अपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले
10 Aug 2018तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट –
राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार हरिवंशनारायणसिंह विजयी झाले. सिंह यांनी संपुआचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव करत, विरोधी पक्षांच्या तथाकथित आघाडीच्या ऐक्याचा फुगा फोडला. हरिवंशनारायणसिंह यांच्या विजयाने रालोआचे मनोबल उंचावले असून विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
भाजपाने उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी जदयुचे हरिवंश नारायणसिंह यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना संपुआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. हरिवंश नारायणसिंह यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपाचे अमित शाह, जदयुचे आरसीपी सिंह, शिवसेनेचे संजय राऊत आणि अकाली दलाचे सुखदेवसिंह धिंडसा यांनी मांडला. बी. के. हरिप्रसाद यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसचे भुवनेश्वर कलिता, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, सपाचे रामगोपाल यादव आणि राजदच्या मिसा भारती यांनी सादर केला.
आज झालेल्या निवडणुकीत हरिवंश नारायणसिंह यांना १२५, तर हरिप्रसाद यांना यांना १०५ मते मिळाली. दोन सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. राज्यसभेची सदस्यसंख्या २४४ आहे. सभागृहात सर्व सदस्य उपस्थित असते तर विजयासाठी १२३ मतांची गरज होती. मात्र मतदानाच्या वेळी सभागृहात २३२ सदस्यच उपस्थित होते. त्यामुळे विजयासाठी ११७ मतांची आवश्यकता होती.
आवाजी मतदानाने निवडणूक न झाल्यामुळे मतदान घेण्यात आले.
सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरिवंशनारायणसिंह यांच्या विजयाची घोषणा केली. विजयाच्या घोषणेनंतर सभागृहाचे नेते अरुण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार आणि राज्यमंत्री विजय गोयल यांनी सन्मानपूर्वक हरिवंश नारायण सिंह यांना उपसभापतिपदासाठी असलेल्या विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला असलेल्या पहिल्या रांगेतील पहिल्या स्थानावर बसवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर हरिवंश नारायणसिंह यांच्याजवळ जात त्यांचे अभिनंदन केले. हरिवंशनारायणसिंह यांच्या विजयामुळे सभागृहात आता सभापती आणि उपसभापती अशी दोन्ही पदे रालोआकडे आली आहे. आतापर्यंतचे उपसभापती पी. जे. कुरियन काँग्रेसचे होते.