विरोधकांना मोदीफोबियाने ग्रासले
25 Sep 2018►अमित शाह यांची टीका,
पुरी, २४ सप्टेंबर –
विरोधकांजवळ देशाच्या विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यांच्याकडे एकही मुद्दा नसल्याने त्यांना केवळ मोदी फोबियाने ग्रासले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढाच एकमेव उपक्रम त्यांच्याजवळ उरला आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सोमवारी येथे केली.
भारताला जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून विकसित करण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार आहे. रालोआतील अन्य घटक पक्षही यात मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पंतप्रधानांना शक्तिशाली भारताची निर्मिती करायची आहे आणि मोदी फोबियाने ग्रासलेले विरोधक देश तोडण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. पंतप्रधानांना देशातून दारिद्र्य हद्दपार करायचे आहे आणि विरोधकांना मोदींना हद्दपार करायचे आहे, असे अमित शाह यांनी भाजपा महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.
ओडिशा हे खनिजसमृद्ध राज्य असतानाही त्याची गणना मागासलेले राज्य म्हणून केली जाते आणि यासाठी केवळ नवीन पटनायक सरकारची धोरणे जबाबदार आहेत. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत पटनायक यांचा पराभव अटळ आहे, असा दावाही त्यांनी केला.
काँगे्रससह अन्य विरोधकांकडे ना धोरण आहे, ना विकासाची दृष्टी आहे आणि ना सक्षम नेता आहे. गेल्या चार वर्षांत एकही भ्रष्टाचार न झाल्याने विरोधकांची फार मोठी निराशा झाली आहे. एकही मोठा मुद्दा नसल्याने त्यांनी मोदी यांना हटविण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.