Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » इंदूर-पाटणा एक्सप्रेसला भीषण अपघात

इंदूर-पाटणा एक्सप्रेसला भीषण अपघात

♦११५ ठार, २००वर जखमी
♦दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
♦मृतकांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे साडेतीन लाख रुपये,
वृत्तसंस्था
कानपूर, २० नोव्हेंबर –

इंदूर-पाटणा (राजेंद्रनगर) एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरुन आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ११५ लोक ठार झाले असून,  २००वर प्रवासी जखमी झाले आहेत. अनेक जण गंभीर जखमी आहेत.  ही गाडी इंदूरहून पाटणा येथे जात होती. रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे कारण देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कानपूरमधील पुखरायान रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला.
दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली असून ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान साहाय्यता निधी, रेल्वे मंत्रालय, उत्तरप्रदेश शासन आणि मध्य प्रदेश सरकारने नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीस आणि  प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्याला सुरुवात झाली आहे. तसेच वैद्यकीय पथक देखील घटना स्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पोलीस महासंचालकांना या दुर्घटनेनंतरच्या मदतकार्यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. अपघातातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना कानपूरमधील खासगी रुग्णालयांना देण्यात आले असून तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिलेश यादव यांनी दिली आहे.
अपघातानंतर त्या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. घसरलेले डबे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अनेक गाड्या रद्द, मार्ग वळविले
इंदूर-पाटणा या मार्गावर धावणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर इंटरसिटी आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये  झांशी- लखनऊ , लखनऊ -झांशी,  झांशी-कानपूर पॅसेंजर, कानपूर-झांशी पॅसेंजर, झांशी-लखनऊ पॅसेंजर या  गाड्यांचा समावेश आहे. तर लांबपल्यांच्या मार्गावर धावणार्‍या  लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर एक्स्प्रेस आणि राप्ती सागर एक्स्प्रेस या गाड्या आगरा आणि कानपूर मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी इटारसी मार्गावरुन धावणार आहे.

मला वडिलांना शोधायचे आहे!
इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघात झाल्याने  २० वर्षांच्या रुबी गुप्तावर दु:खाचा पहाड कोसळला आहे. रुबीचा विवाह १ डिसेंबरला होणार आहे. याच विवाह सोहळ्यासाठी रुबी इंदूरहून आझमगढमधील एका गावाला जात होती. रुबीचे वडील अपघातानंतर बेपत्ता झाले असून रुबीच्या एका हाताचे हाड अपघातात मोडले आहे. ती आपल्या वडिलांचा अशाही अवस्थेत शोध घेत आहे. रुग्णालय आणि शवागारात जाऊन वडिलांचा शोध घेण्यास तिला अनेकांनी सांगितले. मला काही समजेनासे झाले असून मला माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा आहे, असे डोळे पाणावलेल्या रुबीने सांगितले.

डब्यात अडकलेल्या प्रवाशांचा आक्रोश
अपघातानंतर ढिगार्‍याखाली अनेक प्रवासी अडकलेे आहेत. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही डब्यांमध्ये अडकलेले लोक मदत मागत आहेत. त्यांचा आक्रोश जीव पिळवटून टाकणारा होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. डबे कापण्यासाठी इंजीनिअर्सचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. काही डबे गॅस कटरने कापून वेगवेगळे करण्यात आले आहेत. तीन डबे एकमेकांमध्ये घुसले असून बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डबा घसरुन शेतात घुसला!
या गाडीतील एक प्रवासी राजकुमार म्हणाले, आम्ही झोपेत असतानाच पहाटे मोठ्‌ठा आवाज झाला. खिडकीतून बाहेर बघितले, तर आमचा डबा एका शेतात उभा होता.पूर्णपणे चेपलेल्या या डब्यात गोंधळ उडाला होता. बाहेर मदतीची याचना करीत प्रवासी इकडे-तिकडे धावत होते. आम्ही डब्यातून निघून शेतात आले होते. अंधार असल्याने आम्हाला काहीच दिसत नव्हते.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google