राजकारणामुळे ओडिशातील नागरिक ‘आयुषमान’पासून वंचित
8 Oct 2018►स्मृती इराणी यांची पटनायकांवर टीका,
भुवनेश्वर, ७ ऑक्टोबर –
राजकारणामुळे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक येथील नागरिकांना आयुषमान भारत व पेट्रोलच्या कमी झालेल्या किमतीपासून वंचित ठेवत आहेत, अशी टीका आज रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रालोआ सरकारने पेट्रोलचे दर २.५० रुपयाने कमी केले. मात्र, नवीन पटनायक अबकारी कर कमी करून जनतेस दिलासा देण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या. केवळ राजकारणामुळे त्यांनी येथील नागरिकांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळू दिलेला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ओडिशातील ६० टक्के महिला रक्ताल्पतेने ग्रासलेल्या आहेत. अविकसित मुलांच्या जन्मदरात ओडिशा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असतानाही त्यांनी राज्यात आयुषमान भारत योजना लागू केलेली नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना पटनायक यांनी आयुषमान भारत योजना लागू केलेली नाही, असे सांगतानाच त्यांनी, केंद्राच्या योजनेचा लाभ का मिळत नाही, असा प्रश्न राज्यातील गरीब नागरिक विचारीत आहेत, असे सांगितले.
राज्यामध्ये दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. नवीन पटनायक यांचे सरकार राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यास, महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात जनजागृती करण्यात, बेरोजगारीच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १४७ जागांपैकी १२० जागा भाजपाला जिंकायच्या आहेत, असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. सत्तेसाठी नव्हे, तर जनजागृती, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजपाला या जागा जिकांयच्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.