डॉ. बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधान : पंतप्रधान मोदी
Apr 15 2018►बाबासाहेबांनीच घटनेत दलितांच्या रक्षणाची तरतूद केली
►आपल्या हक्कासाठी नक्षलवादी बनू नका
►पंतप्रधान मोदी यांचे आवाहन,
तभा वृत्तसेवा
जंगाला, १४ एप्रिल –
मागासवर्गीयांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची तरतूद घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत ठळकपणे केली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन करताना, आपल्या अधिकारांसाठी तरुणांनी नक्षलवादी बनू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे केले.
ज्या मुलांनी नक्षलवादाचा मार्ग स्वीकारला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलांना परत येण्याचे कळकळीचे आवाहन करावे. काही नक्षली नेते स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तरुणांची दिशाभूल करीत असतात, त्यांच्यासाठी आपल्या मुलांचा बळी देऊ नका, असेही पंतप्रधान म्हणाले.
गरीब आणि मागासवर्गीय समाजातील लोकांना त्यांच्या अधिकारांबाबत जी जाणीव आहे, ती केवळ बाबासाहेबांमुळेच असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. बाबासाहेबांनी आपल्या घटना दिली. त्यात त्यांनी आपल्या सर्वांच्याच हिताच्या रक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वांच्या हिताचे रक्षण करणे, ही माझ्या सरकारची जबाबदारीच आहे. त्यासाठी तुम्हाला हातात शस्त्र घेण्याची आणि आपले आयुष्य धोक्यात टाकण्याची मुळीच गरज नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ‘जरा विचार करा, तुमची तरुण मुले व मुली हातात बंदूक घेतात, नक्षलवादी होतात आणि त्यांची दिशाभूल करणारे नक्षली नेते जंगलात जवानांसोबतच्या चकमकीत तुमच्याच मुलांची ढाल करून आपला जीव वाचवितात. हे नक्षली नेते आपल्यामधील नाही आणि आपल्या गावातीलही नाही. ते बाहेरून आले आहेत. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठीच ते तुमच्या मुलांचा वापर करीत असतात. अशा लोकांच्या हातात तुम्ही आपली मुले का सोपवता,’ असा प्रश्नही पंतप्रधानांनी उपस्थित केला.
बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधान
मी जर आज देशाचा पंतप्रधान आहे, तर तो केवळ बाबासाहेबांमुळेच. माझे बालपण गरिबीत गेले. एका गरीब घरात जन्माला आल्याने मला संघर्ष करावा लागला. या संघर्षातून मी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलो, ते केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांमुळेच, असे ठाम मत मोदी यांनी मांडले.