इसिसचा अतिरेकी अडकला गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात
12 Jul 2018►शस्त्रास्त्र पुरवून हॉटेलमध्ये मुक्कामाची सोयही केली
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ जुलै –
भारतात मोठा घातपात घडविण्यासाठी अफगाणिस्तानातून आलेल्या इसिसच्या अतिरेक्याला गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्यांनी अफलातून सापळा रचून अटक केली. गुप्तचर अधिकार्यांनी वेशांतर करून त्याला शस्त्रास्त्रे पुरवली आणि दिल्लीतील हॉटेलात त्याच्या मुक्कामाची सोय करून त्याला अलगद जाळ्यात अडकविले.
एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. गुप्तचर यंत्रणांनी अशा स्वरुपाचा सापळा रचून एखाद्या अतिरेक्याला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अफगाणिस्तान, दुबई आणि नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय गुप्तचर यंत्रणा सुमारे १८ महिने काही अतिरेक्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. इसिसच्या १२ अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून, ते भारतातील काही महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. दुसरीकडे रॉ या गुप्तचर संस्थेकडूनही दुबईतून अफगाणमधील एका खात्यात जमा झालेल्या ५० हजार डॉलर्सचा तपास सुरू होता. याच दरम्यान अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीवरून इसिसचे लक्ष्य दिल्ली असल्याचे स्पष्ट झाले. ‘रॉ’ने हा कट उधळून लावण्यासाठी थेट इसिसच्या अतिरेक्यालाच जाळ्यात अडकविण्याचा निर्णय घेतला. यातील एक अतिरेकी अफगाणचा २० वर्षांचा तरुण असून, त्याचे वडील अफगाणमधील मोठे व्यावसायिक आहेत, अशी माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. या अतिरेक्याने आधी दिल्लीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला तो महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहात होता. यानंतर त्याने लाजपतनगरमध्ये भाड्याने घर घेतले व हल्ल्याची तयारी सुरू केली होती.
त्याच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणेतील ८० जणांचे पथक कार्यरत होते. त्याला घर मिळवून देण्यापासून तर शस्त्रास्त्र पुरवण्यापर्यंतचे काम गुप्तचर यंत्रणेकडूनच केले जात होते. यासाठी गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकार्याने त्याच्याशी चांगली मैत्रीही केली होती. अफगाणमधील म्होरक्यांकडून त्याला सूचना मिळत होत्या. तो अतिरेकी जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट होताच गुप्तचर यंत्रणांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीसाठी अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेचे एक पथकही भारतात आले होते. या अतिरेक्याची रवानगी अफगाणमधील तुरुंगात करण्यात आली असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावरच अमेरिकेच्या सुरक्षा दलांना तालिबानच्या बड्या नेत्यांना ठार मारणे शक्य झाले होते, हे विशेष!