कश्यप राजाच्या स्त्रिया आहेत. काही म्हणतात की, बुद्धभिक्खुंना आश्रय देणार्‍या राजघराण्यातील स्त्रियांची ती चित्रे आहेत. चित्रे छान दिसली तरी त्यात सफाई दिसत नाही. रंग नंतर परत भरले आहेत असे वाटते. आधीच्या चित्रांवर पुन्हा हात मारला आहे असे जाणवते.
चित्रे पाहून जिना उतरून पुन्हा वर चढायला सुरुवात केली की, डाव्या हाताला लागणार्‍या भिंतीला ङ्गमिरर वॉलङ्ख असेम्हणतात. तसे का म्हणतात, कुणास ठाऊक. हुश्श करीत वर पोचले की एक चौक येतो. त्यानंतर किल्ल्‌यावर जाण्याच्या पायर्‍या सुरु होतात. एके काळी तिथे प्रचंड मोठ्याआणि आ वासून बसलेल्या सिंहाचेशिल्प होते.पायर्‍या चढून त्याच्या मुखात प्रवेश केला म्हणजे पुढचा रस्ता दिसत असे. आज मात्र तो सिंह तिथे नाही. आता तो केवळ पुढच्या दोन पंजाच्या रूपाने उरला आहे. अजस्र पंजांवरील एकेक नख किमान चार फुट लांबीचे आहे. त्यावरून मूळ शिल्पाच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते.
दोनशे मीटर उंचीच्या या पहाडाच्या माथ्यावर चार एकर जागेत तब्बल १२८ खोल्यांचा राजप्रासाद होता. तो लायन माउंटन कश्यप राजाने इ.स. ४७७ मध्ये बांधला. हा बांधायला अठरा वर्षे लागल्याचे सांगितले जाते. पूर्व आणि पश्चिम दिशांना बागेची रचना, पाण्याची सोय आणि तीन बाजूंनी भक्कम तटबंदी उभारून किल्ला एकाच वेळी अत्यंत आल्हाददायक आणि सुरक्षित केला होता.
धातुसेन राजाला दोन राण्यांपासून कश्यप आणि मोगल्लाना अशी दोन मुले झाली. पुढे राज्य मोगलान्नाला मिळणार असे दिसू लागल्याने कश्यप संतप्त झाला. त्याने आपल्या वडिलांना ठार केले. त्यांना पाण्यात बुडवून मारले अथवा भिंतीत चिणून मारले असे दोन प्रवाद आहेत. त्यानंतर तो पळाला. त्याला मोगल्लाना गाठून मारेल याची भीती वाटू लागली. त्यामुळे तो अनुराधापूर येथूनसिगीरियाच्या सुरक्षित आश्रयाला आला. येथे त्याने हा अभेद्य व भक्कम किल्ला बांधला. पण मोगल्लाना त्याच्यावर चाल करून आला आणि त्याने कश्यपाला ठार केले.
कलहन्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |
कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ॥
मोठ्या एकत्र कुटुंबांचा शेवट आपुलकी-स्नेह कमी झाल्याने, अंतर्गत भांडणांमुळे होतो. खूप श्रीमंती असली तरी भाऊबंदकीमुळे वैभव रहात नाही. मैत्रीचा शेवट वाईट बोलण्याने होतो. राष्ट्राचा अन्त वाईट राजामुळे होतो तसेच अपकृत्यामुळे माणसाची कीर्ती लयाला जाते.
या गोष्टीसोबत आणखी एक कथादेखील सांगितली जाते. अर्थात खूप वर्षांपूर्वीच्या इतिहासाला अनेक दंतकथा येऊन चिकटतात. फार वर्षे जाऊ द्यात, पण अगदी गेल्या शतकभरातील ऐतिहासिक महापुरुषांबद्दलदेखील अशा काहीतरी दंतकथा प्रसवल्या जातात आणि सोशल मिडीयावरून त्यांची सत्यासत्यता तपासून न घेता आंधळेपणाने त्या पुढे पाठवल्या जातात. या गोष्टी अनवधानाने आणि एखाद्या कमी शिकलेल्या माणसाकडून झाल्या तर समजू शकते पण बहुतांशवेळा या गोष्टी शिकलेल्या लोकांकडून होतात. आलेल्या संदेशाचा अर्थ नीट जाणून न घेता तो पुढे पाठवायचे घाई असते ना, त्याला काय करणार? कोणी चूक दुरुस्त केली तर त्याला हटवादीपणाने आपण पाठवलेली माहितीच कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा खटाटोप असे शहाणे करतात.अशाअर्धवट ज्ञानी लोकांपेक्षा अज्ञानी परवडतात. ते किमान चूक सुधारायला बघतात.
ङ्गटू सन्स ऑफ धातुसेनङ्ख या आनंदस्थवीर नामक भिक्खुने लिहिलेल्या पुस्तकात वेगळीच कथा आहे.सिगिरीयाचे ते स्थान बुद्धभिक्खू आपल्या निवासासाठी वापरत होते. नागरी वस्तीपासून दूर एकांतासाठी म्हणून ती जागा उत्तम होती. सनपूर्व तिसर्‍या शतकापासून ती जागा हे भिक्खू उपयोगात आणत होते. एकदा कश्यप त्या ठिकाणी आला आणि त्याला ती जागा बघितल्यावर खूप आवडली. आजूबाजूला दृष्टी ठरणार नाही अशी सपाट जमीन दिसत होती. हिरवेगार जंगल आणि एकूण नयनरम्य असे हे ठिकाण आपल्या पाचशे स्त्रियांना घेऊन राहण्यासारखे आहे, असे त्याला वाटले. लगोलग त्याने एका वास्तुविशारदाला बोलावून ती जागा दाखवली आणि आपल्या मनातील कल्पना सांगितली. त्याने जागेचे नीट परीक्षण केले आणि होकार दिला. त्यानंतर बांधकाम सुरु झाले.
कश्यपाच्या मनाप्रमाणे त्याने उत्तम प्रासाद बांधला. त्याच्या राण्यांमधील एक, ही सेनापती मिगारा याची बहिण होती. त्यामुळे मिगाराचा कल कश्यपाकडे होता. पुढे राज्यावरून वाद निर्माण झाला तेव्हा कश्यप आणि धातुसेन यांचे तुंबळ युद्ध झाले. त्यावेळी मिगाराने हुशारीने मोगल्लानाला दूर पाठवून दिले होते. हार समोर दिसताच धातुसेनाने तलवारीने आपली गर्दन उडवली. मोगल्लाना परत येताच त्याला बापाच्या मृत्यूचे वृत्त समजले. तो कश्यपावर चालून गेला. ही लढत बरोबरीत सुटली. मग कश्यप आरामात सिरीगिरीयातील आपल्या राजवाड्यात राहू लागला. पण त्याला अनुराधापूरला कायमचे मुकावे लागले. कालांतराने त्याच्यात आणि मिगारात संघर्ष उत्पन्न झाला. आता मिगाराने मोगल्लानासोबत युती करून कश्यपावर हल्ला केला. त्यात पराभव दिसू लागताच कश्यपाने बापाप्रमाणे स्वतःची मान उडवली.
याच स्थानाची आणखी एक नवलकथा पुढच्या रविवारी पाहू.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे, स्तंभलेखक (533 of 565 articles)

  modi-putin
  •राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन करार केल्यानंतर सोबत अर्धेअधिक उत्पादन भारतात व्हावे, अशी भारताने अट घातली. ती रशियाने मान्य केली ...