पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
5 Oct 2018►अनेक विक्रमांना गवसणी,
राजकोट, ४ ऑक्टोबर –
वय अवघे १८ वर्षे… मात्र, ज्युनियर क्रिकेटपटू म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाढा… अशाच सीनियर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली… कसे होणार… दडपण तर राहणार नाही ना… त्यातही प्रतिस्पर्धी संघ वेस्ट इंडीजचा… या सार्यांची पर्वा न करता तो सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत खेळला… अनेक विक्रमांना गवसणी घातली… आणि त्याने वेस्ट इंडीजच्या सर्वच प्रकारच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत पदार्पणाच शतक साजरे केले. पृथ्वी शॉ नावाचा हा वरिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्या कसोटीत उत्तीर्ण झाला आहे. एवढेच नव्हे तर शतक काढून त्याने गुणवत्ता यादीतही स्थान मिळविले.
विंडीज गोलंदाजांनी पृथ्वी शॉच्या फलंदाजीसमोर अक्षरश: प्रदक्षिणा घातली. फिरकी असो की वेगवान गोलंदाज पृथ्वी शॉने विंडीज गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढविला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातच शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ९९ चेंडू खेळून काढताना १५ चौकारांच्या साह्याने आपल्या या शतकी धावा पूर्ण केल्या.
या शतकासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम मोडीत काढले. पृथ्वीने रणजी चषक, दुलिप चषक आणि आता कसोटी या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतके ठोकली.
९ नोव्हेंबर १९९९ रोजी जन्मलेल्या पृथ्वी शॉचे वय आजमितीला १८ वर्षे ३२९ दिवस आहे. त्यामुळे पृथ्वी हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा भारतातील सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकरने हा पराक्रम केला होता. सचिनने १७ वर्ष १०७ दिवस वय असताना कसोटी शतक झळकावले होतं. मात्र, सचिनचे ते पदार्पणातले शतक नव्हते.
पृथ्वी हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा जगातील चौथा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशचा मोहम्मद अश्रफुल हा जगातील सर्वात युवा क्रिकेटपटू आहे ज्याने वयाच्या १७ वर्षे ६५ व्या दिवशी कसोटी पदार्पणातच शतक झळकावले होते. त्यानंतर झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मास्कादझा याने १७ वर्षे ३५४ व्या दिवशी, पाकच्या सलिम मलिकने १८ वर्षे ३२८ व्या दिवशी व आता पृथ्वी शॉ याने १८ वर्षे ३२९ दिवशी शतक साजरे केले आहे.