Home » अग्रलेख, संपादकीय » गुलाम काश्मीरमध्ये काळा दिवस!

गुलाम काश्मीरमध्ये काळा दिवस!

भारतातील जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून कुमक घेऊन फुटीरतावादी कारवाया करणार्‍या लोकांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गुलाम काश्मीरमध्ये काय चालले आहे, याचा थोडा जरी अंदाज घेतला, तरी त्यांची डोकी जरा ताळ्यावर येतील. ज्याचा उल्लेख आम्ही गुलाम काश्मीर असा करतो, त्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणत असते. आज त्या आझाद काश्मीरमधील लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन जगाला ओरडून सांगत आहेत की, आम्ही आझाद नसून गुलाम आहोत. या पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांचे हाल अतिशय बेहाल आहेत. त्यांच्यावर तिहेरी संकट आहे. पाकिस्तानी सरकारचे सैनिक आणि पोलिस त्यांनी स्वातंत्र्याची, लोकशाहीची मागणी करताच त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करत आहेत. दुसरीकडे हाफीज सईदसारख्या मस्तवाल अतिरेकी संघटना येथील नागरिकांना भारताविरोधात भडकवून ‘तुम्हाला जगायचे असेल तर भारताच्या विरोधात लढा’ अशा प्रकारे बाध्य करत आहेत. या भागात तिसरे आक्रमण चीनचे आहे. चीनने पाकिस्तान आणि भारतावर नियंत्रण ठेवण्याच्या इराद्याने या भागात आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. या परिस्थितीत गुरुवारी या गुलाम काश्मीरमधील लोकांनी पाकिस्तानच्या दमनचक्राच्या विरोधात काळा दिवस पाळला आहे. भारतीयांनी याची गंभीर दखल घेतलीच पाहिजे. गुलाम काश्मीरमध्ये मुजफ्फराबाद आणि अन्य मोठ्या शहरांत तेथील मूळ रहिवासी, काश्मिरी लोकांनी काळा दिवस साजरा करत रस्त्यावर येऊन पाकिस्तानी सेना आणि आयएसआयच्या विरोधात घोषणा दिल्या.  कोटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले होते. या भागात निदर्शने करणार्‍या एकाने म्हटले की, पाकिस्तानला आता स्वतःला आवरता येईनासे झाले आहे. नवाज शरीफ जगात कोठेही असले, तरी त्यांच्यावर सेनाप्रमुख राहिल शरीफ यांची भीतिदायक सावली असतेच! निदर्शने करणार्‍यांपैकी दुसरा एक म्हणाला की, ‘गुलाम काश्मीरमधून पाकिस्तानी लोकांना लाथा-बुक्क्या मारून बाहेर काढले पाहिजे. आम्ही ते करू कारण आमच्या जवळ आता गमावण्यासारखे काही राहिलेले नाही. कमावण्यासाठी मात्र बरेच काही आहे.’ यावरून येथील लोक आता निर्णायक अवस्थेत करू किंवा मरू अशा मानसिकतेत आले आहेत. पाकिस्तानची फूस मिळाल्याने भारतातील जे लोक भारतविरोधात कारवाया करण्यात धन्यता मानतात त्यांनी जरा पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची ही अवस्था आणि त्यांची भूमिका समजून घेतली, तर पाकिस्तान म्हणजे यातनांचा नरक आहे आणि या नरकात जाण्यासाठी आपण संघर्ष करत आहोत ही स्वतःची करत असलेली फसवणूक त्यांच्या लक्षात येईल. हा पाकिस्तानविरोधी आवाज आता या गुलाम काश्मीरप्रमाणे जगातही प्रतिध्वनीसारखा उमटतो आहे. बेल्जियमच्या राजधानीत सिंध, बलुच आणि या गुलाम काश्मीरमधील बुद्धिवादी लोकांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठविला. त्यांनी या वेळी मांडलेली मते जगातील लोकांनी लक्षात घ्यावी अशी आहेत. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढण्याच्या नावाखाली दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विचारवंतांनी असेही म्हटले आहे की, पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडोर हा सुद्धा सिंध आणि बलुचिस्तानला बरबाद करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. अनेक बाजूंनी घेरल्या गेलेल्या पाकिस्तानात फक्त भारताचा बागुलबोवा उभा करून लोकांना भडकवण्याचे एकमेव काम केले जात आहे. मात्र, ही फसवणूक सुद्धा कधीही पाकिस्तानवर उलटू शकते, अशी स्थिती आहे.
पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात पाकिस्तानची दुटप्पी नीती असते. एकीकडे तर या भागाला आझाद काश्मीर म्हणायचे आणि दुसरीकडे येथील रोजच्या प्रशासनावर पकड ठेवून राजकारणात सरळ हस्तक्षेप करत येथील सामाजिक वीण बिघडविण्याचे कारस्थान करायचे, असा प्रकार चालला आहे. तोंडाने आझाद म्हणायचे आणि प्रत्यक्षात येथील लोकांना गुलामासारखे वागवायचे अशी चाल आहे. येथील सगळ्या गोष्टींवर इस्लामाबादवरूनच वचक आणि नियंत्रण ठेवले जात आहे. येथील शिया मुस्लिमांना कसलेच मूलभूत अधिकार नाहीत. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. वेळोवेळी ते भारतात जम्मू काश्मीरमध्ये येऊन राहिले आहेत. आझादीचे स्वप्न दाखवत पाकिस्तानने या भागाला पाकिस्तानचाच भाग बनविण्याचा डाव खेळणे चालू केले आहे. या धोरणामुळे येथील मूळ काश्मिरी लोकांना जातीय संघर्ष, दहशतवाद आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तेथील लोकांचे जीवन वरचेवर अधिक संकटमय आणि हलाखीचे होत गेले आहे. पाकिस्तानने तेथे विकासाचे एकही पाऊल उचललेले नाही. आता या गुलाम काश्मीरमध्ये चीनकडून एक लाल संकट घुसले आहे. हजारो चिनी सैनिक येथे विविध कारणांनी घुसले आहेत. या भागातून चीन एक दोनशे किमी लांबीचा बोगदा तयार करणार असल्याबद्दल पाकिस्तानने करार केला आहे. चीनचा हेतू यामागे विकासाचा नसून चीनमध्ये शिनजियांग प्रान्तात पाकिस्तानातील अतिरेकी ज्या दहशतवादी कारवाया करतात त्याला आळा घालण्याचा जास्त आहे. या गुलाम काश्मीरमधला बराच भाग पाकिस्तानने याआधीच चीनला बहाल केला आहे. गुलाम काश्मीरमध्ये घुसून चीन पाकिस्तान आणि भारतालाही शह देण्याच्या कुटिल हेतूने काम करत आहे. पाकिस्तानने आपण काश्मिरी लोकांचे भले करू इच्छितो असा आव आणत भारतातील काश्मीर खोर्‍यातील लोकांना भडकवण्याचा जो उद्योग अनेक वर्षांपासून चालविला आहे तो किती खोटारडा आहे हे या गुलाम काश्मीरमध्ये आता सिद्धच झाले आहे. गुलाम काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार काश्मिरी आणि गैर काश्मिरी असा भेद करते. काश्मिरींना तेथून पळवून लावण्याचे कारस्थान केले जाते. गिलगिट, बाल्टिस्तानात लोकांनी जर लोकशाही हक्क मागितले तर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. पाकिस्तानी सैनिक, पोलिस आणि दहशतवादी यांच्यामुळे मीरपूर, मुझफ्फराबाद, भिंबर, कोटली, देवबटाला अशा अनेक शहरातील पन्नास हजारावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. बारा लाख शिया मुस्लिमांनी भारतात जीव मुठीत धरून आश्रय घेतला आहे. आधी येथील मुस्लिम नसलेल्या लोकांना आणि शिया मुस्लिमांना अत्याचार करून पळवून लावण्याला सुरुवात झाली. आता तेथील सुन्नी मुस्लिमांना एकच काम उरले आहे ते म्हणजे हाफीज सईदसारख्या दहशतवाद्यांकरता काम करणे. आता गुलाम काश्मीरमध्ये काश्मिरी भाषा बोलणारे अगदी औषधलाच सापडतात. आता तेथील लोकांना परिस्थितीची जाणीव होते आहे. ज्या पाकिस्तानच्या नादी लागून इतके दिवस संघर्ष केला त्या पाकिस्तानकडून अपमानित जिण्याशिवाय काहीच मिळणार नाही. आझादी तर दूरच पण जिवंत राहणेही मुश्कील अशी स्थिती आहे. जिवंत राहायचे असेल तर भारतविरोधी कारवाया करा अशी त्यांना एकच अट आहे. जे पेरले तेच उगवते आहे. भारतात काश्मीरमध्ये व अन्यत्र फुटीरवादी कारवाया करणार्‍यांनी जरा यातून धडा घेण्याची वेळ आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अग्रलेख, संपादकीय (392 of 408 articles)


  मुक्त विचार : किरण शेलार मुंबईच्या राणीच्या बागेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका पेंग्विनमुळे देशभरात एका निराळ्याच चर्चेला तोंड फुटले ...