अविश्वास प्रस्ताव बौद्धिक दिवाळखोरीच : मोदी
1 Aug 2018►सरकारची चार वर्षांची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी झाला फायदा,
नवी दिल्ली, ३१ जुलै –
बहुमताच्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी आपल्या राजकीय दिवाळखोरीचे दर्शन घडविले, मात्र सरकारने याचा फायदा घेत, आपली चार वर्षांची उपलब्धी देशातील जनतेपर्यंत पोहोचवली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केले.
संसदभवन परिसरातील बालयोगी सभागृहात आयोजित भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मत्री सुषमा स्वराज, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अविश्वास प्रस्ताव प्रचंड बहुमताने फेटाळल्या गेल्याबद्दल भाजपा संसदीय पक्षाने पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. अमित शाह यांनी मोदी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व लाडू भरवून तोंड गोड केले.
सरकारविरुद्दचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याबद्दल माझे नाही, तर सर्व खासदारांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. स्वत:जवळ कोणतेही बहुमत नसताना विरोधी पक्षांनी स्पष्ट बहुमताच्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून आपल्या राजकीय व बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले. कोणताही प्रगल्भ राजकीय पक्ष अशी चूक करू शकत नाही. विरोधी पक्षांच्या या चुकीचा फायदा सरकारने घेतला आणि आपली चार वर्षांची उपलब्धी प्रभावीपणे जनतेपर्यंत, समाजातील तळागळाच्या वर्गापर्यंत पोहोचवली. अविश्वास प्रस्तावावर झालेली चर्चा आम्ही ऐकली, असे मला युगांडातील अनिवासी भारतीयांनीही सांगितले, असेही मोदी यांनी सांगितले.
अविश्वास प्रस्तावावर ज्यांनी सरकारचे समर्थन केले, त्यांचे आम्ही आभारी आहोत, मात्र ज्यांनी प्रस्ताव आणला, त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करतो. कारण यामुळे आम्हाला देशातील जनतेपर्यंत उपलब्धी पोहोचविता आली, असे अमित शाह म्हणाले. मोदी सरकारची उपलब्धी आपापल्या मतदारसंघापर्यत पोहोवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी सदस्यांना केले. सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांचेही यावेळी भाषण झाले. तेलुगू देसम्ने पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. आंध्रप्रदेशवर आम्ही कधीच अन्याय केला नाही, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले, तर मोदी सरकारच्या कामगिरीमुळे विदेशात भारताची प्रतिमा उजळली असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
बँकांमध्ये जनधन खाते उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पने प्रशंसा केली. त्याचप्रमाणे भारतात महिलांना सहा महिन्यांची मातृत्व रजा देण्याच्या निर्णयाचीही विदेशात दखल घेतली गेली, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.