‘तितली’चा ६० लाखांवर लोकांना फटका
13 Oct 2018►प्रमुख नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी,
भुवनेश्वर, १२ ऑक्टोबर –
तितली चक्रीवादळ आणि त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० लाखांवर लोक प्रभावित झाले असून, त्यांच्या मदत व बचावासाठी ओडिशा सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.
गंजम, गजपती आणि रायगड या तीन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने तीन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कुठे अतिवृष्टी, तर कुठे मुसळधार पाऊस झाला. पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एनडीआरएफ आणि राज्य आपात् स्थिती निवारण दलाच्या जवानांना तैनात केले आहे, अशी माहिती विशेष मदत आयुक्त पी. पी. सेठी यांनी दिली.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज सकाळी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रभावित तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला. चक्रीवादळ आणि भीषण पूरस्थिती असे दुहेरी संकट ओढवलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
१६ रेल्वेगाड्या रद्द
चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामळे ईस्ट कोस्ट रेल्वेने १६ गाड्या रद्द केल्या असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.
गुरुवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश रेल्वे मार्गांवर पाणी साचले आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.