Home » अग्रलेख, संपादकीय » इमानदारी की आक्रोश?

इमानदारी की आक्रोश?

‘चॅरिटी बिगिन्स ऍट होम.’ सारा देशच स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली म्हटल्यावर, सुरुवात स्वत:पासून करण्याचा आणि या प्रकरणात आपला-तुपला असा भेद केला जाणार नसल्याचा पंतप्रधानांच्या मनातला निर्धार क्षणाक्षणाला व्यक्त होतोय्. म्हणूनच तो तेवढाच महत्त्वाचाही ठरतो आहे. एकीकडे लालू, केजरीवाल, राहुल, ममतापासून झाडून सारी मंडळी नोटबंदीच्या मुद्यावर सरकारविरुद्ध दंड थोपटून उभी राहिली असताना, म्हणजेच या प्रकरणी त्यांची भूमिका पूर्णपणे संशयास्पद ठरली असताना, भारतीय जनता पक्षातले लोकप्रतिनिधी मात्र, नोटबंदीनंतरच्या काळातील आपले खाजगी बँक व्यवहार जगजाहीर करणार आहेत. हे वागणे जबाबदार लोकप्रतिनिधींचे आहे. हे येरागबाळ्याचे काम नोहे! असे करायला धमक लागते. ती ज्यांच्यात आहे ते लोक जनतेला सामोरे जाण्यास सज्ज होत आहेत. ज्यांच्यात तशी धमक नाही, ते लोक सर्वसामान्य जनतेच्या हिताचे गोडवे गात, त्या आडून नोटबंदीला विरोध करताहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत राहिलेल्या छोट्या छोट्या त्रुटींवर मोठमोठी भाषणे देताहेत. काळा पैसा बाहेर आला पाहिजे की नाही, तो जमा करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे की नाही, असल्या प्रश्‍नांच्या उत्तरादाखल नाही म्हणता येत नाही म्हणून हो म्हणायचे अन् प्रत्यक्षातील कृती मात्र काळे धंदे करणार्‍यांना साह्यभूत ठरेल अशीच करायची, असा सारा प्रकार सध्या संसदेतील गोंधळी करताहेत. आपल्या असल्या वागण्यातून आपण आडमार्गाने भ्रष्टाचार्‍यांचे समर्थन करीत आहोत, हे लक्षात येत असले, तरी त्यांची निलाजरी नौटंकी संपत मात्र नाहीय्. कारण असले धंदे करणारे लोकच त्यांचा आधार राहिले आहेत कालपर्यंत. त्यांच्या स्वत:ची मिळकतही संशयास्पद पद्धतीनेच वृद्धिंगत होत राहिली आहे. कुठलाही व्यवसाय, उद्योग नसताना या देशातल्या राजकारण्यांकडे जमा होणारी गडगंज संपत्ती एरवीही चर्चेचा विषय ठरली आहे. ही मंडळी कुठल्या तोंडाने भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणार? अशाच लोकप्रतिनिधींचा थयथयाट; थयथयाट कसला, धिंगाणा चालला आहे सध्या संसदेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गैरमार्गाने पैसा कमावणार्‍या, त्यावरचा कर चुकवणार्‍या तमाम लोकांना कोंडीत पकडणे सुरू केले आहे. त्यांना जाळ्यात अडकविण्याची, त्यांच्या भोवतीचा फास आवळत नेण्याची योजना दररोज जाहीर होत असताना आणि त्याबाबत या देशातील सामान्य माणूस मनापासून आनंद व्यक्त करीत असताना, काही मूठभर लोकांना मात्र या निर्णयामुळे पोटशूळ उठला आहे. केजरीवालांपासून तर ममतादीदींपर्यंतचे राजकारणी त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. त्यामागील कारण या देशातील सुजाण नागरिकांना सांगणे न लगे! एकीकडे या निर्णयाविरुद्ध सरकारविरोधी पक्षातले लोक राष्ट्रपतींच्या दरबारात गार्‍हाणी मांडायला सरसावले असताना शिवसेनेसारखे सरकारचे मित्र म्हणवणार्‍या पक्षाचे नेतेही त्यात सामील झाले आहेत. अशा स्थितीत स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचे बँक व्यवहार जनतेसमोर मांडायला भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने सांगणे आणि त्या पक्षातील लोकप्रतिनिधींनीही आपल्या नेत्याच्या या आदेशाचे स्वागत करणे, ही बाब डोळ्यांत भरणारी आहे. त्या पक्षाचे, त्याच्या नेतृत्वाचे वेगळेपण स्पष्ट करणारी आहे. स्वच्छ चारित्र्याचा, तशाच आचरणाचा आग्रह केवळ दुसर्‍यांसाठी, त्याबाबतची अपेक्षा केवळ दुसर्‍यांकडून नाही, तर स्वत:पासून त्यासाठीची सुरुवात करण्याची ही परिपाठी आहे. थोडीफार बसली असेल, तर नोटबंदीच्या निर्णयाची झळ सर्वांंनाच बसली आहे. पण, इथे चित्र असे आहे की, ज्यांना ती झळ प्रत्यक्षात बसली त्यांची कुठेही तक्रार नाही. उलट, सरकारने घेतलेला एक चांगला, धाडसी निर्णय म्हणून लोक त्याचे स्वागत करताहेत. याच्या नेमके उलट ज्यांना स्वत:ला बँकांपुढच्या रांगेत उभे राहायचेच नाही, त्यासाठी ज्यांच्या घरात नोकरांची रांग लागली आहे, ते मात्र अकारण आकांडतांडव करताहेत. रस्त्यांवर उतरून तमाशा करताहेत. हा मुद्दा उपस्थित करून संसदेचा वापर स्वत:च्या पक्षीय राजकारणासाठी करताहेत. सामान्य जनतेच्या नावावर त्यांचे स्वार्थाचे राजकारण चालले आहे. अर्थात, सामान्य जनतेच्या आडून त्यांचे नक्राश्रू नेमके कुणाच्या हितार्थ ढाळले जाताहेत, ही बाबही आता लपून राहिलेली नाही. एक बाब खरीच की, या निर्णयातून भविष्यात चांगले परिणाम घडून येणार असल्याचा विश्‍वास ज्या लोकांच्या मनात आहे, त्यांची या प्रकरणात थोडासा त्रास सहन करण्याचीही तयारी आहे. बेहिशेबी मालमत्ता जमा करणार्‍यांना कसा आवडेल सरकारचा निर्णय? त्यांना तर फटका बसणार आहे या निर्णयाचा! असा फटका बसण्याची शक्यता असलेल्या लोकांचीच अडचण झाली आहे. रडगाणे त्यांचेच चालले आहे. आपला पक्ष अशा भ्रष्टाचार्‍यांच्या पाठीशी नसल्याचे जनतेसमोर दाखवून देण्याची संधी अनायासे चालून आली आहे. दुर्दैव असे की ज्या नेत्यांनी, ही संधी साधून जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण करायला हवा, नेमके तेच नेते जनहिताचा आडोसा घेत आक्रोश करीत निघाले आहेत. आधीच या देशातील लोकांच्या मनातला विश्‍वास इथल्या राजकारण्यांनी आज पुरता गमावला आहे. सर्वात घाणेरडे क्षेत्र कोणते असेल, तर ते राजकारण, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला राजकीय नेत्यांचा तोरा, त्यांचा राजेशाही थाट, मतदारांशी त्यांचे फटकून वागणे, निवडून येताच काही दिवसांतच त्यांच्या खिशात खुळखुळू लागणारा पैसा… हे सारे बघितले की, राजकारण कसे अन् कुणाच्या जिवावर चालते, यात वरवंटा नेमका कुणावर चालतो अन् शिरजोर कोण होत जातो, या बाबी लोक उघड्या डोळ्यांनी बघताहेत इतकी वर्षे. पक्ष स्थापन होऊन अद्याप बोटावर मोजण्याइतकी वर्षे उलटली नसताना आम आदमी पार्टीला विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळतात, हे गणित न कळण्याइतकी का खुळी आहे इथली जनता? गेल्या काही वर्षांत तर परिस्थिती अशी निर्माण झाली की, सत्ताधार्‍यांविरुद्ध ब्र काढण्याची सोय राहिली नव्हती. इतकी मुजोरी अन् बेदिली माजली असताना, पहिल्यांदा कुणी नेता स्वत: राजकारणात वावरूनही जरासा हटके वागण्याचा प्रयत्न करतोय् म्हटल्यावर त्याबाबत लोकांच्या मनात अप्रूप असणारच. आपण ज्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही असे कालपर्यंत वाटत होते, त्या सर्व बड्यांना बखुटं धरून उभे केले जात असल्याचे बघून सामान्य लोक ठामपणे पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहिले नसते तरच नवल! ही संधी आहे. सर्वांसाठीच. इमानदारी सिद्ध करण्याची. ज्यांना ती साधायचीय् ते आपले हिशेब जनतेपुढे मांडणार आहेत. ज्यांना पळवाटा काढायच्यात ते आक्रोश करताहेत…

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अग्रलेख, संपादकीय (268 of 345 articles)


  दिल्ली वार्तापत्र : श्यामकांत जहागीरदार | नोटबंदीच्या मुद्यावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध सुटण्याऐवजी आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे. काळा पैसा ...