हौस माझी पुरवा…

विनोद पर्व : उदयन ब्रह्म |

dada-dadiलाडावलेल्या इच्छेचं दुसरं गोंडस नाव हौस असावं, असं मला वाटतं. ज्या इच्छेच्या मार्गावर थोडासा हट्ट आहे, लाडिक हेका आहे, थोडासा रुसवा-फुगवापण आहे, ती इच्छा माझ्या मते हौस या प्रकारात मोडते. हौशीलाल आणि हौसाबाई भरपूर असतात. अगदी सरत्या वयाच्या उंबरठ्यावरसुद्धा हौस राहून गेलेली असते. ही राहिलेली हौस केव्हा आणि कशी मनाला व्यापून वादळासारखी तोंडावाटे बाहेर पडेल, हे काही सांगता यायचं नाही.
आमच्या मित्राच्या आजी-आजोबांचा आठवड्यातून दोन-तीनदा तरी ‘हौस माझी राहिली गं’ या अंकाचा प्रयोग होत असे. आम्ही त्याच्याकडे कॅरम, पत्ते असले बैठे खेळ खेळायला जात असू आणि त्यात ह्या ऑडिओ व्हिज्युअलचापण कधीकधी समावेश असे. ‘‘तुम्ही काय केले हो माझ्या साठी?’’ आजींच्या ह्या वाक्याने प्रयोग सुरू होई.
‘‘काय केलं नाही ते विचार.’’ हातातील कवळी तोंडात ढकलीत आजोबा संवादाच्या आखाड्यात उतरत.
‘‘राहू द्या हो. कधी हौस नाही की मौज नाही, तरुणपणी मला कितीदा वाटायचं की, मी असा दळणाचा डबा तुम्हाला देतेय आणि तुम्ही तो चक्कीवर नेताहात. मी दारात उभी राहून तुमची वाट पाहतेय् आणि तुम्ही कणीक माखून घरी आलेला आहात आणि मी पदराने तुमचा चेहरा पुसते आहे, नाजूक हातांनी तुमच्या केसांवरची कणीक उडवते आहे.’’
‘‘ही असली हौस होती तर एखाद्या चक्की कामगाराशी लग्न करायचं असतं. चोवीस तास कमी पडले असते कणीक झटकायला. म्हणे पदारानी तोंड पुसायचं होतं! तोंडाला पदर नाही, पण प्रत्येक वेळी तू पानं पुसलीत. मला गुळाचा शिरा किती आवडायचा. वाटायचं की, असा तो गोड शिरा तोंडात घोळवीत, तुझ्या हाताच्या शिरा दाबीत लाडिकपणे तुझ्याशी बोलावं…’’
‘‘मग केला नाही शिरा? दर महिन्याला एक-दोन किलो कणीक आणि किलोभर गूळ याच कारणासाठी फस्त व्हायचा.’’
‘‘मान्य आहे मला. पण त्या शिर्‍याची क्वालिटी… अरेरे, असा तोंडात टाकला की अर्धा तास जीभ टाळूला चिकटून बसे. शिरा आहे की फेव्हिकॉलमध्ये कालवलेली गोड कणीक खातोय, कळायचं नाही! सगळं लाडिक बोलणं राहून गेलं…’’
अनेकांच्या अनेक हौशी राहून गेलेल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी काक दृष्टीनी ते मोका शोधत असतात. आमचा एक मित्र प्रत्येक बाबतीतच थंड. पहिलं अपत्य त्याला साडेसात वर्षांनी झालं. स्वत:ची मान त्याला नव्वद अंशातून फिरवायला मिनिटभर वेळ लागतो. इतर बाबतीत तर विचारूच नका! हौसेच्या बाबतीत त्याची बायको त्याला ‘डलहौसी’ म्हणते. पण, त्या वहिनी हुशार. चटपटीत. त्यामुळे त्याच्या प्रपंचाचा तो गार्डचा डबा, तर वहिनी इंजीन. त्यांची पैठणीची हौस राहून गेली. मित्राने पोराच्या मुंजीत पैठणी घेऊन देतो म्हणून कबूल केलं, पण ते काही साधलं नाही. मुलाच्या लग्नापर्यंत पैठणीसाठी थांबायचा त्या वहिनींना काही धीर नव्हता. त्या संधीची वाटच पाहत होत्या आणि ती संधी चालून आली. मित्राची आई गेली. पिकलं पान होतं, एक दिवस गळालं. तसं म्हातारी मजेत जगली होती. आता कधीतरी जगाचा निरोप घ्यावाच लागतो, त्यानुसार म्हातारीने राम म्हटले. सगळे विधी यथासांग झालेत, पण पिंडाला कावळा काही शिवेना. म्हातारीची काय इच्छा राहिली असेल? कुठली हौस पुरवायची राहिली? या सगळ्यांचा विचार सुरू झाला. तेव्हा या वहिनी उठल्या आणि जड अंत:करणानी म्हणाल्या, ‘‘खरं म्हणजे हा प्रसंग असले काही बोलण्यासारखा नाही. पण, तुमचा विश्‍वास आहे की, कावळा पिंडाला शिवल्याशिवाय त्यांना काही मुक्ती मिळणार नाही म्हणून सांगते. माझं मेलं पदरचं काही नाही हो. नाही तर तुम्ही मलाच नावं ठेवाल. नाही तर राहू द्या. मी न बोललेलंच बरं…’’ असं म्हणून त्या वहिनी गप्प बसल्या, पण त्यांनी सस्पेंस असा क्रिएट केला होता की, त्या गप्प बसल्या तरी इतर त्यांना गप्प बसू देणं शक्यच नव्हतं. आमच्या मित्रानी झट्‌दिशी मान वर केली. अर्थात एवढं करायला त्याला अर्धा मिनिट लागला, पण पूर्वीपेक्षा त्याने तीस सेकंद मेकअप केले होते. ‘‘बोल ना. नको तेव्हा वरवर करते आणि नको तेव्हा अर्धवट बोलते, बोल आता.’’
‘‘बघा, म्हणजे गैरसमज नको. म्हणजे सासूबाई आजारी होत्या तेव्हा त्याच म्हणाल्या, सुमे तुला पैठणीत पाहायची इच्छा होती. ती एक इच्छा राहिली बाई माझी. खरंच, सासूबाई किती चांगल्या होत्या. एवढ्या उच्च कोटीची इच्छा कोणाला नसते. पण, राहिली बाई त्यांची ती इच्छा!’’
मित्रासमोर इलाज नव्हता. सूनबाई पैठणी नेसल्या आणि तो कावळा पैठणीवाल्या दुकानदाराने पोसला होता की काय देव जाणे, पण बाईनी पैठणी नेसल्याबरोबर पिंडाला लागला.
हौसेला मोल नसतं आणि फारसा धीरही नसतो. गोंदवलेकर महाराज म्हणत की, आलेली खोकल्याची उबळ आणि उलटी दाबता येत नाही, तशी ही हौस दुसर्‍याने दाबू म्हटल्याने दबत नाही. ती थयथयाट करीत रौद्ररूप धारण करते. आपली हौस दुसर्‍याच्या मोलाने पूर्ण करता आली, तर धन्यता वाटते. लग्नात यामुळे रुसवेफुगवे होतात. एका सासूबाईंनी सुनेच्या आई-वडिलांसमोर नाराजी व्यक्त केली, ‘‘लग्न चांगलं केलं हो, पण कारल्याच्या वेलाखालून जायची माझी हौस काही पुरवली नाही. अशाने अंगभूत कडवटपणा जाणार कसा?’’ सुनेकडच्यांनी लगेच दिवाळसणाला सासूबाईंना कारले लटकवलेल्या मच्छरदाणीत रात्रभर झोपवले.
हौस असावी. अनेकदा ते मनातल्या आनंदाचं व्यक्त स्वरूपही असतं. पण, तीला संयमाची झालर असावी, अट्‌टहासाचे घुंगरू तिच्या पायात नसावे आणि ‘हौस माझी पुरवा’ म्हणण्याआधी स्वत:च्या आणि दुसर्‍याच्याही खिशाचा विचार जरूर व्हावा.

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under आसमंत, विनोद पर्व : उदयन ब्रह्म, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, विनोद पर्व : उदयन ब्रह्म, स्तंभलेखक (542 of 649 articles)


  अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष देशपांडे | शैशवातल्या मीरेने वरात पाहिली आणि आपल्या आईपाशी हट्ट धरला की, ‘‘माझा नवरा कुठाय्? मला ...