‘चाकण पेटवणार्या’ पाच हजार जणांवर गुन्हा
1 Aug 2018►आंदोलनात बाहेरचे घुसल्याचा पोलिसांचा संशय,
वृत्तसंस्था
पुणे, ३१ जुलै –
मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात सोमवारी पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करून ३० बसेसला आगी लावणार्या सुमारे पाच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जाळपोळ आाणि हिंसाचारात स्थानिकांचा नाही, तर बाहेरून आलेल्या लोकांचा असल्याचा पोलिसांना संशय आहे.
लोकांची जमवाजमव करणे, दंगलीसाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे, यासारखे आरोप सुमारे पाच हजार आंदोलकांवर ठेवण्यात आले आहेत. यातील काही लोकांची ओळख पटली असून, सीसीटीव्ही फूटेज आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारावर इतर लोकांचीही ओळख पटविण्यात येत आहे. त्यानंतर या लोकांना अटक करण्याचे सत्र हाती घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली. सोमवारी पुणे-नाशिक महामार्गावर ३० बस पेटविण्यात आल्या होत्या. काही ट्रक्सलाही आगी लावण्यात आल्या, तर शंभराहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. सुरुवातीला दोन तास आंदोलन शांततेत सुरू होते, पण त्यानंतर तोडफोडीला सुरुवात झाली. त्यामुळे या आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा संशय आहे, असे अधिकार्याने सांगितले.
व्हायरल व्हिडीओची जमवाजमव
चाकण येथील मराठा क्रांती मोर्चा नेमका कोणामुळे हिंसक झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्हायरल फोटो आणि सीसीटीव्ही फूटेज जमा करण्यास सुरुवात केली आहे. याचा आधार घेत कारवाई केली जाणार आहे. यासाठी दोन पोलिस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले असून, व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाठविणार्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे, असे अधिकारी म्हणाला.
आणखी एकाची आत्महत्या
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये आज एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित देशमुख असे या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून, त्यात बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च आता मला परवडणारा नसल्याचे सांगत, मराठा आरक्षणाचाही उल्लेख केला आहे.
चाकणच्या हिंसाचारात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
चाकणमध्ये मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी केलेल्या पोलिसांवरील हल्ल्यात पोलिस कर्मचारी अजय भापकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आंदोलकांनी केलेल्या पोलिसांवरील हल्ल्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजिस्विनी सावंत, पोलिस उपअधीक्षक गणपत माडगुळकर, चाकणचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, राम पठारे यांच्यासह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते, या सर्वांवर उपचार करण्यात आले. जखमी झालेल्या सर्व पोलिस कर्मचार्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry