‘चांद्रयान-२’ मोहीम जानेवारीनंतरच
6 Aug 2018वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट –
चंद्राचा अभ्यास करणारे भारताची दुसरी मोहीम अर्थात् चांद्रयान-२ पुढील वर्षी जानेवारीनंतरच अंतराळात झेपावणार आहे. इस्रोने या मोहिमेच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम नव्याने तयार केला आहे.
इस्रोच्या दोन मोहिमांना वर्षभरातच अपयश आल्याने, ऑक्टोबरमधील नियोजित ‘चांद्रयान-२’ मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जानेवारीनंतरच ही मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली. याच वर्षीच्या सुरुवातीला इस्रोने ‘जीसॅट-६ए’ या लष्करी दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले, पण अंतराळात पाठविल्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता, तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयआरएनएसएस-१एच या दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपणही अपयशी ठरले होते. चंद्रयान-२चे प्रक्षेपण एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित झाले होते. तथापि, काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ऑक्टोबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. आता हा मुहूर्तही लांबणीवर पडला आहे. भारताची ही दुसरी चांद्रयान मोहीम आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रयान-२ मोहीम होती घेण्यात आली आहे. चंद्रयान-२ अंतराळ यानाचे वजन ३,२९० किलोग्रॅम आहे. हे यान चंद्राच्या चारही बाजूंनी भ्रमण करून माहिती एकत्र करणार आहे.

Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry