एम. करुणानिधी यांचे निधन
8 Aug 2018►सिनेमा ते सीएम राजकीय प्रवास,
वृत्तसंस्था
चेन्नई, ७ ऑगस्ट –
द्रविडी राजकारणातले दिग्गज नेते व तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांचे आज मंगळवारी सायंकाळी ६.१० वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. प्रकृती गंभीर झाल्याने ११ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मागील ७० वर्षांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यांच्या मागे दोन पत्नी आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष स्टॅलिन, राज्यसभेच्या सदस्य कनिमोळी यांच्यासह सहा मुले आहेत.
करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळनाडू सरकारने एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला असून, उद्या (८ ऑगस्ट) शासकीय सुटी घोषित केली आहे. द्रमुक पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून गेल्या २७ जुलै रोजी त्यांना ५० वर्षे पूर्ण झाली होती.
पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. तामिळ भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे ते चित्रपटांसाठी पटकथा लिहीत असत. त्यानंतर राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. पेरियार व अण्णादुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांच्या राजकीय विरोधक अण्णाद्रमुक प्रमुख जयललिता यांचे २०१७ मध्ये निधन झाले.
तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण, हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणार्या पक्षाला १९५६ च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले. १९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षांतच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना, असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सुपरस्टार रजनीकांत, शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी करुणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
चाहते बुडाले शोकसागरात
करुणानिधी यांची तब्येत चिंताजनक असल्याचे कळतात आज सकाळपासूनच कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुक कार्यकर्ते आणि करुणानिधी यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी करुणानिधी यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
अन्त्यसंस्काराच्या जागेवरून वाद
एम. करुणानिधी यांच्यावरील अंत्यसंस्कार चेन्नईच्या प्रसिद्ध मरिना बीचवर करण्यास तामिळनाडू सरकारने परवानगी नाकारली आहे. त्याऐवजी गांधी मंडपम् जवळील जागा देऊ केली आहे. मरिना बीचवर एम. जी. रामचंद्रन्, जयललिता व अण्णादुराई यांची स्मारके आहेत, हे विशेष!