‘तितली’ने धारण केले उग्र रूप, ओडिशाला आज धडक
11 Oct 2018►हजारावर लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले,
भुवनेश्वर, १० ऑक्टोबर –
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘तितली’ चक्रीवादळाने आज बुधवारी उग्र रूप धारण केले असून, त्याने ओडिशाच्या किनारपट्टीकडे अतिशय वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी तो ओडिशाला धडक देणार असल्याने प्रशासनाने किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यातील हजारावर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत स्थितीचा आढावा घेतला. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर या पाच जिल्ह्यातील प्रशासनाला नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तातडीने नेण्याचे निर्देश दिले. यानंतर लगेच हालचाली सुरू झाल्या.
गुरुवारी दुपारनंतर हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देईल. त्यानंतर लगेच मुसळधार पावसालाही सुरुवात होईल. वार्यांचा वेग फार जास्त राहणार असल्याने आवश्यक ते खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव ए. पी. पाधी यांनी दिली.
राष्ट्रीय आपात् प्रतिसाद दल आणि राज्य आपात् प्रतिसाद दलाचे जवान पाचही जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत. आम्ही अद्याप लष्कराची मदत मागितली नाही. तथापि, आवश्यकता भासल्यास ती मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.