Home » छायादालन, ठळक बातम्या, मराठवाडा » औरंगाबादेत भीषण अग्नितांडव

औरंगाबादेत भीषण अग्नितांडव

♦आगीच्या तांडवात औरंगपुरा फटाका मार्केट जळून खाक
♦फटाके, वाहने मिळून ५० कोटींची हानी, १०० जण भाजल्याची भीती,

प्रतिनिधी
औरंगाबाद, [२९ ऑक्टोबर] – जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका मार्केटला लागलेल्या आगीत सर्वच्या सर्व १५० दुकाने जळून भस्म झाली. आगीत सुमारे १५ कोटींचे फटाके तसेच ५० हून अधिक चारचाकी व १०० दुचाकी वाहने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही आग कोणी लावली या बद्दल तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. फटाके फुटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्याचा फटका शेजारी असलेली दुकाने स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, जिल्हा परिषदेला बसला. आग कशामुळे लागली हे शोधण्यासाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. सुदैवाने आगीत कुणीही मृत झाल्याचे वृत्त नाही तथापि १०० जण भाजल्याचे वृत्त आहे. आगीत जवळपास ५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावरील हे फटाका मार्केट जुने आहे. चार दशकापूर्वी हे मार्केट शिवाजी मैदान आमखास येथे भरत होते. या काळात तेथील मार्केटला अशीच भीषण आग लागली होती. त्यानंतर सुरक्षितता म्हणून हे मार्केट औरंगपुर्‍यात आले. आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रथम दुकान नं. ४८ येथे कुठून तरी ठिणगी पडली असावी किंवा फटाक्याच्या माळेला आग लावली यावरून ही आग भडकली. एका मागून एक फटाके, बॉम्ब फुटून धावपळ, पळापळ सुरू झाली. चेंगराचेंगरीही झाली. आगीचे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्था, अग्निशमन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे वृत्त बघता बघता संपूर्ण शहरात बार्‍यासारखे पसरले. तसेच पदमपुरा, एमआयडीसी सिडको, शेंद्रा एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी, गरवारे कंपनी, विमानतळ प्राधिकरण येथील अग्निशामक बंद आणि टँकर घटनास्थळी रवाना झाले. तसेच घाटी हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलच्या ५० ऍम्बूलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत काही जण भाजून जखमी झाले. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले आहे.
अग्निशामक यंत्रणाच जबाबदार?
फटाका मार्केटमध्ये अग्निशमन दलाची गाडी तैनात केलेली असावी, असे असताना औरंगपुरा फटाका मार्केटमध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. जर ही गाडी असती तर आग भडकली नसती. यावरून अग्निशामक यंत्रणा किती कुचकामी आहे हे दिसून येते. मनपाने या आगीपासून शहाणे व्हावे आणि सिडको, हडको, चिकलठाणा, छावणी, मुकुंदवाडी आदी भागात असलेल्या फटाका मार्केटला संरक्षण द्यावे. दरम्यान, आगीला जबाबदार मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. याप्रकरणी अग्निशामक विभागप्रमुख शिवाजी झनझन यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी भिमसेनेचे संस्थापक अध्यक्ष विशालभाऊ पाखरे यांनी केली आहे.
दोन तास अग्नितांडवाचा खेळ?
आगीच्या या दोन तासाच्या तांडवात किती लोक जखमी झाले याची अधिकृतरित्या माहिती प्रशासनाने दिली नाही. आगीत काही लहान मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.३० वाजता लागलेली ही भीषण आग दुपारी १.३० वाजेपर्यंत नियंत्रणात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. आगीचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय्, महापौर त्र्यंबक तुपे, खा. चंद्रकांत खैरे, सभापती मोहन मेघावाले, माजी आमदार प्रदिप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपायुक्त संदिप आटोळे, वसंत परदेसी, सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पो.नि. मधुकर सावंत, क्रांतीचौक ठाण्याचे नागनाथ कोडे यांच्यासह सिटीचौक, बेगमपुरा, छावणी, जिन्सी येथील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक त्या सुचना आणि मदत कार्य केले.
शहरावर शोककळा
औरंगपुरा फटाका मार्केटला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण फटाके फुटून व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी या व्यापार्‍यांना ही दिवाळी काळी दिवाळी ठरली. काहींनी फटाके विक्री करून नफा कमावण्यासाठी व्याजाने पैसे काढले. एैन नरक चतुर्दशीला आग लागल्याने व्यापारी सैरभर झाले आहेत. आगीची भीषणता एवढी होती की, सर्व दुकानदार दुकाने सोडून जिव वाचविण्यासाठी पळत सुटले. अचानक झालेल्या धावपळ, पळापळीमुळे फटाका खरेदीसाठी आलेल्या अबालवृध्द व वाहनधारकांनी आपली वाहने सोडून पळ काढला. २० ते २५ मिनिटांतच सर्व दुकाने तसेच मैदानातील शेकडो वाहने जळून खाक झाली. आकाशात आगीचे उंचच उंच लोळ उठत असल्याने या परिसरात घबराट निर्माण झाली होती.
फटाका मार्केटला विरोध
जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाका मार्केट भरवू नका, येथे परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक कॉलनीवासीयांनी केली होती. परंतु त्यांच्या निवेदनाला जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखवून याच जागेवर फटाका मार्केटला परवानगी दिली. ही बाब खटकणारी आणि उल्लेखनिय होय.

प्रशासन जबाबदार – आ. सावे
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेला अतिशय ढिसाळ प्रशासन जबाबदार आहे. मनपा प्रशासनाने या फटाका मार्केटमध्ये कायमस्वरूपी अग्निशामक बंब ठेवायला हवे होते. घटना कळाल्यानंतरही खाजगी टँकर्स आधी पोहोचले आणि अग्निशामक नंतर पोहोचले अशी टीका आ. अतुल सावे यांनी केली.
प्रशासनाला सूचना दिल्या होत्या – महापौर
ही घटना कळाल्यानंतर तातडीने मी घटनास्थळी आलो. वास्तविक फटाका मार्केट उभे रहात असतानाच मी सुरक्षेबाबत प्रशासनाला सर्व सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी निष्काळजी पणा केला आहे. त्याबाबत चौकशी करून कारवाई करू असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले.
काळजी घ्यायला हवी होती – रहाटकर
हे फटाका मार्केट मध्यवस्तीत असल्याने धोकादायक आहे. वास्तविक अशी घटना घडण्याआधीच प्रशासनाने अधिक काळजी घ्यायला हवी होती असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
नुकसान भरपाई देवू – खा. खैरे
झालेेली घटना अत्यंत दुर्देवी असून अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मनपाकडून नुकसान भरपाई देवू, असे खा. चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
चौकशीसाठी दहा पथके – जिल्हाधिकारी
फटाके मार्केटला आग लागताच १० ते १५ मिनिटांत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याच्या कामी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांची आगीच्या चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. दोन तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १० पथके तयार करण्यात आले आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in छायादालन, ठळक बातम्या, मराठवाडा (1594 of 1705 articles)


  =औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल= प्रतिनिधी औरंगाबाद, [२९ ऑक्टोबर] - स्थानिक स्वराज्य संस्था औरंगाबाद-जालन्याचे आमदार सुभाष झांबड यांनी नगरसेवक आणि जि.प. ...