सिमकार्ड खरेदी करणार्या ग्राहकांमध्ये ‘आधार’वरून गोंधळ
2 Oct 2018►टेलिकॉम कंपन्यांकडून रिटेलर्सला सूचनाच नाहीत,
मुंबई, १ ऑक्टोबर –
ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी खाजगी कंपन्यांनी बारा आकडी आधार क्रमांकाचा वापर करू नये, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी दिले असतानाही अद्याप टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या पडताळणीसाठी आधारचे बंधन लादत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला असतानाही परिस्थितीत बदल झालेला नाही, असे दिल्ली व मुंबईतील ग्राहकांनी स्पष्ट केले आहे. सिमकार्ड घेण्यासाठी अद्याप आधार याच पर्यायाचा वापर टेलिकॉम कंपन्या करीत आहेत. ग्राहकांची बायोमेट्रिक पद्धतीने शहनिशा करण्यासाठी त्यांच्याकडून आधारचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
कंपनीकडून आम्हाला याबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आम्ही आहे त्याच पद्धतीचा अवलंब करीत आहोत, अशी माहिती मुंबई येथील एका रिटेलरने दिली. दूरसंचार विभागाकडून विशिष्ट सूचना प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही याबाबत कोणतीही सूचना रिटेलर्सला देऊ शकत नाही, असे एका मोबाईल कंपनीच्या अधिकार्याने सांगितले. दूरसंचार विभागाचा आदेश आल्याशिवाय आम्ही हा बदल करू शकणार नाही, असे मोबाईल क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्यांपैकी एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
ग्राहकाची ई-पडताळणी अद्याप आधारच्या डाटाबेसवरून केली जात आहे. यूआयडीएआयने अद्याप खाजगी कंपन्यांची ही सुविधा बंद केलेली नाही, तर आम्ही स्वतःहून यामध्ये का बदल करावा, असा प्रश्न टेल्कोच्या एका वरिष्ठ अधिकार्याने उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयाचे पालन करण्यासाठी काय करावे याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत, असेही कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे प्रत्येक क्षेत्राला बंधनकारक आहे. मात्र, या मुद्यावर आम्ही दिशानिर्देश जारी करू शकत नाही, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत पुढे काय करावे, याबाबत दूरसंचार विभाग गोंधळात आहे. असे असले, तरी न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विधी व न्यायमंत्रालय आणि यूआयडीएआयसोबत बैठक घेणार असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले. आधारमधील ग्राहकाच्या बायोमेट्रिक माहितीचा वापर करून मोबाईल कंपन्या तासाभरातच नवीन ग्राहकाचा मोबाईल क्रमांक सक्रिय करतात. यापूर्वी ग्राहकाच्या घरी जाऊन त्याची पडताळणी करण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागायचा.

Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry