तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निर्णय आयोग करेल
8 Sep 2018►ओ. पी. रावत यांची भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –
तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका केव्हा घ्यायच्या, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग राज्यातील परिस्थितीचा पूर्ण विचार करून घेईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज स्पष्ट केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देत राज्य विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपालांनी चंद्रशेखर राव यांचा राजीनामा मंजूर करत चंद्रशेखर राव यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची विनंती केली आहे. राज्यपालांनी राज्य विधानसभाही बरखास्त केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना चंद्रशेखर राव यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली होती. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत तेलंगणातही विधानसभा निवडणूक घेतली जाईलच, असे नाही, असे स्पष्ट करीत रावत म्हणाले की, चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत तेलंगणातही विधानसभा निवडणूक घेता येईल का, याचा विचार राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून आयोग करेल.
मुळात कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणुका केव्हा घ्यायच्या हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. दुसरा कोणीही यात हस्तक्षेप करू शकत नाही. कायद्यातही याबाबत अशी कोणतीही तरतूद नाही. विधानसभा निवडणुका केव्हा घ्यायच्या, याबाबत कोणीही आयोगाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निर्देश देऊ शकत नाही, असे रावत म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत कोणी भविष्यवाणी केली असली तरी त्याला अर्थ नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग तेथील मुख्य निवडणूक अधिकार्यांकडून पूर्ण माहिती जाणून घेणार आहे, त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा घ्यायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या धोरणानुसार तसेही पुढील वर्षीच्या एप्रिल मेमध्ये तेलंगणातही विधानसभा निवडणूक होणार होती, असे एका प्रश्नावर रावत यांनी स्पष्ट केले.