तरुण काश्मिरी पंडित निवडणुकीच्या रिंगणात
27 Sep 2018जम्मू, २६ सप्टेंबर –
काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत म्हणून दहशतवाद्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी घातपाताच्या धमक्या दिल्या आहेत. येथे उमेदवारी अर्ज करणार्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर स्थलांतरित झालेल्या दोन काश्मिरी तरुणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील वॉर्डमधून मंगळवारी त्यांनी अर्ज भरला. मात्र, आपल्या अर्जाबाबत त्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
दहशतवाद्यांकडून धमकीच्या पृष्ठभूमीवर या दोघांपैकी एका २८ वर्षीय पंडित तरुणाला ही बाब पूर्णपणे गुप्त ठेवायची होती. त्यामुळे अर्ज भरताना तो कॅमेरापासून दूरच होता. त्याचे व्हीडिओ, फोटोज तसेच आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात येणार नाही, याची त्याला खात्री दिल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो तातडीने जम्मूकडे रवाना झाला. तो जम्मूचा रहिवासी असून काश्मीर खोर्यात दहशतवादाचा भडका झाल्यानंतर आपल्या कुटुंबासह त्याला ९०च्या दशकात कुलगाममधून जम्मूकडे स्थलांतरित व्हावे लागले होते. १५ सदस्यांच्या एका छोट्या गटाचा तो सदस्य असून या सदस्यांनी कुलगाम आणि देवसार जिल्ह्यातील २१ वॉर्ड्समध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येथे ८ ते १६ ऑक्टोबरदरम्यान निवडणुका होणार आहेत. या गटात कमीत कमी दोन लोक हे स्थलांतरित पंडित आहेत.
या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर कुलगाममध्ये पूर्णपणे रिकामे राहण्याऐवजी आता एक तृतीयांश वॉर्ड रिकामा राहणार आहे. येथील सात वॉर्डमध्ये एकानेही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने हे वॉर्ड रिकामे आहेत. तर इतर १५ वॉर्ड्समध्ये बहुतेक उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील, अशी स्थिती आहे.
काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान घातपात घडवून आणण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. तसेच फुटीरवाद्यांनी या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. तसेच येथील दोन प्रमुख पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) या पक्षांनीही याआधीच या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. त्याचबरोर काँग्रेसनेही म्हटले आहे की, सध्या या निवडणुका घेण्यासाठी येथील वातावरण अनुकूल नाही.
दक्षिण काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायकू याने या निवडणुका लढवणार्या उमेदवारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांनाही जीवे मारले जाईल, अशी धमकी नायकूने दिली होती.
त्यानुसार, गेल्या शुक्रवारी तीन काश्मीर पोलिसांच्या हत्याही करण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर अनेक काश्मिरी पोलिसांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिल्याचे बोलले जात होते. मात्र, सरकारने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry