Home » छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य » केएलएफचा म्होरक्या मिंटूला दिल्लीत अटक

केएलएफचा म्होरक्या मिंटूला दिल्लीत अटक

=पाच साथीदारांचा शोध सुरूच=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
klf-chief-harminder-singh-mintoo-arrested-from-railway-station-in-delhiपंजाबच्या पटियाळा येथील नाभा मध्यवर्ती कारागृहातून आपल्या पाच साथीदारांसह पळ काढणारा खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याला पंजाब आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सोमवारी पहाटेच्या सुमारास दिल्ली रेल्वे स्थानकावर जेरबंद केले. त्याच्या पाच साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके देशभरात रवाना करण्यात आली आहेत.
रविवारी सकाळी सुमारे १० बंदुकधार्‍यांनी नाभा कारागृहावर हल्ला करून मिंटू आणि त्याच्या पाच साथीदारांना पळ काढण्यात मदत केली होती. यानंतर लगेच पंजाब, हरयाणा आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवरही बारीक नजर ठेवण्यात आली होती. आज पहाटेच्या सुमारास मिंटू दिल्लीतील निझामुद्दिन रेल्वे स्थानकावर आला असता, तिथेच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या, अशी माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त अरविंद दीप यांनी दिली.
मिंटू हा दिल्लीकडे जात असल्याची गोपनीय माहिती पंजाब पोलिसांना रविवारी सायंकाळीच मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती आणि दिल्ली पोलिसांनाही सतर्क केले होते.
नाभा जेल ब्रेक प्रकरणात अवघ्या काही तासांतच झालेली ही दुसरी मोठी अटक आहे. मिंटू आणि अन्य पाच कैद्यांना पळून जाण्यात मदत करणार्‍या परमिंदर सिंग याला रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेशच्या शामली येथे तो कारने जात असताना, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या कारमधून रायफली, अन्य शस्त्रे व स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला होता.
दरम्यान, त्याच्या अन्य साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम उघडली असून, गुप्तचर यंत्रणांचीही यात मदत घेण्यात येत आहे. या कैद्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
कर्नाल, पानिपतकडे पळाले
मिंटूसोबत ज्या पाच कैद्यांनी कारागृहातून पळ काढला, ते कर्नाल आणि पानिपतकडे गेले असल्याची माहिती रविवारी दुपारी शस्त्रांसह अटक करण्यात आलेला जेल ब्रेकचा सूत्रधार परमिंदरने पोलिसांना दिली. माझ्यासोबत आणखी सात जण या जेल ब्रेकमध्ये सहभागी होते. मी आतापर्यंत डेहराडून येथील एका गुप्त ठिकाणी लपलो होतो. उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब यासारख्या राज्यांमध्ये मादक पदार्थाच्या तस्करीतही माझा सहभाग राहिला आहे, असेही तो म्हणाला. पंजाब पोलिस दलातील निरीक्षक गुरुदेव यांच्या हत्येत तो आरोपी असून, तेव्हापासूनच तो फरार होता.
हरयाणात बेवारस कार आढळली
हरयाणाच्या कैथाल जिल्ह्यातील एका गावात आज सकाळी आणखी एक बेवारस कार आढळून आली. जेल ब्रेकमधील आरोपींनी पळ काढण्यासाठी या कारचा वापर केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईहून गोव्याला पळ काढणार होता
दिल्लीहून रेल्वेगाडीने मुंबईत जाण्याची आणि तिथून गोव्याकडे पळ काढण्याची योजना मिंटूने आखली होती, अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली. दिल्लीतील रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली, तेव्हा तो ओळखायलाच आला नाही. त्याने आपली वेशभूषा पूर्णपणे बदलली होती. त्याच्याजवळून पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
मिंटूला सात दिवसांची कोठडी
दिल्ली रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मिंटूला स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पंजाब पोलिसही त्याला परत नेण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हर, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google