हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…
12 Aug 2018॥ विशेष : सृ. गौ. देवधर |
‘‘जे जे भारतीय आहे, या मातीतील आहे, त्याचा विरोध हेच यांच्या विचारांचं अधिष्ठान झालं. तथाकथित सुधारक स्वत:स म्हणवून घेऊ लागले. वरपांगी गरिबांचा कळवळा दाखवू लागले.’’ परंतु, यांचे खरे दर्शन स्वा. विवेकानंदांच्या वरील उतार्यात दिसून येते. विदेशी विचारांनी प्रभावित असलेली, सुखोपभोगी विद्वान मंडळी. बहुतेक काळे इंग्रज. यांना उच्च पदं, अनेक महामंडळांची पदे, भरपूर पगार, मान मरातब देऊ केला गेला. सारे खुशामतखोर दास! भारताचं पुनर्निर्माण मातीच्या धर्म माध्यमानं व्हायचे, हे ही विद्वान मंडळी जाणत. म्हणूनच भारतीयत्वाला यांचा विरोध! येथील घर-परिवार-संस्था, नातीगोती, पर्यावरणस्नेही सणवार, रीतिरिवाज, देवी-देवता, थोर पुरुष यांचे उत्सव, मातृ, पितृ, आचार्य, अतिथी देवो ही संकल्पना, प्राचीन विद्या, इतिहास, वंदे मातरम्, योग इ. गोष्टींची टिंगलटवाळी, संभ्रम निर्माण करणं अन् या प्रतीच्या सर्व श्रद्धा संपविण्याचे प्रयत्न करणे, हे उद्योग सातत्याने चालू असतात.
‘समाजसुधारकांचे मनोरथ दुर्दैवाने विफल झाले आहे. समाजाला मोडूनतोडून समाजसुधारणेची जी पद्धती त्यांनी अंगीकारली होती तिच्यात ते सफल होऊ शकले नाहीत. या सुधारकांना मी हे ठासून सांगू इच्छितो की, मी स्वत: त्यांच्यापेक्षाही अधिक जहाल कट्टा सुधारक आहे. या लोकांना थोडथोडक्या, वरवरच्या पल्लवग्राही सुधारणा हव्या आहेत. मला हवी आहे आमूलाग्र सुधारणा. त्यांचा माझा मतभेद फक्त सुधारणांच्या पद्धतीत आहे. त्यांची पद्धती आहे मोडतोड करण्याची. माझी पद्धती आहे घडविण्याची. माझा मात्र सुधारणेवर विश्वास नाही, माझा विश्वास आहे स्वाभाविक उन्नतीवर.
सुधारणा संप्रदायातील एका मुखंडाला एका जाहीर सभेत, ‘मी हिंदू नाही आणि हे कबूल करावयास मी एका पायावर तयार आहे.’ अशी मुक्ताफळे काढावयास काडीचीही शरम वाटली नाही. या सुधारणायुगाचा जणू हाच एक घोषमंत्र होता की, जे जे म्हणून हिंदूंचं किंवा हिंदुभावात्मक असेल ते सारे घृणास्पद व त्याज्य आहे.’’ -स्वा. विवेकानंद. ‘योद्धा संन्यासी’, पान १६४, ले. वसंत पोतदार, राजहंस प्रकाशन.
‘‘अमेरिकनांसारखे इंग्रज लोक तरतरीत नाहीत. पण, त्यांच्या हृदयात हात घातला तर ते चिरकालासाठी तुमचे सहाध्यायी होऊ शकतात. इतर जातीपेक्षा इंग्रजांवर अधिक ईश्वरीकृपा असण्याची कारणे, त्यांची प्रखर निष्ठा व दृढसंकल्पी वृत्ती ही असावीत. बाह्यत: साहेब उदासीन दिसतो. ते आवरण भंग केल्यास त्याची हार्दिक सहानुभूती प्रत्ययास येेते. इतर जातीच्या तुलनेत इंग्रजांमध्ये पारस्परिक ईर्ष्येची भावना कमी आढळते. म्हणूनच ते जगावर राज्य करू शकताहेत. खुषामत करणे दास्याचे प्रतीक आहे. ते संपूर्ण टाळून आज्ञापालन करणे त्यांना साधले आहे.’’ -स्वा. विवेकानंद, ‘योद्धा संन्यासी’, पान १५५, ले. वसंत पोतदार.
आजकाल न्यायालयाने पुरोगामी मंडळींतील भयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण पुरोगामी म्हणजे नेमके काय, कुणास म्हणावे, या विषयीही स्पष्टता करायला हवी आहे.
आज अघोषित आणिबाणी आहे, असं ही मंडळी म्हणतात. मध्यंतरी विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयीसुद्धा (यावर घाला घातला जातोय म्हणून) आरडाओरड अशा मंडळींनी केली. पुरस्कार परत करण्याची नाटके केली. घटना बदलाचे कारस्थान सुरू असल्याचा बोभाटा चालविला अन् ही ओरड तथाकथित प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांतून सुरूच आहे.
परंतु, किती जण विना चौकशी तुरुंगात आहेत, किती जणांच्या नोकर्या गेल्या, किती जणांवर काय काय अत्याचार झाले, कुठल्या लेखनावर, नाटक, चित्रपटावर बंदी आणली गेली, किती जणांवर भाषणबंदी केली गेली, घटनेच्या कुठल्या कलमावर आक्षेप घेऊन, बदलण्याचे काय प्रयत्न झाले, चालले आहेत, याबद्दल मात्र पुराव्यासह ठोसपणे कुणी पुरोगामी सांगत नाही, लिहीत नाही.
या पुरोगामी मंडळींचा इतिहास पाहता सारं काही नकारात्मक लक्षात येते. पं. नेहरूंचे भारताच्या विकासात मोठे योगदान आहे. परंतु, कुणीही देव नसते. त्यांच्याही चुकीच्या धोरणामुळे भारतात समस्या निर्माण झाल्या. काश्मीर समस्या, ३७० कलम, तिबेटवर उदक सोडलं जाणं, १९६२ चा दारुण पराभव व त्यामुळे चीनने १७००० चौ. मी.चा मुलुख (भारताचा) गिळंकृत करणे, ईशान्य राज्यांतील समस्या, रशियाच्या प्रभावानं आखलेली आर्थिक धोरणे व प्रकल्प यातून परमिट राजने निर्माण केलेल्या समस्या आदी समस्या त्यांच्या धोरणामुळे निर्माण झाल्या आहेत. पं. नेहरूजी मात्र म. गांधींमुळे प्रधानमंत्री झाले! लोकशाहीने नाही. व्यक्ती, कुटुंब, पक्ष यांच्या राजकीय स्वार्थापोटी, गांधी-नेहरू कुटुंबाधारित काँग्रेस पक्षाची रचना, यामुळेही निकोप लोकशाहीची वाढ झाली नाही. रशियन पद्धतीप्रमाणे अशी सारी रचना, धोरणे यांचे गुणगान करणारी एक भाट जमात निर्माण केली.
बहुतेक विदेशी विचारांनी प्रभावित असलेली, सुखोपभोगी विद्वान मंडळी (पण जमिनीचा अभ्यास नाही). बहुतेक काळे इंग्रज. यांना उच्च पदं, अनेक महामंडळांची पदे, भरपूर पगार, मान मरातब देऊ केला गेला.
जे जे भारतीय आहे, या मातीतील आहे, त्याचा विरोध हेच यांच्या विचारांचं अधिष्ठान झालं. तथाकथित सुधारक स्वत:स म्हणवून घेऊ लागले. वरपांगी गरिबांचा कळवळा दाखवू लागले. परंतु, यांचे खरे दर्शन वरील उतार्यात (स्वा. विवेकानंदांच्या) दिसून येते. सारे खुशामतखोर दास!
भारताचं पुनर्निर्माण मातीच्या धर्म माध्यमानं व्हायचे, हे ही विद्वान मंडळी जाणत. म्हणूनच भारतीयत्वाला यांचा विरोध! येथील घर-परिवार-संस्था, नातीगोती, पर्यावरणस्नेही सणवार, रीतिरिवाज, देवी-देवता, थोर पुरुष यांचे उत्सव, मातृ, पितृ, आचार्य, अतिथी देवो ही संकल्पना, प्राचीन विद्या, इतिहास, वंदे मातरम्, योग इ. गोष्टींची टिंगलटवाळी, संभ्रम निर्माण करणं अन् या प्रतीच्या सर्व श्रद्धा संपविण्याचे प्रयत्न करणे, हे उद्योग सातत्याने चालू असतात. अर्थात्, मधल्या काळात भारतीय संस्कृतीचा प्रवाह अवरुद्ध झाला. त्यामुळे वाईट, आत्मघातकी, माणुसकीशून्य काही चालीरीती विकृतिरूपात शिरल्या. त्या विरुद्ध आवाज-आंदोलन हवेच. अशा प्रकारचे प्रयत्न देशात पूर्वापार चालतच आहेत. संतमंडळी यावर आसूड ओढतच आली. पण, संत समाजावर कोरडे ओढत, तरी ‘मेरा अपना समाज’ हा त्यात भाव असे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सकारात्मक होते. पू. डॉ. आंबेडकरांचाही सारा ‘अपना समाज’ हाच भाव होता. म्हणूनच त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापनेचा प्रयास चालविला होता. क्षुद्र, स्वार्थी, व्यक्तिगत राजकारणासाठी स्वत:चा समाज यावत्चंद्रदिवाकरौ मागासच राहावा, अशी आजकाल काही नेत्यांची कल्पना दिसते, तसे त्यांचे कार्यक्रम दिसतात. सतत बेकीचाच विचार करण्याने बेकीच वाढते. एकीचा विचार करण्याने एकत्वासाठी वाटचाल होत राहते! चांगल्या सवयी म्हणजेच संस्कार, म्हणजेच माणुसकीचा व्यवहार. परंतु, संस्कार म्हटलं की पुरोगाम्यांना झुरळ पडल्यागत तिटकारा!
प्रथम गुरू, संस्कारदात्री आईच असते. माणूस घडविण्याचं अत्यंत अवघड काम (प्रकल्प) ती सहज करीत असते. तिच्या शरीरात मातृस्वरूप ईश्वरीअंश (निर्मितीचा) असतो. माया, ममता असते. त्यामुळेच मुलावर तिचा परिणाम, तिच्याकडं ओढा अधिक. परंतु पश्चिमेचा ’सबसे बडा रुपय्या’ विचार आला! मिळवायला/ पैशाला महत्त्व आलं अन् माणुसकीचं महत्त्व कमी झालं. माणुसकी उभा करणं हे अत्यंत महत्त्वाचं, निर्मितीचं काम उपेक्षित झालं. ‘आई-स्त्री’ची किंमत मिळवतेपणावर मोजली जाऊ लागली. अपवाद सोडता आम पुरुषवर्ग याच दृष्टिकोनातून पत्नीचा/महिलावर्गाचा विचार करू लागला!
यास पुरोगाम्यांचा वर्षानुवर्षांचा चाललेला बुद्धिभेदाचा प्रयत्न कारण आहे. यामुळे घरं सुखवस्तू झाली, परंतु घरपण हरवलं. आनंद कमी कमी होत गेला. माणूस यंत्रमानव बनत गेला. प्रत्येक येणारी पिढी अधिक बुद्धिमान असते, बुद्ध्यांक वाढता असतो, पण भावनांक कमी होत जातो. फुलाची खरी ओळख सत्त्व, गंधातच असते. तसं माणसाचं माणूसपण सामाजिक संवेदनेतच दिसतं!
स्त्री-पुरुष समानतेचा अतिरेकी विचार व व्यवहार पुरोगाम्यांनी मांडला. स्त्रीचं पुरुषीकरणच मांडलं. पुरुषाचं अनुकरणच होत चाललं. म्हणजे स्त्रीत्वासंबंधी अप्रत्यक्ष न्यूनगंड उत्पन्न केला गेला. स्त्रीला वस्तुरूप केलं. अपवाद सोडता सर्व प्रसारमाध्यमांतून स्त्री प्रतिमेचं भोगवस्तू म्हणून दर्शन होतं. सुखकल्पना इन्द्रियांशी निगडित. सर्व प्रकारच्या वासना उत्तेजित करणारे कार्यक्रम बहुतेक वाहिन्यांवर दिसतात. सर्वच प्रकारची भूक, तृष्णा वाढत जातात. परिस्थितीसुद्धा अपराधी बनविते. खमंग सुवास, पदार्थ दिसला की भूक लागते, वाढते. त्याचप्रमाणे माध्यमांवर तोकड्या कपड्यांत शरीरसौष्ठव दाखवलं जातं अर्थात् पडद्यावर अन् रस्त्याने जाता-येता शरीर दाखविण्यासाठीच तंग कपड्यांतील मुली पाहिल्या की, पुरुष म्हणून वासना जागतातच. पोटाची किंवा वासनेची भूक नैसर्गिकच ना? मग अनेक फाशी जाऊनही बलात्कार वाढत आहेत. यात फक्त पुरुषांना दोष देऊन उत्तर मिळेल काय? अल्पवयीन मुलं/मुलीसुद्धा अशा प्रकारात दिसतात. बलात्कार म्हणजे नेमकं काय? हे यांना कुठं बघायला मिळते? सगळ्यांनीच विचार करायला हवा. तसेच देशात लहान बालकांमध्ये भीषण क्रौर्य दिसतंय. अशा हिंसेचे, खुनाचे प्रकार वाढत आहेत! का घडतंय्? झुंडशाहीची हिंसा वाढत आहे अन् भ्रष्टाचाराबद्दल बोलायलाच नको. शिक्षण, आरोग्यक्षेत्र तर तोबा तोबा! घर, शाळा, सार्वजनिक जीवन… कुठे नैतिकता मिळते काय?
अर्थातच देवळं, मठ, आश्रम तुडुंब वाहात आहेत. आयुष्यभर नंगे फकीर/संन्यासी राहिलेले बाबा- त्यांच्यावर तथाकथित भक्त सोन्याच्या शाली पांघरत आहेत. साधुसंतही चंगळखोर बनलेत. सर्वच यात्रा खचाखच भरलेल्या. निर्मल वारीसाठी अभियानं, मोहीम! कदाचित् जेवढे यात्रेकरू आणि २५ टक्के स्वच्छता अभियानवाली मंडळी! यांच्या सामाजिक जाणिवा, सेवा स्तुत्यच आहेत. पण, देवाच्या गावी जाणारा स्वत: स्वच्छतेची काळजी का घेत नाही? कित्येक वर्षांत या समाजात कुठल्याच प्रकारे समाजधर्म जागविलाच गेला नाही. कुठल्याच प्रकारे यासाठी प्रभावी प्रबोधनाचे प्रयत्न दिसत नाहीत. सर्वत्र व्यक्तिधर्म अन् भारतीय मातीतल्या धर्माची, पद्धतीची पुरोगाम्यांच्या द्वारा चाललेली नित्य टिंगलटवाळी! व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेकी विचार. प्रत्यक्ष कामापेक्षा आज काहींना प्रचंड पैसा मिळत आहे. हा पैसा, प्रसिद्धीची हाव, केवळ धंदा करणारी प्रसारमाध्यमं अन् स्वार्थी, प्रसिद्धिलोलुप राजकारणी या सर्वांनी देशाचं समाजस्वास्थ्य बिघडवून टाकलं आहे.
प्राणायाम शरीरस्वास्थ्यास आवश्यक, उपयुक्त आहे आणि अर्थायाम सामाजिकस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
आपल्याकडे पूर्वी विविध पंथांचे विद्वान, साधू परस्पर वादविवाद, संवाद करीत. बुद्धदेव, भ. महावीर, शंकराचार्य आदी मंडळींना सुरक्षेची गरज नसे. या मातीचा विचार सर्वसमावेषकच आहे. धर्माचा विचार करताना, प्राणिमात्र, मनुष्यमात्र, वनस्पती इ.शी माणुसकीचा व्यवहार असणे हा धर्म समजत. हा सर्वांसाठी सारखाच- मानवधर्म. आणि मुक्ती, मोक्ष, जन्नत, स्वर्ग अशासाठी ज्याची त्याची श्रद्धेप्रमाणे उपासना प्रणाली. तो उपासनाधर्म.
स्वत:च्या श्रद्धेवर पक्का विश्वास, इतरांच्या श्रद्धांचा आदर अपेक्षित. ‘आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्। सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति॥’ हा अदम्य विश्वास. या सहिष्णू सर्वसमावेशकतेमुळे भारतभूमीमध्ये जगातील वंचित, अन्यायाने पीडित, अत्याचारग्रस्त समाजांना आपुलकीनं आश्रय मिळाला. त्यांची उपासनामंदिरं, स्थानंपण बांधून दिली गेली.
अगदी अलीकडे बहाई समाजाचं ‘लोटस टेंपल’ उदाहरण आहे. जगात भारतासारखा सर्वसमावेशक आपुलकी असणारा समाज, देश दाखविता येईल काय? अन् तरीही ही पुरोगामी मंडळी भारतीयांनाच माणुसकीचे डोस पाजतात!
खरेतर या देशात हिंसा, तिरस्कार, अन्य विचारांचा द्वेष तथाकथित साम्यवादी, पुरोगामी मंडळींनीच आणला.
विग्रह, विरोध, विकासाचा पश्चिमी, विशेषत: साम्यवादी विचार यांनी आणला आणि मूळ भारतीय असा एकात्म/सर्वसमावेशक विचार संपविण्याचे प्रयास केले. यांना अनेक वर्षापासून पं. नेहरूजी, काँग्रेस सरकार यांचे पाठबळ मिळत गेले. मानमरातब, अनेक महामंडळांची सत्तापदं, सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाने विदेशवार्या, अलिशान सुखसोयी हे भोगत आले. यांचा धर्म- साम्यवाद, ग्रंथ- कॅपिटल!
या मंडळींनी रशिया, चीन, बल्गेरिया इ. देशांत स्वत:च्याच कॉमे्रडस्च्यासुद्धा, व्यक्तिगत स्वार्थासाठी हत्या केल्या. विचारांच्या पाठपुराव्यासाठी लाखो नागरिकांना ठार मारले. अशा मंडळींनी समाजा-समाजात फूट पाडणारा वर्गविग्रह, हिंसा, द्वेष या समाजात सुरू केला. तत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन आजही नक्षलवादी लाखोंना मारीतच आहेत. केरळमध्ये हजारो संघस्वयंसेवकांचे खून पाडले गेले आहेत. इतका द्वेषभाव, कल्पना करू शकत नाही कुणी!
काही महिन्यांपूर्वीच कै. कॉन्डागे यांच्या विषयासंबंधी एक पुस्तक मुंबईत प्रकाशित झाले. त्या समारंभास सर्व राजकीय पक्ष उपस्थित होते. त्यांची भाषणे झाली. परंतु, साम्यवादी, मार्क्सवादी, नक्षलवादी पक्षाचे कुणीही उपस्थितसुद्धा नव्हते, केवढा द्वेषभाव!
तसेच एवढ्यातच सोलापुरास डॉ. आंबेडकर विचार संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्यासंबंधी गलिच्छ मतप्रदर्शन केले. त्यांच्या ‘महामानव गौतम बुद्ध’ पुस्तकासंबंधी अशीच मतं मांडली. तसेच थोर विचारवंत, साहित्यिक प्रा. यशवंत मनोहर यांच्यासंबंधीही आक्षेपार्ह टीका केली.
पश्चिमी तथाकथित पुरोगामी विचारांची अशी परिणिती दिसते. यामुळे आज विविध राजकीय, सामाजिक संस्था-संघटनांत सहसंवाद, स्नेहाचार दिसत नाही.
पैशाचं अतिमहत्त्व. त्यामुळे येनकेनप्रकारेण ‘संपत्ती जुटाव’ अभियान! म्हणूनच देवी-देवता, महापुरुष, धार्मिक संस्कार यांचे बाजारीकरण, यास प्रसारमाध्यमांतून राजकारणी मंडळी (काही अपवाद) यांचा पाठिंबाच पाठिंबा! सहकार्य!
आताच्या चिंताजनक समाज- देशस्थितीस एका अर्थी ही पुरोगामी मंडळी, त्यांचे मातीच्या श्रद्धा संपवण्याचे प्रयत्न जबाबदार आहेत. आणि यांना प्रोत्साहन देणारी काँग्रेस सरकारं नि पुढारी कारण आहेत. या सर्व मंडळींची आज सद्दी संपत चालली आहे.
नवीन पिढी जातपात, राजकीय क्षुद्र स्वार्थ यापलीकडे जाऊन काही ठोस सामाजिक सहभाग देणारी आहे. विविध चांगले उपक्रम करीत आहे. बर्याच गोष्टी ऑनलाईन होत आहेत.
त्यामुळे पूर्वापार दलालीवर व सरकारी (म्हणजे जनतेच्या) पैशावर ऐश करणारी मंडळी, फुकटचा तोरा मिरवणारी मंडळी यांचं ‘चरणं’ बंद झालं आहे. शिवाय या मातीच्या विचारांना आता अधिकाधिक समाज समर्थन देऊ लागला आहे.
पुरोगामी मंडळींची ही अखेरची अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे लोक कुठल्याही थरावर जाऊन, मोदी सरकार, मोदीजी, भारतीय अस्मितेच्या संस्था, संघटना, संघ यांच्या नावे खोट्यानाट्या पद्धतीने बोंब मारत राहणार. अनेक प्रसारमाध्यमांना फुकटच्या मिळणार्या सवलती, फुकटचा मोठेपणा, विदेशाचे सरकारी खर्चाने होणारे प्रवास यास मोदीजींनी पायबंद घातल्यामुळे या मंडळींचे धाबे दणाणले आहे.
या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात येते. अनेक समस्यांचे मूळ कारण हरवत चाललेले घरपण आहे. आपली कुटुंबव्यवस्था, एक समाजधारक शक्ती आहे. सामाजिक संवेदना, माणुसकीच्या सवयी, संस्कार, नैतिकता, चारित्र्य यांची पाठशाळा आहे. ब्रिटनच्या पूर्व प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर एकदा म्हणाल्या होत्या, ‘‘आमच्यासारखी अनेक राक्षसी आक्रमणं भारतावर झाली. त्याने संघर्ष केला, पचवली आणि तरीही भूमी, संस्कृती, समाज म्हणून जिवंत आहे, त्याचे कारण भारतीय कुटुंबव्यवस्था-परंपरा हे आहे.’’
ही शक्ती असल्याचं आज समाज विसरलाय्. फक्त पैशाचं सुख पाहतोय्. खूप पैसा, पण ना व्यक्ती, ना कुटुंब, ना घर, ना समाज आनंदी! व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता याचा अतिरेकी विचार-आचार दिसू लागला, त्यामुळे ‘मै नही तूही’ विचार खरा आनंद देतो हे समजलेच नाही. आपणच आपली खरी ओळख विसरलोय! घरपण देणारी ‘आई’ आहे, हेच उमगलं नाही.
पुरोगामी पेरणीमुळे बहुतांश पुरूषवर्गास स्त्रीचं मोठेपण कळतच नाही. आनंदाचं ती निधान आहे, हे समजलं नाही. ‘माणूस घडविण्याचा’ अत्यंत अवघड प्रकल्प ती चालवीत असते. ‘माणूस’ हाच खरा समाज उद्धारक आहे, हे स्त्रीलाही कळले नाही. ती घरात माणुसकीची म्हणजे मनाची मशागत करते.
राधाकृष्ण, सीताराम, भवानीशंकर म्हटलं जातं, का? पश्चिमी प्रभावामुळे मिस्टर अॅण्ड मिसेस सुरू झालं. यातला फरक अनेकांना कळतच नाही.
आजही जगात माणुसकी जी शिल्लक आहे ती स्त्रीच्या अस्तित्वानेच! भारत आणि भारतीय समाज सर्वसमावेशक, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ पाहणारा, एकात्म भावावर विश्वास असणारा आहे. म्हणून आजही जगात अधिक सहिष्णू, माणुसकी जपणारा देश आपला आहे. (दुसर्या महायुद्धात विजयी देशाच्या सैन्यानी पराजित देशांच्या स्त्रियांवर खूप अत्याचार केले. अपवाद फक्त भारतीय सेनेचा होता.) इथल्या मातीचाच नैसर्गिक संस्कार माणुसकीचा. याचं प्रमुख कारण समाजातील स्त्रीचं स्थान आणि स्त्रीचा सार्वजनिक जीवनातील सहभाग हे आहे! म्हणूनच समाजस्वास्थ्यासाठी सम्यक् भारतीय विचार, आचाराकडे बुद्धिपुरस्सर वळायला हवे. विज्ञान, विवेक अन् समाजधर्माचं भान हवं आणि या मातीच्या अभिमानी मंडळींनी खूप खोलात जाऊन अध्ययन करायला हवं.