Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » कोळसा घोटाळा प्रकरणी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

कोळसा घोटाळा प्रकरणी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

coal-scamनवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – छत्तीसगडमधील फतेहपूर (पूर्व) कोलब्लॉक वाटपात झालेल्या घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने आज सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र निश्‍चित केले.
या सहा जणांत माजी खा. विजय दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा व के. सी. सामरिया आणि मे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोज कुमार जयस्वाल व त्यांची फर्म यांचा समावेश आहे. विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांच्या कोर्टाने हे दोषारोप ठेवले.
या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या १२०(ब) -फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान, ४०९-सरकारी नोकराकडून फौजदारी स्वरूपाचा विश्‍वासघात आणि ४२०-फसवणूक या भादंवि आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमांचा समावेश आहे.
गेल्या २० ऑगस्ट २०१५ रोजी सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. ही केस बंद करावी, असा अहवाल सीबीआयने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी कोर्टाला सादर केला होता. हा अहवाल फेटाळून, या प्रकरणी आणखी तपास करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. या खटल्याची आगामी सुनावणी येत्या १६ डिसेंबरला होणार आहे.
सोरेन, राव यांनाही आरोपी करण्याची मागणी फेटाळली
याच प्रकरणात माजी कोळसा मंत्री शिबू सोरेन आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासारी नारायण राव यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयाने फेटाळून लावली.
ही मागणी कोळसा घोटाळ्यातील एक आरोपी मे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. ने केली होती. मागणी फेटाळताना न्यायालयाने याचिकाकर्त्यावर एक लाख रुपयांचा दंड बसवून ही रक्कम दिल्ली विधि सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी, असे आदेश दिले आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google