Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » अखिलेश-शिवपाल यादव हाणामारीवर उतरले!

अखिलेश-शिवपाल यादव हाणामारीवर उतरले!

♦नवीन पक्ष स्थापन करणार नाही
♦नेताजींनी आदेश दिल्यास राजीनामा : अखिलेश
shivpal-akhileshलखनौ, [२४ ऑक्टोबर] – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव अक्षरश: हाणामारीवर उतरले होते. दोघांनीही एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप केले आणि पक्षाला इतक्या भीषण संकटात आणण्यासाठी एकमेकांना जबाबदार ठरवले.
अखिलेश आपली बाजू सादर करीत असताना शिवपाल यादव त्यांच्या बोलण्यावर वारंवार आक्षेप घेत होते. तुम्ही किती खोटे बोलत आहात, असे शिवपाल यादव सांगत होते. तर, तुम्हीच माझ्या आणि मुलायमसिंह यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तुमच्यामुळे आणि अमरसिंह यांच्यामुळे पक्ष व सरकारवर अशी वेळ आली आहे, असे अखिलेश म्हणत होते. ऑक्टोबरमध्ये पक्षात बरीच उलथापालथ होणार असल्याचे अमरसिंह मला एकदा बोलले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. या वादावादीत एकमेकांवर चालून जाण्यापर्यंत दोघेही पुढे सरसावले होते. पण, मुलायमसिंह आणि अन्य नेत्यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रसंग टाळणे शक्य झाले.
मी आता नवा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक लढणार आहे, असे मला स्वत: अखिलेश यांनीच सांगितले. त्यांच्यामुळे पक्ष संकटात आला असल्याने मुलायमसिंह यादव यांनी आता सरकारची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, असे मत शिवपाल यादव यांनी मांडले.
वातावरण शांत झाल्यानंतर, अखिलेश म्हणाले की, मी सपातून बाहेर पडणार नाही आणि नवा राजकीय पक्षही स्थापन करणार नाही. माझे वडील माझ्यासाठी गुरूसारखे आहेत. त्यांनीच मला राजकारणात आणले आणि मुख्यमंत्रिपदावर बसविले. त्यामुळे त्यांनी आदेश दिल्यास मी पदाचा तत्काळ राजीनामा देईन, अशी नरमाईची भूमिका घेतली.
पक्षाचे आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आपली बाजू मांडताना अखिलेश यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. मला घडविणारे माझे वडील आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने मी या पदावर आहे. त्यांनी आदेश दिल्यास आता याच क्षणाला मी राजीनामा देईन, असे त्यांनी सांगितले.
माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत. मी पक्ष का सोडावा आणि नवा पक्ष का स्थापन करावा. सपात फूट पडेल, असे कोणतेही काम मी करणार नाही. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांची सेवा करण्याशिवाय मी दुसरे काहीच केले नाही. माझ्या कुटुंबात फूट पडावी, यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अशा लोकांना कसे हाताळायचे, हे मला चांगलेच माहीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सपा मुख्यालयाबाहेर अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले
समाजवादी पार्टीतील विशेषत: यादव कुटुंबातील महाभारत संपुष्टात आणण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज सोमवारी सकाळी बोलावलेल्या बैठकीपूर्वी सपाच्या मुख्यालय परिसरात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लखनौमध्ये ठिकठिकाणी दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर आले होते.
रविवारपासूनच सपाच्या मुख्यालयासह शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांवर भिडले होते. मुख्यालयाकडे कूच करण्यासाठी त्यांनी सुरक्षा कठडे ओलांडण्याचाही प्रयत्न केला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
बैठक सुरू होण्यापूर्वीच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांचेच समर्थन करावे, अशा घोषणा समर्थकांकडून देण्यात येत होत्या. त्यांना नियंत्रित करताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांना मारहाण करीत होते. पोलिस हा सर्व प्रकार शांतपणे पाहात होते.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1742 of 1796 articles)


  =ट्रस्टची सुप्रीम कोर्टाला ग्वाही= नवी दिल्ली, [२४ ऑक्टोबर] - मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या वादावर आज सोमवारी अखेर ...