Home » अग्रलेख, संपादकीय » होय, संपूर्ण काश्मीर आमच्या बापाचेच!

होय, संपूर्ण काश्मीर आमच्या बापाचेच!

‘‘कहनी हैं एक बात हमे देश के पहरेदारोंसे
संभल के रहना अपने घर के छिपे हुए गद्दारोंसे!’’
विख्यात कविवर्य आणि गीतकार प्रदीप यांनी पाच दशकांपूर्वी या ओळी लिहून ठेवल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला यांच्या एका विधानाने या ओळींची आठवण ताजी झाली. जम्मूतील किश्तवार येथे भाषण करताना, ते असे बोलून गेले की, ‘‘कश्मीर तुम्हारे बाप का है क्या?’’ जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, असा प्रस्ताव संसदेत आल्यावर, याच अब्दुल्लांनी या प्रस्तावाचे समर्थन केले होते. पण, आता त्यांनी कोलांटउडी का घेतली? १९८६ साल. श्रीनगरमधील शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल हॉटेलच्या सभागृहात भारतातील सर्व पत्रकारांची परिषद भरली होती. त्या वेळी तेथे राष्ट्रपती राजवट होती. या परिषदेला संबोधित करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले होते, ‘‘कश्मीर हमारा हैं| अगर पाकिस्तानकी तरफसे जो गोली आएगी, उसे सबसे पहले मैं अपने छाती पर झेलूंगा|’’ नंतर कितीतरी वेळा त्यांनी पाकिस्तानविषयी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या व टीकाही केली होती. पण, आता तिथले राजकीय चित्र बदलले म्हणा की, यापुढे आपल्या हाती सत्ता येण्याची कोणतीही शक्यता नसल्याने म्हणा, ते आता पाकिस्तानला पूरक अशी भूमिका मांडत आहेत. त्यांच्या या विधानाचे पाकिस्तानी माध्यमांमध्ये स्वागत होत आहे, तर भारतात त्यांच्या या विधानाचा सर्व राजकीय पक्षांकडून धिक्कार होत आहे. पाकिस्तान खुश होईल, असे विधान करण्यामागे एकच कारण असले पाहिजे आणि ते म्हणजे खोर्‍यात आपली व्होट बँक पुन्हा निर्माण व्हावी! काय बोलले फारुख अब्दुल्ला? त्यांचे म्हणणे आहे की, बुरहान वानी याच्या रूपाने खोर्‍यात ठिणगी पडली. असंतोष तेथे आधीपासूनच धुमसत होता. भाषणात ते म्हणाले, ‘‘पाकव्याप्त काश्मीर ज्याला आपण गुलाम काश्मीर म्हणतो, तो भाग आपल्या ताब्यात घेण्याची भारताची एवढी ताकद तरी आहे का? काश्मीर ही काही तुमची पिढिजात मालमत्ता नाही, की ज्यावर तुम्ही दावा करू शकता. कश्मीर तुम्हारे बाप का हैं क्या? गेल्या सात दशकांपासून सुरू असलेला वाद मिटवायचा असेल, तर जम्मू आणि काश्मीर यांचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे व दोघांना स्वायत्तता द्यावी. काश्मीर प्रश्‍नावर पाकिस्तान हाही एक पक्ष आहे, कारण सध्या तो भाग त्यांच्या ताब्यात आहे. म्हणून भारत आणि पाकिस्तानने एकत्र बसून यावर तोडगा काढला पाहिजे.’’ असा बिनपैशाचा सल्ला त्यांनी दिला. यावर देशात प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. झी न्यूजवर या विषयावर एक चर्चा झाली. त्या चर्चेत रॉचे वरिष्ठ निवृत्त अधिकारी आर. एस. एन. सिंग, कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी, काश्मिरी असलेल्या आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करीत असलेल्या शबनम लोन, भाजपाचे प्रवक्ते रवींद्र रैना, नॅशनल कॉन्फरन्सचे नेता देवेंद्र सिंग राणा यांचा सहभाग होता. या चर्चेत राणा वगळता सर्वांनीच जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, हे ठामपणे बजावले. माजी रॉ अधिकारी सिंग यांनी फारुख अब्दुल्लांच्या ‘‘तुम्हारे बाप का हैं क्या?’’ या वाक्यावर तीव्र संताप व्यक्त करीत, ‘‘हां, कश्मीर हमारे बाप का हैं, सारे हिंदुस्तानियोंके बाप का हैं| आपने अगर बाप शब्द का प्रयोग किया है तो हमेभी आपके पुरखो का इतिहास बताना होगा!’’ अशा शब्दांत अब्दुल्लांना सुनावले. ‘‘फारुखजीने ये बताना चाहिये की, लडाख, जम्मू, लेह यहॉं तो कोई समस्या नही है| फिर सिर्फ घाटीमे ऐसा क्या हैं की वहॉं हमेशा अशांती रहती है? इसका कारण क्या है, यह अब्दुल्लासाहाब बताएं|’’ या चर्चेत शबनम लोन यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त करताना, ‘‘हम कश्मिरी, नॅशनल कॉन्फरन्स और कॉंग्रेस, दोनोके राजनीतीसे तंग आ चुके है| वहॉं दोनोंका शासन था उस वक्त वहॉंसे लोगोंको भागना पडा था तब तुम कहॉं थे? जिन्होने आजतक राजनीती के नाम पर खूनका खेल खेला, अब वो ये बात कह रहे हैं? नॅशनल कॉन्फरन्सके वक्त वहॉं कानून का राजही नही था| अब कुछ तो मजबुरियॉं रही होगी उनकी इसिलिये अब बाप का सवाल खडा किया जा रहा हैं|’’ शबनम लोन यांनी हेही सांगितले की, ‘‘मेहबूबा मुफ्ती यांची सत्ता काढून घ्या, त्यासुद्धा अब्दुल्लांसारखीच भाषा वापरतील. माझी मागणी आहे की, जी व्यक्ती वारंवार लंडनला जाते, तिची संपत्ती किती आहे, यावर एक श्‍वेतपत्र तयार केले पाहिजे आणि ते जाहीर केले पाहिजे.’’ हाच मुद्दा रॉ अधिकार्‍यानेही उचलून धरला. कॉंग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावर आक्षेप घेत, ‘‘कश्मीर हमारेही बाप का हैं| कश्मीर ये भारत मॉं का मुकुट हैं| वो हमारे पूर्वजोंका हैं|’’ अशा शब्दांत, ‘‘आम्ही देशासोबत आहोत,’’ याचा प्रत्यय दिला. भाजपाचे प्रवक्ते रैना म्हणाले की, ‘‘भारताच्या संविधानात जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, हे स्पष्टपणे नमूद आहे. पण, पाकिस्तानच्या संविधानात जम्मू-काश्मीरचा कोणताच उल्लेख नाही.’’ हे सांगून फारुख अब्दुल्लांना सडेतोड उत्तर दिले. नॅकॉचे राणा हे मूळ विषयाला धरून न बोलता केवळ अन्य वक्त्यांच्या भाषणात सतत अडथळे आणत होते. तात्पर्य हे की, एकीकडे पाकिस्तान सीमेवर सतत गोळीबार करीत आहे, तो बुरहान वानीला स्वातंत्र्यलढ्याचा सैनिक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात गौरवीत आहे, त्या पाकिस्तानला बळ मिळेल, भारतात जम्मू-काश्मीरबाबत मतभेद आहेत, हे जगजाहीर करण्याचे पाप फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. फारुख अब्दुल्लाने खोर्‍यातील हिंसाचाराबद्दल जी प्रतिक्रिया दिली, त्यावरून या हिंसाचारात तेल ओतण्याचे काम नॅकॉने केले असावे, असा संकेत मिळतो. त्यांनी बोलता बोलता हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून अचानक बाद केल्याबद्दल मोदींवर टीका केली. रॉ अधिकारी सिंह यांनी या चर्चेत बोलताना, असे अनेक मुद्दे मांडले, ज्यावर हा अंदाज बांधता येऊ शकतो की, काश्मिरातील हिंसाचाराला भडकवण्यात नॅशनल कॉन्फरन्सचाही हात असावा. राजकारणासाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे फारुख अब्दुल्ला यांनी दाखवून दिले. माणूस खालच्या पातळीपर्यंत जात असेल तर ते समजता येईल; पण देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी भाषा कुणी करीत असेल, तर अशा सापांना तेथेच ठेचले पाहिजे! आपल्या देशात असे अनेक लोक, संघटना समाजसेवेचा बुरखा पांघरून दहशतवादी, नक्षलवादी यांना छुपी मदत करीत असतात. अशा घरभेद्यांना हुडकून काढून जनतेसमोर यांची काळी कृत्ये जाहीर केली पाहिजेत. फारुख अब्दुल्लांच्या सभेत त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला हेही होते, हे विशेष! याचा अर्थ, त्यांचा आपल्या बापाच्या विधानाला पाठिंबा आहे. हे अस्तनीतील साप वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे!

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अग्रलेख, संपादकीय (213 of 284 articles)


  दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, सीमेवर व संसदेत अशा दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. सीमेवर ...