भाजपाकडून अरुण अडसड यांची उमेदवारी दाखल
25 Sep 2018►विधान परिषद पोटनिवडणूक
►बिनविरोध होण्याची शक्यता,
मुंबई, २४ सप्टेंबर –
भाजपा नेते व कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपाकडून धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथील माजी आमदार अरुनभाऊ अडसड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी अरुण अडसड यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणूक विरोधी पक्षाकडून कुठलाही उमेदवार न दिल्याने अडसड हे बिनविरोध निवडून येणार आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात उतरविला नाही. त्यामुळे भाजपाचे ज्येेष्ठ नेते, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार असलेले अरुण भाऊ अडसड यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार रामदास तडस, आमदार अनिल बोडे, भाई गिरकर, गिरीश व्यास यावेळी उपस्थित होते.
जबाबदारी निभावणार : अडसड
जनसंघापासून भारतीय जनता पक्षाची सेवा निष्ठा आणि पूर्ण इमानदारीने केलेली आहे. पक्ष उच्च शिखरापर्यंत पोहोचावा याकरिता निष्ठेने पक्षाचे कार्य करून पक्षाला वाढविण्याचे माझ्या शक्तिनुसार प्रामाणिक प्रयत्न केलेत. आजपर्यंत पक्षाने ज्या-ज्या जबाबदार्या दिल्यात त्या-त्या निष्ठेने निभावल्यात. पुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण निष्ठेने आणि समर्थपणे निभावणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी दिली आहे.

Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry