Home » आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक » हिंदू सण आणि लिबरलांचे अरण्यरुदन

हिंदू सण आणि लिबरलांचे अरण्यरुदन

•वेधक : शेफाली वैद्य ||

festivalsकाही काळापूर्वी आपले सण कधी आहेत ते फक्त कालनिर्णय बघितल्यावरच कळायचं, पण हल्ली मला सोशल मीडियावरून सगळं पंचांग समजतं. ’दुष्काळ आहे, पाणी वाचवा’ हा संदेश त्याच त्या भेगा पडलेल्या मातीच्या चित्रासकट फिरायला लागला की समजावं, ’होळी आली वाटतं’. ’नवर्‍यासाठी पूजा करणं मला अमानुषपणाचं वाटतं’ असले जळजळीत स्त्रीवादी वगैरे संदेश पुरोगाम्यांच्या फेसबुक भिंतींवर झळकायला लागले की समजावं ’करवा चौथ किंवा वटसावित्री’ आलीच पुढच्या पंधरवड्यात! ’रावण कित्ती बै सभ्य होता’ असे संदेश फिरायला लागले म्हणजे समजायचं दसरा जवळ आला!
दिवाळी म्हणजे तर काय, पुरोगामी अरण्यरुदनाचे सुवर्णपर्वच! ’अगदी फटाके लावू नका, गोड खाऊ नका’ ह्यापासून सुरु होणारे संदेश पार ’पाडव्याला नवर्‍याला आणि भाऊबीजेला भावाला ओवाळू नका’ इथपर्यंतचे समाजप्रबोधक संदेश सर्दीत नाकातून अखंड शेंबूड गळावा तसे ह्या पुरोगामी वगैरे लोकांच्या वॉलवरून सतत गळत असतात. वर ’दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून सामाजिक कार्याला द्यावेत. देवळात हुंडीत पैसे घालायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून गरिबांना द्यावेत’ वगैरे शहाजोगपणाचे किरकोळ फुकटचे सल्ले असतातच.
मजेची गोष्ट अशी की हे सल्ले न मागता देणार्‍या ह्या लोकांपैकी बहुतेक लोक स्वतः कधी देवळात जात नाहीत आणि चुकून कधी गेलेच तर दहा रुपयांपेक्षा जास्त पैसे कधी हुंडीत टाकत नाहीत, पण दुसर्‍यांना फुकटचे उपदेश करायला कुणाचं काय जातंय? ’दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे’ हा ज्वलंत, सामाजिक प्रबोधनपर संदेश ह्यातले बरेच लोक बरिस्तामध्ये एकशेसाठ रुपयांची कॉफी पीत आपल्या साठ हजार रुपये किमतीच्या फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. पण ह्यांना जर कुणी विचारलं की ’बरिस्तामध्ये एवढी महाग कॉफी प्यायची काय गरज आहे? ते पैसे वाचवून तुम्ही सामाजिक कार्याला का नाही देत?’ तर लगेच, ’आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे हो’ असे म्हणून हे लोक गळे काढायला मोकळे.
मला व्यक्तिशः आपले हिंदू सण साजरे करणं मनापासून आवडतं. अगदी दिवाळी, दसर्‍यापासून ते रक्षाबंधनापर्यंतचे सगळे हिंदू सण मी आवडीने माझ्या कुटुंबियांसह साजरे करते. कालानुरूप सण साजरे करायच्या पद्धतीमध्ये बदल होतोच आणि ते अगदी साहजिकच आहे. खरे तर हिंदू निसर्गपूजकच आहेत. आपल्या सगळ्या सणा-समारंभांमध्ये ऋतुचक्राचा, निसर्गाचा सन्मानच केलेला आहे. दिवाळीपासून थंडीचा मौसम सुरु होतो म्हणून तेल लावून अभ्यंगस्नान करायचं. होळीला हिंवाळा संपतो, वसंत सुरु होतो, म्हणून शेवटची शेकोटी पेटवायची आणि वसंताचे रंग खेळायचे. गणपतीची मृण्मय मूर्ती घरी आणायची, तिची पूजा करायची आणि तिचं विसर्जन करायचं, कारण आपण पंचमहाभूतांपासून जन्मून परत त्यांच्यातच विलीन होणार. जेवण केळीच्या पानावर करायचं. संक्रांतीच्या वेळेला तीळ आणि गूळ शरीराला पचतो, पौष्टिकता देतो म्हणून तिळगुळ खायचे. ’गो ग्रीन’ वगैरे घोषणांची आपल्या पूर्वजांना कधी गरज भासली नाही कारण त्यांची पूर्ण जीवनशैलीच निसर्गाला पूरक, निसर्गपूजक अशीच होती. कालांतराने सण साजरे करायच्या पद्धतीत फरक पडला. त्याच बराच अनावश्यक फाफटपसाराही आलाच. त्यात बदल व्हायलाच पाहिजेत पण ते बदल आपले आपणच करू शकतो.
सध्या एकूणच हिंदू परंपरांना, हिंदू सणांना, हिंदू चालीरीतींना, प्रतिकांना सरसकट नावे ठेवणे हेच पुरोगामित्वाचे एकमेव लक्षण आहे असे समीकरण झालेले आहे. ’फेस्टिवलशेमिंग’हा त्याचाच एक भाग. सरसकट हिंदू सणांवर टीका करून हिंदूंना त्यांच्या चालीरीतींबद्दल शरम वाटायला लावणे हा एक खास स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांचा कावा आहे. त्याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायची गरज नाही. सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण हिंदू सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका.
मी स्वतः सगळे सण दणक्यात पण माझ्या वैयक्तिक मूल्यपद्धतीनुसार साजरे करते. दिवाळीला मुलं मातीत खेळून किल्ला करतात. आमचा आकाश कंदील कागदाचा, हाताने केलेला असतो. फटाके असतात पण भारतीय बनावटीचे आणि तेही कमी आवाज करणारे. पणतीचा मंद उजेड मला फार आवडतो त्यामुळे मी पणत्या खूप लावते दिवाळीत, आणि माझ्यातर्फे दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक काम करणार्‍या काही संस्थांना जमेल तेव्हढी मदतही करते मी. रक्षाबंधनाच्या दिवशी माझी मुलं आणि मुलगी एकमेकांना राखी बांधतात कारण रक्षण तिघांनाही एकमेकांचं करायचं असतं. नवरात्रीत मी शक्तीची उपासना करते, सरस्वतीची उपासना करते तेव्हा माझ्या लेकीत मला निर्भय, समर्थ, कुठल्याही राक्षसाच्या निर्दाळनाला सज्ज अशी देवी दिसते. माझ्या धर्माबद्दल, माझ्या परंपरांबद्दल मला अभिमान आहे. हिंदू सदैव काळाबरोबर बदलत आलेला आहे. आमचे सण आम्ही कसे साजरे करू, त्यात काळानुरुप बदल कसे करू हे ठरवायला आम्ही सामान्य हिंदू समर्थ आहोत. धर्माशी, परंपरांशी काही देणे घेणे नसलेल्या लोकांकडून धडे घेण्याची आम्हाला गरज नाही.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, वेधक : शेफाली वैद्य, स्तंभलेखक (621 of 650 articles)


  •अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष देशपांडे १९१६ मध्ये आईन्स्टाईन म्हणाला होता की, गुरुत्वीय लहरी (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्) असतात. शंभर वर्षांनी २०१६ मध्ये, ...