करुणानिधी यांचा मरिना बीचवरच दफनविधी
9 Aug 2018तभा वृत्तसेवा
चेन्नई, ८ ऑगस्ट –
मुतुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सायंकाळी येथील मरिना बीचवर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोच्या संख्येत जनसमुदाय मरिना बीचवर उसळला होता. मंगळवारी सायंकाळी येथील कावेरी रुग्णालयात करुणानिधी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९४ वर्षी निधन झाले होते.
करुणीनिधींचे पार्थिव मरीना बीचवर ठेवण्यात आल्यानंतर तिथेही हजारो लोकांनी त्यांचे दर्शन घेतले. लष्कराकडून २१ बंदुकांची सलामी देण्यात आल्यानंतर त्यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी करुणानिधींना मुठमाती दिली. करुणानिधी यांचे गुरू आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या समाधीच्या बाजूलाच करुणानिधी विसावले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री अनुक्रमे पी. विजयन्, के. चंद्रशेखर राव आणि एन. चंद्राबाबू नायडू, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा, केरळ आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी व अखिलेश यादव यांच्यासह शेकडो राजकीय नेत्यांनी राजाजी हॉल येथे करुणानिधी यांचे अंत्यदर्शन घेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर हे सर्व नेते मरिना बीचवर अंत्यविधी सोहोळ्यातही सहभागी झाले.
मरिना बीचचा मार्ग मोकळा
करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराकरिता मरिना बीचवर जागा देण्यात यावी, ही द्रमुकची मागणी अण्णाद्रमुक सरकारने फेटाळून लावल्यानंतर द्रमुकने लगेच मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत यावर सुनावणी झाली. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने द्रमुकच्या पक्षात निकाल देताना करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मरिना बीचचा मार्ग मोकळा केला.
द्रमुकच्या याचिकेला विरोध करताना राज्य सरकारने राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. करुणानिधी माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यावर मरिना बीचवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी; दोन ठार, ३३ जखमी
एम. करुणानिधी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजाजी हॉल येथे उसळलेली गर्दी अनियंत्रित झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन जण ठार, तर ३३ जण जखमी झाले आहेत. अंत्ययात्रेपूर्वी एम. करुणानिधी यांचा देह अंत्यदर्शनासाठी येथील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या लाखो समर्थकांची गर्दी येथे उसळली होती. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान पक्ष समर्थक आणि नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन द्रमुकच्या वतीने करण्यात आले.
…म्हणून करुणानिधी कायम काळा चष्मा लावायचे!
दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज नेते एम. करुणानिधी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. करुणानिधी यांचे नाव घेतल्यानंतर काळा चष्मा, पांढर्या कपड्यांवर पिवळी शाल घेतलेल्या एका व्यक्तीची प्रतिमा मनात तयार होते. करुणानिधी मागील ५० वर्षांपासून चष्मा वापरत होते. पण, या काळ्या चष्म्याची संपूर्ण कहाणी रोचक आहे.
१९६८ मध्ये चेन्नईला जाताना एका कार अपघातामध्ये करुणानिधी यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी डॉक्टरांनी त्यांना चष्मा घालायला सांगितले. त्यानंतर मोठ्या फ्रेमचा काळा चष्मा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला. करुणानिधी कायमच पांढरे कपडे आणि पिवळी शाल परिधान करत असत. विशेष म्हणजे ते दररोज दाढी करत असत.
तुमच्या चष्म्याची फ्रेम बदला, असा सल्ला डॉक्टरांनी मागील वर्षी करुणानिधी यांना दिला होता. यानंतर संपूर्ण देशात करुणानिधी यांच्यासाठी योग्य फ्रेमचा शोध सुरू झाला. ४० दिवस शोध घेतल्यानंतर जी फ्रेम करुणानिधी यांना आरामदायी वाटली, ती जर्मनीमधून मागवण्यात आली होती. चेन्नईतील विजया ऑप्टिकलने जर्मनीवरून हा चष्मा मागवला. या चष्म्याची फ्रेम वजनाने अतिशय हलकी होती. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर सुमारे ४६ वर्षांनंतर करुणानिधी यांनी आपला चष्मा बदलला. करुणनिधी मागील एक वर्षांपासून फारच आजारी होते. ते बाहेर पडायचे नाहीत. त्यामुळे त्यांना चष्म्याची फार गरज भासत नसे. त्यामुळे ते चष्मा बदलण्यास लगेचच तयार झाले.
करुणानधिी यांचे प्रतिस्पर्धी एमजीआरही काळा चष्मा घालत असत. इतकेच नव्हे तर त्यांना टोपी आणि चष्म्यासह दफन करण्यात आले. राजकारणातील दोन दिग्गज करुणानिधी आणि एमजीआर यांनी दक्षिणेत काळा चष्मा फॅशनमध्ये आणला, हे विशेष.