वजन : असं, तसं आणि तसंच…
30 Sep 2018मराठीतल्या कुठल्या शब्दाचा केव्हा, कोण, कधी आणि कसा अर्थ काढेल, याची काहीच शाश्वती नसते. कुणाचे वजन वाढतेय्, असे म्हटल्यावर त्याने त्यावर उपाय करायचे की इतरांनी निरुपाय होऊन त्याच्यासमोर मान तुकवायची ते त्याचे वजन कसे नि कुठे वाढते आहे, यावर ठरत असते. कुणा कुणाचे दिल्ली-मुंबईत वजन असते. कुणाचे साहेबांकडे वजन वाढत असते. ‘‘त्याचे वजन आहे बुवा सासरवाडीला’’, असे म्हणतात. प्रतिष्ठेच्या अर्थाने, कामे करवून घेण्याच्या अर्थाने वजन वाढत असेल तर ते चांगले असते. ‘‘त्याच्या शब्दाला तिकडे वजन आहे.’’, किंवा, ‘‘माझ्यासाठी तुमचे वजन वापराना थोडे!’’ असे म्हटले जाते. तेव्हा हे वजन शरीराचे नसते. असे वजन वाढणे चांगले असते. त्यासाठीही अर्थात परिश्रम करावेच लागत असतात. आता वजन वाढणे आणि ‘खाणे’ यांचाही जवळचा संबंध आहे. गंमत म्हणजे दोन्ही अर्थाने वजन वाढण्याचा खाण्याची संबंध आहे. म्हणजे लौकिकाच्या अर्थाने वजन वाढले असेल तर मस्तपैकी खाता येते. म्हणजे घर भरता येते. माणूस खूप खातो अन् त्याच्या पोटाचा घेर वाढत असतो. आपले पंतप्रधान म्हणतात, ‘‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’’ अलिकडे तर कुणी तुमच्या घरी आला की, साधा चहादेखील ‘नको’ म्हणतो. चहा नको, न्याहारीदेखील नको. हा एक वेगळाच चमत्कार घडतो आहे. अस्मादिक अत्यंत अनियमितपणे नियमितता ठेवत सकाळी फिरायला जात असतात. कधी फिरायला गेलोच आपण तर आपल्यासारखेच अत्यंत अनियमित नियमित असणारे काही मित्र भेटतात. सांगतात, आता मी नेमाने फिरत असतो. मग सकाळी कसे फिरले पाहिजे, यावर एका ठिकाणी निवांत बसून चर्चा रंगते. किमान पाच किलोमीटर तरी फिरलंच पाहिजे यावर चांगली तासभर एका हॉटेलमध्ये बसून चर्चा होते. आता हॉटेलवाला काही नुस्ता बसू देत नाही अन् त्याच्या धंद्यावर त्याचं पोट आहे, या सामाजिक जाणिवेतून माणसं अत्यंत कनवाळूपणे पोटात (आपल्या) एक प्लेट आलुबोंडा तर्री मारके अन् चहा टाकतातच. बरे, यामुळे पोटाचा घेर वाढतोच आणि खिशाचा कमी होतो. थोडे हलके वाटतेच… आता मात्र, थोडे वेगळे घडते आहे. कसे? तर- तर परवा पुन्हा असाच हेल्थ कॉन्शसनेस जागा झाला. मग सकाळी उठलो अन् फिरायला निघालो. पुन्हा मित्र भेटला. त्याला विचारलं तर तो म्हणाला, मी गेला महिनाभर झाला नेमाने फिरतो आहे… ते खरेच दिसत होते. ही जगातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट होती. त्याहीपेक्षा जास्त आश्चर्यकारक गोष्ट आणखी घडली. मी त्याला, हॉटेलमध्ये चल म्हणालो तर तो म्हणाला की मी किमान पाच किलोमीटर फिरून आल्याशिवाय तिथे बसणार नाही… हा दुसरा धक्का होता अन् तिसरा धक्का- तर इम्रान खानने चौथ्या लग्नाला नकार दिला असता तेव्हाही बसला नसता इतका मोठा होता. त्याला म्हणालो की, ये फिरून मी थांबतो तिथे… तोवर गरम आलुबोंडे निघतात. तर मित्र म्हणाला की, नाही, मी काहीच खाणार नाही. त्याला विचारले, काही शुगरबिगर निघाली की काय? तर तो म्हणाला, निघाल्यावरच असे करायचे का? प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर… असे तो चक्क इंग्रजीत म्हणाला अन् दणादणा पावले टाकत चालला गेला… मराठी माणूस इंग्रजीत बोलतो तेव्हा तो खूपच कॉन्फीडन्ट असतो! …तर अलिकडे हे असे का होतेय् हे कळायलाच मार्ग नव्हता. घरी आलेली अन् बाहेरही भेटणारी मंडळी चहा नको म्हणतात. काही खा म्हटलं तर आधीच नाही असं सांगतात. किमान एक बिस्कीट खा म्हटलं तरीही नकार देतात… तसं दिसलं ते तोंडात टाकण्याची टेन्डसी असलेल्या माणसांनी खाण्याला अशी पेन्डसी कशापायी ठेवावी कळेना झालंय्. ही माणसं अचानक अशी का झाली? केवळ दोनच वेळा जेवायचं, त्याच्या पलीकडे काहीच खायचं नाही. अगदी चहादेखील नाही. चहा घेतलाच तर विना सारखेचा. म्हणजे तुमच्या घरी काही खास पदार्थ तयार केला असेल अन् मित्र आला, स्नेही आला अन् तुम्ही त्याला खा म्हणाला तर त्याला आवडत असतानाही तो ‘नाही’ म्हणतो. खूपच आग्रह केला तर तो डब्यात द्या, जेवणाच्या वेळी खाईन, असे म्हणतो. असे का विचारले तर सांगतात, ‘‘दीक्षित फॉलो करतो आहे.’’ दोन जेवणाच्या मध्ये काहीच खायचं नाही अन् त्यात किमान आठ तासांचं अंतर ठेवायचं, हे नवंच फॅड सध्या आलेलं आहे… हे नेमकं काय फॅड आहे, असे एका मित्राला विचारलं तर म्हणाला, ‘‘विनासायास वेट लॉस आहे हे अन् त्यात आपला काही लॉस नाही.’’, नाही. ‘दीक्षित फॉलो’ करणार्याला तुम्ही विचारलं रे विचारलं की मग तो तुम्हाला किमान पंचावन्न मिनिटे तरी सोडत नाही. तो विचारतो, तुमची उंची किती आहे? सांगितलं, १६५ सेटींमीटर. तो लगेच म्हणाला, वजन? ‘‘बहात्तर!’’ तर तो, सात किलो जास्तच आहे!, असं अत्यंत गंभीर चेहरा करून सांगतो. मग त्याचा फार्म्युलाही सांगतो, तुमच्या उंचीतून शंभर मायनस करायचे अन् जितके उरले तितके तुमचे जास्तीत जास्त वजन असले पाहिजे. ती लिमिट झाली! मग वेटलॉस या विषयावर तो बोलत राहतो. सगळ्यात सोपा उपाय, दोन वेळाच जेवायचे. त्या काळात काय खायचे ते खायचे. नंतर आठ तासांनी रात्रीचे जेवण. मध्ये काहीच खायचे नाही. सकाळी फिरायला जायचे. वजन कमी होतेच. माझे दोन किलो कमी झाले…, असेही सांगून टाकतो. मग तो इन्सुलीन, कार्बोहायड्रेटस्, ग्लुकोज, पेशी अन् असंच काय काय बोलत राहतो. तो काय बोलतो ते त्यालाही कळत नाही अन् आपल्याला कळण्याचे तसे काही कारण नसते. मग तो आपल्याला आपण अत्यंत अज्ञ असल्यागत सांगतो, ‘‘जरा जास्तच सायन्स आहे यात, तुला नाही कळणार…’’ इतके करून तो मग तुम्हाला तुमच्या व्हॉटस्अॅप वर डॉ. दीक्षितांचे भाषण देतो पाठवून. या डॉक्टर दीक्षितांनी बर्याच भानगडी सोप्या करून टाकल्या आहेत. आता घरी असो की दारी असो, चहाची आंदणं उकळत असतात. कुणी आले की चहा ठेवलाच जातो गॅसवर. आता येणारा आधीच सांगून टाकतो, दीक्षित… मग चहा नाही. त्यामुळे घरोघरी साखर, चहा, दूध यांची बचत होऊ लागली. घरटी एक दीक्षित फॉलो करणारा असल्याने निव्वळ दुधाचा- विनासाखरेचा चहा असतो. सकाळी चहा सोबत बिस्कीटं, खारी, ब्रेड असं काही असतं. मग नाश्ता होतो. त्यानंतही जेवणाच्या आधी थोडी भूक लागली की काहीतरी तोंडात टाकलेच जाते. आता ते बंद झाले आहे. पोट म्हणजे काही गार्बेज स्टेशन नाही, असे लोक म्हणू लागले आहेत. सकाळी चहा, नाश्ता, सायंकाळी पुन्हा नाश्ता-चहा यासाठी त्यांची कटकट बंद झाली. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाल्लं अगदी देवाचा प्रसाद जरी खाल्ला तरीही टुपकन् इन्सुलीनचं मापं पडलंच शरीरात… हे दीक्षित सांगतात, ते लोकांच्या डोक्यात फिरत राहतं. डॉ. श्रीकांत जिचकार व्हाया दीक्षित आता पुन्हा ‘फिटनेस मुव्हमेंट’ घेऊन फिरू लागले आहेत. देश आणि शरीर सुदृढ, निरोगी आणि स्वच्छ ठेवायचे असेल तर एकच फार्म्युला आहे, ‘न खाऊंगा, न खाने दुंगा!’
Short URL : https://tarunbharat.org/?p=64629