Home » सोलापूर » आजपासून जिल्ह्यात ९ न.प.साठी धुमशान

आजपासून जिल्ह्यात ९ न.प.साठी धुमशान

=२४ ते २९ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करणे=

district-solapur_mapविजयकुमार पिसे
सोलापूर, [दि. २३ ऑक्टोबर] – सोलापूर जिल्ह्यातील ९ नगर पालिका निवडणुकीचे आजपासून धुमशान सुरू होत असून २९ ऑक्टोबरपर्यंत नामांकनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचीही थेट निवडणूक होत आहे, त्यामुळे मिनी आमदारकी पटकावण्यासाठी चार नगरपालिकांमध्ये महिलादेखील पदर खोचणार आहेत.
या निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना यांची युती नाही, अशी घोषणा मुंबईत उध्दव ठाकरे यांनी केली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर सोपवले आहेत. परंतु आघाडी किंवा युतीबाबतचे अंतिम चित्र उमेदवारी माघारीनंतर स्पष्ट होईल. सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने या निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. शिवसेनेची युतीबाबत नेहमीच्याच रडीच्या डावामुळे मतदार कोणाच्या बाजूने आहे, याचा कल स्पष्ट होणार आहे. तर केेंद्र आणि राज्यात साफ धुळधाण उडालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी नगरपालिकांच्या निवडणुका अस्तित्वाच्या ठरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट आणि मैंदर्गीचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या घरातील महिला पुढे येत आहेत. तर दुधनीत अनुसूचित जाती गट आरक्षित झाल्यामुळे म्हेत्रे परिवाराला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच पंढरपूर, कुर्डुवाडी आणि करमाळ्यात खुल्या जागेसाठी नगराध्यक्षपद आहे, त्यामुळे तिथेही कमालीची चुरस राहणार आहे. पंढरपुरात परिचारक आणि भालके गटातच टशन असून पंढरीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपाला मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी सर्वात मोठी नगरपालिका असून तिला अ वर्ग दर्जा आहे. त्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट या ब दर्जाच्या तर दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, कुर्डूवाडी, करमाळा या क वर्ग दर्जाच्या नगरपालिका आहेत. ९ नगरपालिकांसाठी एकाच दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २८ तारखेला मतपेटीतून सत्ताधीश कोण याचा फैसला समजणार आहे. या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यात ३२९० मतदानकेंद्रे निश्‍चित केली आहेत. तसेच ३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांच्या संक्षिप्त पुन:रीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत 21 ऑक्टोबरपर्यंत होती.
निवडणूक खर्च मर्यादेत वाढ
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवाराला खर्चाची मर्यादा नगरपालिका दर्जानुसार वाढवून दिली आहे. ‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी ३ लाख, ‘ब’ वर्ग नगरपालिकांसाठी २ लाख, ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी १ लाख ५० हजारांची खर्च मर्यादा आहे. २०११ च्या निवडणुकीत अ, ब, क वर्ग नगरपालिकांसाठी फक्त ४५ हजारांची मर्यादा होती. यंदा ती तिप्पट केली आहे. हा दिलासादायक आहे.
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यांना निवडून आल्यानंतरच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद केली आहेे.

असा आहे ९ न.प. निवडणुकांचा कार्यक्रम :
२४ ऑक्टोबर – नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे.
२९ ऑक्टोबर – नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख.
२ नोव्हेंबर – प्राप्त अर्जांची छाननी.
२१ नोव्हेंबर – मतदानकेंद्राची यादी प्रसिध्दीकरण.
२१ नोव्हेंबर – मतदान.
२१ नोव्हेंबर-मतमोजणी व निकाल

प्रस्थापित नेतृत्वाचा कस
सद्यस्थितीत पंढरपुरात आ. भालके, करमाळ्यात जगताप, कुर्डुवाडीत शिवसेना, अक्कलकोट काँग्रेस, दुधनी व मैंदगीत म्हेत्रे, बार्शीत सोपल, सांगोला न.प. शेकाप-राष्ट्रवादी यांच्या ताब्यात आहे. प्रस्थापित नेतृत्वाचा येथे यावेळी कस लागणार आहे. नवीन समीकरणात प्रशांत परिचारक अलीकडेच आमदार झाले आहेत. करमाळ्यात सेनेचा आमदार आहे. कुर्डुवाडीत भाजपा सेनेचा वाढता प्रभाव आहे. सांगोल्यामध्ये पुन्हा आघाडीचेच समीकरण पुढे येईल. अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे आणि पाटील गट एक झाले तरी पक्षीय पातळीवर भाजपा काँग्रेसबरोबर मुकाबला करणार आहे. जिल्ह्यात सुभाष देशमुख आणि विजय देशमुख हे दोन मंत्री आहेत. शिवाय सोलापूरचे खासदारही दिमतीला आहेत. एकूण पाच लोकप्रतिनिधींंची ताकद यावेळी पणाला लागणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in सोलापूर (104 of 119 articles)


  =अक्कलकोट नगराध्यक्षपदासाठी 5 जण इच्छुक= प्रतिनिधी अक्कलकोट, [दि. २३ ऑक्टोबर] - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने चेतना प्राप्त केलेल्या ...