अनिल अंबानी प्रकरणी भाजपा करणार काँग्रेसची पोलखोल
13 Oct 2018►संपुआने अंबानींना दिले होते एक लाख कोटींचे प्रकल्प,
नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर –
फ्रान्ससोबतच्या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात दसाँ कंपनीने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला ऑफसेट भागीदार केल्याने काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू केल्या असतानाच, भाजपानेही आता काँगे्रसची पोलखोल करण्याची तयारी सुरू केली आहे. संपुआ सरकारच्या काळात अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहाला किती फायदा करून देण्यात आला होता, याची सविस्तर माहितीच भाजपाने संकलित केली आहे.
काँग्रेसचा उद्योगस्नेही कारभार चव्हाट्यावर आणण्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. संपुआ सरकारच्या काळात अनिल अंबानींना मिळालेल्या प्रकल्पांची यादी सरकार तयार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संपुआ सरकारच्या काळातील अखेरच्या सात वर्षांमध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाला एक लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले होते. या बाबतची सर्व माहिती रस्ते व परिवहन मंत्रालय आणि दूरसंचार खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो आदी प्राधिकारणांकडून संकलित केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
संपुआ सरकारच्या काळात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची वेगाने भरभराट झाली. पाच वर्षांत रिलायन्सची वीज वितरण कंपनी देशातील सर्वांत मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून पुढे आली आहे. अनिल अंबानी समुहाच्या कंपन्यांशी संबंधित माहितीही गोळा केली जात आहे. यापैकी अनेक कंपन्यांना त्या-त्या क्षेत्राचा अनुभव नसतानाही अनेक प्रकल्पाची कंत्राटे देण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले.