ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास : हा पुत्र ज्ञानदेवतेचा!

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास : हा पुत्र ज्ञानदेवतेचा!

॥ विशेष : डॉ. कुमार शास्त्री |

या राष्ट्राला ज्यांनी ‘वेदातील राष्ट्रदर्शन’ घडविले, शाश्‍वतसत्य, धर्म आणि संस्कृतीवर आपल्या ओघवत्या, ऊर्जस्वल आणि रससिद्ध वाणीने उद्बोधन केले, राष्ट्रीय विविध प्रश्‍नांवर, प्राच्य संस्कृतीवर ज्यांनी खंडश: ग्रंथनिर्मिती केली, अशा साहित्याचार्यांची ही जन्मशताब्दी ३० जुलैला पूर्ण होतेय. ३० जुलै १९१८ चा त्यांचा जन्मदिवस. सर्वंकष पांडित्यपूर्ण, रससांद्र वक्तृत्व आणि तेवढीच विद्वत्तापूर्ण खंडात्मक ग्रंथसंपदा! हे दोन्ही पैलू इतके देदीप्यमान होते की, त्यांची कीर्तिप्रभा सर्वदूर लोकप्रिय झाली होती. खरोखरीच एक अलौकिक, असामान्य असं विदर्भाला लाभलेलं ते बुद्धिवैभव होतं!

Balshastri Hardas

Balshastri Hardas

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास महाराष्ट्रातील व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व. प्रकांड पंडितच. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. तसे पाहता नवीन पिढीला बाळशास्त्री यांचं नाव अपचरिचित असणे स्वाभाविक आहे, तेव्हा त्यांचे महाराष्ट्राला ललामभूत ठरणारे पांडित्यपूर्ण योगदान कुठे माहिती असणार! खरंतर अशा चतुरस्र, विद्वत् विभूतिमत्त्वावर आमच्यासारख्याने लिहिणे म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’ करण्याजोगे आहे.
या राष्ट्राला ज्यांनी ‘वेदातील राष्ट्रदर्शन’ घडविले, शाश्‍वत सत्य, धर्म आणि संस्कृतीवर आपल्या ओघवत्या, ऊर्जस्वल आणि रससिद्ध वाणीने उद्बोधन केले, राष्ट्रीय विविध प्रश्‍नांवर, प्राच्य संस्कृतीवर, ज्यांनी खंडश: ग्रंथनिर्मिती केली, अशा साहित्याचार्यांची ही जन्मशताब्दी ३० जुलैला पूर्ण होतेय.
३० जुलै १९१८ चा त्यांचा जन्मदिवस. सर्वंकष पांडित्यपूर्ण, रससांद्र वक्तृत्व आणि तेवढीच विद्वत्तापूर्ण खंडात्मक ग्रंथसंपदा! हे दोन्ही पैलू इतके देदीप्यमान होते की, त्यांची कीर्तिप्रभा सर्वदूर लोकप्रिय झाली होती. खरोखरीच एक अलौकिक, असामान्य असं विदर्भाला लाभलेलं ते बुद्धिवैभव होतं!
विदर्भाचे विद्वत नेते बापूजी अणे म्हणायचे, ‘‘बाळशास्त्री केवळ साहित्याचार्य नव्हते, तर ते चालतेबोलते विद्यापीठ होते.! त्यांना अविषय असा नव्हताच. ‘सहस्रेेषुच पंडित:’ ही त्यांची ओळख होती. ‘वेदगंगेच्या तीरीच’ त्यांचा निवास होता म्हणा ना!
देवता ‘श्रीदक्षिणामूर्ती’ त्यांचं उपास्यदैवत. ‘दक्षिणा’ म्हणजे ‘ज्ञान.’ शंकराने ॠषिमुनींना ज्ञान देण्यासाठी हा ‘ज्ञान’ अवतार घेतला. ज्ञानमूर्ती म्हणजे दक्षिणामूर्ति. दक्षिणामूर्ती देवस्थान हेच निवासस्थान होते. त्या काळी नागपूरातील महालातील हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध होते. महामहोपाध्याय बाळशास्त्रींची प्रवचने, कीर्तने ऐकायला दुरून येणारे श्रोते इतकी गर्दी करायचे, की तो गजबजलेला परिसर पुढे ‘दक्षिणामूर्ती चौक’ झाला!
आमचंही बालपण दक्षिणामूर्ती चौकात गेलं. त्यातून आजोबा दाजीशास्त्री चांदेकर, वडील शंकरराव यांचा बाळशास्त्री हरदास यांचेशी स्नेह व घरोबा. घरोबा असल्यानेच श्रीमती वीणाताई हरदास (बाळशास्त्रींच्या पत्नी) यांनी मला ‘दक्षिणामूर्ती-पंजरस्तोत्र’ दिलं, त्यांत एक सुंदर निवेदन आहे. भक्तीने, श्रद्धेने जो हे स्तोत्र पठन करतो तो एक विद्वान पंडित होतो! ‘दक्षिणामूर्ति: प्रसादात् पंडितो भवेत’- ही प्रचीती बाळशास्त्री हरदासांच्या जीवनात शतप्रतिशत सर्वांनी अनुभवली. त्यांचं पांडित्यपूर्ण वक्तृत्व आणि विद्वत्ताप्रचुर लिखाण ज्यांनी ज्यांनी वाचले ते म्हणतात- हा तर पुत्र शारदेचा… नव्हे, हा पुत्र ज्ञान देवतेचा! (दक्षिणामूर्तीचा) खरं आहे. असेच घडले. गणित जमत नाही म्हणून लहान वयातच आठव्या वर्गानंतर शास्त्रीबुवा प्राच्य विद्येकडे वळलेत. अवघे अठरा वर्षांचे असताना त्यांनी काव्यतीर्थ, वेदान्ततीर्थ आणि साहित्याचार्य या तीनही परीक्षा उत्तमश्रेणीत पास केल्यात. पंडितसम्राट घुलेशास्त्री यांचेकडून संस्कृत, पं. श्रीनिवास शास्त्री यांचेकडून संस्कृतची पंचमहाकाव्ये आणि काशीचे पंडित भाऊशास्त्री वझे यांचेकडून वेदान्तशास्त्राचा अभ्यास ते करते झाले. गुरुकुल परंपरेतून वेदविद्या, उपनिषदे यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून, मूळ प्रमेयांचा तर्कशुद्ध मागोवा घेणं, हा त्यांच्या अध्ययनाचा स्थायीभाव होता.
त्यांचा अव्याहत व्यासंग पाहून गोवर्धनपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी प्रदान केली. बाळशास्त्रींच्या व्याख्यानाचे व लेखणीचे विषयांवर जर एक दृष्टिक्षेप टाकला, तर त्यांच्या विद्वत्तेचा विहंग किती गंगनचुंबी व गहनही आहे हे लक्षात येते. ॠग्वेद, अर्थववेद आरण्यके, उपनिषदे, वाल्मिकी रामायण, महाभारतातील व्यक्तिरेखा, भागवत, पुराणं, आद्य शंकराचार्य, वेदातील राष्ट्रदर्शन, आर्य चाणक्य, भारतीय स्वातंत्र्यसमर, पुण्यश्‍लोक शिवाजी, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार, धर्मवीर मुंजे इत्यादी. याशिवाय दै. महाराष्ट्र या वृत्तपत्रातून दर रविवारी ते ‘साहित्य समालोचन’ हा स्तंभ लिहीत. सुमारे दोन हजार साहित्य समीक्षणे- तेही विद्वत् ग्रंथावर- लिहिणारा असा हा ‘साहित्य समीक्षक’ विरळाच म्हणावा लागेल!
बाळशास्त्रींचे मंत्रमुग्ध वक्तृत्व म्हणजे श्रोत्यांसाठी मन व बुद्धी प्रसन्न करणारा महोत्सवच. वडील सांगायचे, ओघवती भाषा, रससांद्र वाणी, भारदस्त शब्दांची पखरण, पल्लेदार वाक्यांची फेक, प्रखर नि आवेशपूर्ण अशा अमोघ वाणीतून उतरणारी विद्वत्ता! सगळंच अवाक् करणारे!
बाळशास्त्रींची व्याख्याने म्हणजे ज्ञानसाधकांसाठी एक विशेष पर्वणीच असायची. त्यांच्या वक्तृत्वाचा बुलंद बाज, ओजस्वीपणा आणि कळकळीचे जनजागृतीचे आवाहन, सगळेच भव्यदिव्य होते. या राष्ट्राच्या पुराण इतिहासाची स्फूर्तिप्रद माहिती देणारे ते एक धगधगते यज्ञकुंड असायचे. या यज्ञकुंडातील विचारांच्या यज्ञशिखांच्या ज्वाला, त्यांचं तेज श्रोत्यांना दिपवून टाकणार्‍या होत्या. या यज्ञशिखांचा ‘भगवा रंग’ हा या राष्ट्राच्या आत्म्याचा रंग आहे, असा एक ‘आत्मबोध’ त्यांत असायचा.
राष्ट्रचिंतन, राष्ट्राचे पुनरुत्थान, राष्ट्राचा लोकात्मा, तसेच तत्कालीन समाजजीवन, ॠषिपरंपरा, संस्कृतिसंवर्धन व संस्कृतिप्रबोधन हे सर्व बाळशास्त्रींच्या व्याख्यानाचे मूळ सूत्र व मूळ वैचारिक चिंतनाचा ‘गाभा’ असायचा.
रामायण आणि महाभारतावरील त्यांच्या गाजणार्‍या व्याख्यानांतून ते सूत्रबद्ध राष्ट्रचिंतनच मांडायचे. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘रामायण आणि महाभारताच्या आदर्शातून आपल्या राष्ट्रजीवनाचे आत्मदर्शन घेऊन, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कटिबद्ध झालो तरच ते ऐकण्याचा खरा उपयोग आहे. मोहवश पार्थाला, स्वत:च्या सिंहनादाने जागृत करून, त्याच्यातून महान ‘कर्मयोगी’ निर्माण करणारा भगवान श्रीकृष्ण, आपल्याही अंत:करणात स्फूर्ती उत्पन्न करून, चैतन्याने सरसलेले ‘कर्मयोगी हिंदुराष्ट्र’ निश्‍चित निर्माण करील, असा माझा विश्‍वास आहे. त्यासाठी आपण मार्क्सऐवजी श्रीकृष्णाकडे आपली दृष्टी कळविली पाहिजे…!’’
रामायण-महाभारताच्या दिव्य इतिहासातून बाळशास्त्री, राष्ट्राचे आत्मदर्शन घडवून त्याच्या पुनरुज्जीविताची उत्कट इच्छा व्यक्त करतात. महाभारतातील व्यक्तिरेखा श्रीकृष्ण, द्रौपदी, गांधारी, भीष्म तर लोकमनात चैतन्य जागृत करायच्या. त्यातील शोध व बोध घेऊन लोकं तृप्त मनाने घरी जायचे.
पुण्यश्‍लोक शिवाजी, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र, भारतीय स्वातंत्र्यसमरातील क्रांतिकारक यांच्यावरील बाळशास्त्रींचे भाष्य ऐकण्यासाठी श्रोत्यांचे कान इतके आतुरलेले, भाववश असायचे की, तासन्तास त्यांच्या ओघवत्या, जाज्वल्य वाणीने श्रोते भारावून जायचे- मुग्ध व्हायचे!
रा. स्व. संघ, हिंदुमहासभा बाळशास्त्रींची स्फूर्तिस्थाने होती. राष्ट्राच्या संदर्भात केवळ तत्त्व, सिद्धान्त सांगून त्यांचे समाधान होत नसते, तर तत्त्वाला व्यावहारिक पातळी आणणारे तंत्र व तत्त्वज्ञान जरुरी असते, याचं दिग्दर्शन बाळशास्त्री करायचे ते संघतत्त्वज्ञानातून! ‘‘संघकार्य म्हणजे सर्वंकष राष्ट्रकार्य आहे,’’ हे प्रमेयच ते ठामपणे मांडत. त्यांचे ‘युगपुरुष डॉ. हेडगेवार’ हे छोटेखानी पुस्तक तर प्रत्येक स्वयंसेवकाने ‘संघगीता’ म्हणून वाचावे. डॉक्टरांची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी अन् साहित्यिक अंगाने ऊर्जस्वलपणे रेखाटलेली आहे की, तशी व्यक्तिरेखा माझ्यातरी वाचनात नाही.
डॉक्टर हेडगेवारांवर ते लिहितात, ‘‘महान शिल्पकार ओबडधोबड दगडावर संस्कार करून जशी सर्वांगसुंदर लावण्यमूर्ती घडवितो, तसे प्रत्येक राष्ट्रघटकांवर संस्कार करून, श्रेष्ठ व्यक्तिजीवन निर्माण करता येईल व एका ध्येयसूत्राने एकजीव झालेला समाज निर्माण करता येईल, अशी अनुशासनबद्ध, सामर्थ्याच्या पुरस्काराने, सुप्त राष्ट्रशक्तीचे सर्वस्पर्शी जागरण घडवून आणणारी, चारित्र्यशील एक संघटना डॉक्टरांनी उभी केली! मानवतेचे, महन्मंगलाचे आवाहन करीत… हिंदुराष्ट्रनिर्मितीचा पाया घालण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी, आपल्या अव्यभिचारी निष्ठेने आपला देह या महत्कार्यासाठी कणश: जाळून टाकला…!
हिंदू राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या महामंत्राची महत्त्वाकांक्षा अनेकांच्या अंत:करणात स्फुरली. पण, तंत्राच्या अभावी या मंत्रातून आविष्कार त्यांना करता आला नाही. डॉक्टरांनी दिलेले ‘ते’ तंत्र म्हणजेच संघाची ‘दैनंदिन शाखा!’ संघाची शाखा हे राष्ट्राचे छोटे स्वरूप आहे! डोळे उघडे करून व हृदय मोकळे ठेवून पाहा… या साधनेचे महत्त्व ध्यानात येईल!’’
बाळशास्त्रींची भारदस्त भाषा नि पल्लेदार वाक्यांची फेक कशी होती, ते वरील वक्तव्यातून कळते.
खरंतर बाळशास्त्रींचे असे सगळेच साहित्य, त्यातील विशेषकरून शिवाजी, सावरकर, क्रांतिकारक चरित्र हे वाचकांनी मुळातून वाचणे जरुरी आहे. पण, केवढा दैवदुर्विलास की, हे ‘विदर्भाचे बुद्धिवैभव’ नवीन पिढीला व आम्हालाच ठाऊक नाही! त्यांच्या व्याख्यानाचे विषय खंडश: ग्रंथरूपाने पुण्याच्या दाते यांच्या काळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.
बाळशास्त्रींचा वाङ्मयीन विहंग आणि त्यांची अचूक वेध घेणारी लेखणी सशक्तपणे आढळते ते त्यांच्या ‘साहित्य समीक्षणातून!’ बाळशास्त्री हे ‘साहित्य विमर्शक’ होते. ‘दै. महाराष्ट्र’ या वृत्तपत्रातून त्यांनी केलेली साहित्यसमीक्षा, समीक्षाशैलीचा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होतो. कारण हा ‘साहित्यपरामर्श’ काही सामान्य कथा वा कादंबर्‍यांच्या विषयाचा नव्हता, तर यात महाराष्ट्रातील तथाकथित बुद्धिवंतांनी लिहिलेल्या ग्रंथांचा परामर्श होता.
हे ग्रंथ बुद्धिसजग विद्वानांचे होते. यांत अहिताग्नी राजवाडे, पं. सातवळेकर, प्रा. ग. वा. कवीश्‍वर, डॉ. दा. र. रानडे, डॉ. वेलणकर, अप्रबुद्ध, पंडित द. वा. जोग, योगेश्‍वरानंद तीर्थ आदी प्रभृतींचे हे ग्रंथ होते. यांत ॠग्वेद, अथर्ववेद, नारदीयसूक्त, योगवशिष्ठ, गीता, पतञ्जली योगदर्शन, उपनिषदे, आरण्यके, षड्दर्शने, मंत्रशास्त्र या प्राचीन वाङ्मयीन विषयांचा अन्वयार्थ असायचा. बाळशास्त्रींची ग्रंथपरीक्षणे ही केवळ ग्रंथपरिचयात्मक राहात नव्हती; तर त्यांत नीतिशास्त्र, पुरुषार्थ मीमांसा आदी, या सर्वांचा परामर्श घेऊन मूळ प्रमेयांची तपासणी करून, त्याची ग्राह्यता काय आहे, अशी सगळी समीक्षा असायची. यातून वाचकाला मिळणारी नवीन माहिती प्रगल्भ करीत असे.
शंकराचार्य ते विनोबा, विवेकानंद, योगी अरविंद ते डॉ. पु. य. देशपांडे अशा सर्व पंडिताई लिखाणाचा ‘न्याय्य परामर्श’ ते परखडपणे घेत होते, हे विशेष! याच संदर्भातील ‘वेदगंगेच्या तीरी’ हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावे, एक झलक कळण्यासाठी!
बाळशास्त्रींचा एक विशेष पैलू म्हणजे, ते एक सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कृतिशील धुरीण होते. रा. स्व. संघाचे आणि हिंदुमहासभेचे कार्य त्यांनी अंग मोडून केले, स्वत:ला त्यात झोकून दिले. एक आदर्श स्वयंसेवक म्हणून त्यांची विद्वत्ता, लोकप्रियता त्यांनी कधीच आड येऊ दिली नाही. डॉ. मुंजेंसोबत त्यांनी भारतभर हिंदुमहासभेच्या प्रचार सभा घेतल्या. १९३९ चा भागानगरचा कारावास, १९४१ चा भागलपूरचा कारावास आणि १९४८ चा रायपूरचा कारावास त्यांनी भोगला. संघसत्याग्रह, गोवधबंदी आंदोलनात ते सक्रिय होते. गोवधबंदीवरील त्यांचे व्याख्यान ऐकून अटलबिहारी वाजपेयी अवाक् झाले होते, असे म्हणतात. खरोखरीच त्यांची वाणी व लेखणी अपवादभूत होती.
बाळशास्त्रींचा एक महत्त्वाचा उल्लेखनीय पैलू म्हणजे सांस्कृतिक व सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि संस्थात्मक नेतृत्व!
विद्वान म्हटले की अखंड वाचन, चिंतन, एकांगीपणा, लोकांपासून दूर जगणारा असा माणूस समजला जातो. पण, बाळशास्त्री यालाही अपवादभूत होते. ते मैफिली, वर्‍हाडी गप्पा करणारे, हास्यविनोदाने खाजगी बैठका रंगविणारे व्यक्तिमत्त्व होते. अनेक संस्थांचे ते अध्यक्ष, मार्गदर्शक होते व दांडगा जनसंपर्क असणारे होते.. ही यादीच बघा- महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे भारतरत्न डॉ. काणे अध्यक्ष, तर बाळशास्त्री उपाध्यक्ष. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष. भोसला वेदशाळा महाविद्यालयाचे अध्यक्ष, वि. सा. संघ वणी येथील साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष. विश्‍व हिंदू परिषदेच्या पंडित परिषदेचे सदस्य, नागपूर विद्यापीठाचे विद्वत् सभेचे सदस्य, ‘हिंदुहृदय’ या त्रैमासिकाचे संपादक, दै. महाराष्ट्राच्या साहित्यपुरवणीचे संपादक… असे चतुरस्र त्यांचे व्यक्तित्व.
‘दाता भवति वा न वा’ – हा दातृत्वाचा त्यांचा आणखी एक विशेष पैलू. विद्वान व्यक्तीचा सन्मान-सत्कार घडविण्याचा, एक वेगळाच उपक्रम शास्त्रीबुवांनी नागपूरनगरीत घडविला. नागपुरात त्यांनी, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन् यांना आणून भव्य सत्कार घडविला. काशीचे विद्वान विश्‍वनाथ भट्टदेव, मुंबईचे शास्त्ररत्नाकार पंडितराज दीक्षित, प्रख्यात विदूषी प्रभावती राजे, विख्यात कीर्तनकार विनायकबुवा भागवत, निझामपूरकर बुवा, आफळेबुवा, आसेगावकरबुवा अशा नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांची मांदियाळीच ते दक्षिणामूतीर्र् मंदिरात भरवीत असत. दक्षिणामूर्ती देवस्थान प्रबोधनाचे व्यासपीठच झाले होते!
या सर्व विद्वानांचा भव्य सत्कार, महावस्त्र, महादक्षिणा आतिथ्यासह दिली जायची. सोबत अनेक ब्रह्मवृदांना चमचमीत भोजन, सवार्र्ंसाठी पंगतिप्रपंच घडविला जायचा. ‘अन्नदान’ तर ‘हरदास’ घराण्याचा विशेष होता! हे सर्व बाळशास्त्री पूजा, अर्चा, कर्मकांड व चातुर्मास सांभाळून करायचे. हेही थोडके नव्हते!
असे होते बाळशास्त्री. लेखणी, वाणी, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व करणारे हे विदर्भाचे बुद्धिवैभव ११ ऑगस्ट १९६८ ला अल्पशा आजाराने गेले, तेही अचानक चटका लावून! या नगरीचा एक सांस्कृतिक दीपस्तंभच कोसळला! दक्षिणामूर्ती या ज्ञानदेवतेचे असे वर्णन आहे की, ‘अप्रमेय त्रयातीत निर्मल ज्ञानमूर्तये…’ असेच होते बाळशास्त्री! हा पुत्र ज्ञानदेवतेचा! जन्मशताब्दीनिमित्ताने या प्रकांडपंडिताला कृतानेक साष्टांग नमस्कार!

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (376 of 875 articles)

Atal Bihari Vajpayee
सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी उत्स्फूर्तपणे ‘महापुरुष’ या शब्दाचा हुंकार निघतो. त्या प्रत्येक वेळी महापुरुष या सर्वनामाचे ...

×