Home » प.महाराष्ट्र » चितळीत जिल्हा बँक फोडून पाऊणकोटीची लूट

चितळीत जिल्हा बँक फोडून पाऊणकोटीची लूट

21sata19महेश जाधव
चितळी(सातारा), [दि. २१ ऑक्टोबर] – खटाव तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या चितळीतील जिल्हा बँकेची शाखा फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांची लूट केली. कोणताही मागमूस मागे न ठेवता फिल्मी स्टाईलने पडलेल्या या दरोड्याने मोठी खळबळ उडाली. सुमारे २० लाख ९५ हजारांची रोकड आणि ५२ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत.
दरम्यान, सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. याबाबत घटनास्थळावरून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चितळी येथील मारुती मंदिरासमोर जिल्हा मध्यवर्ती बँक व विकास सेवा सोसायटीचे कार्यालय आहे. गावाच्या बाहेरील बाजूस या दोन्ही संस्था असून शाखेच्या पाठिमागे शेत व लगतच येरळा नदी आहे. शुक्रवारी दि. २१ रोजी चितळी सोसायटीचे चेअरमन सतीश मधुकर कदम हे नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता सोसायटीत गेले. त्यावेळी ते इमारतीवर असलेल्या सिंटेक्स टाकीत पाणी सुरु आहे का हे पाहण्यासाठी ते बँक इमारतीच्या गच्चीवर गेले होते. तेव्हा त्यांना बँकेची खिडकी उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब ग्रामस्थांना सांगितली. सोसायटीचे माजी चेअरमन पृथ्वीराज पवार यांनी बँकेचे कर्मचारी मोहन कुंभार यांना फोन केला. कुंभार चितळीत आल्यानंतर बँकेचा दरवाजा उघडला असता  कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  त्यांनी बँकेच्या शाखाप्रमुखांना फोन केला व ग्रामस्थांनी मायणी पोलिसांना कळवले.
पोलीस आल्यानंतर बँकेत प्रवेश केला असता बँकेच्या पश्‍चिमेला असलेली तिजोरी गॅस कटरच्या साह्याने फोडली असल्याचे आढळले. सुरुवातीला किती रक्कम गेली याची माहिती नव्हती. शाखाप्रमुख भाग्यवंत पवार यांनी कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार तिजोरीमधील २० लाख ९५ हजार २३६ रुपयांची रोकड व ५२ लाख ४३ हजार ४०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने असा जवळपास ७५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे समोर आले.
चोरी झाल्याचे वृत्त सोशल मीडियाद्वारे तातडीने सर्वत्र पसरले. गावकर्‍यांसह जिल्हा बँकेशी संबंधित सर्वांनीच बँकेकडे धाव घेतली. कोटभर रुपयांची लूट झाल्याचे समजताच अनेकजण अवाक् झाले. अनेकांमध्ये आता आपले पैसे, दागिने परत मिळतील का? याबाबत चर्चा सुरु होती. तसेच चोरटे गावातील असावेत की बाहेरचे यावरही मोठा तर्कवितर्क सुरु होता. काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या याच शाखेत किरकोळ चोरीचा प्रयत्न झाला होता याबाबतही गावात चर्चा होती.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in प.महाराष्ट्र (35 of 36 articles)


  तभा वार्ताहर वडूज, [दि. २१ ऑक्टोबर] - आगामी काळात होणार्‍या नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी खटाव-माण या ...