Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गंगेत नोटा टाकून पाप धुतले जात नाही

गंगेत नोटा टाकून पाप धुतले जात नाही

♦काळा पैसेधारक झोपेच्या गोळ्या घेत आहेत
♦पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल,
वृत्तसंस्था
गाझीपूर, १४ नोव्हेंबर –
narendra-modi-and-bhutan-gaffe५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर काळा पैसा साठवणारे लोक या नोटा कचर्‍याच्या पेटीत आणि गंगा नदीत टाकत आहेत. पण, गंगेत नोटा टाकून त्यांचे पाप धुतले जाणार नाही. अनेक लोकांची तर झोपच उडाली असून, ते आता झोपेच्या गोळ्या खात आहेत, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी येथे चढवला.
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे रेल्वे प्रकल्पाचे उद्‌घाटन मोदी यांनी केले. यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्यपाल राम नाईक यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या परिवर्तन रॅलीला पंतप्रधान संबोधित केले.
माझ्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात त्रास होत असला, तरी त्यांना सुखाची झोप येत आहे, त्याचवेळी काळा पैसा असणारे लोक झोपेच्या गोळ्या खात आहेत. जास्त मूल्यांच्या नोटा बंद झाल्याने नागरिकांची पैसे बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. पण तुमच्याच भल्यासाठी मी प्रत्येक काम करीत आहे. या त्रासाची परतफेड मी विकासाच्या स्वरूपात करणार आहे. तुम्ही मला देशातील सर्व काळा पैसा संपविण्याचे आदेश दिले होते. याच उद्देशाने तुम्ही मला देशाची सूत्रे सोपवली  होती. मग, मी जे करीत आहे, ते चुकीचे आहे का, असा सवालही पंतप्रधानांनी केला.

माझा निर्णय थोडा कडकच आहे
फार पूर्वी मी चहा तयार करीत होतो. लोक मला सांगायचे, चहा जरा कडक कर आणि त्यासाठी मी काही उपाय करीत होतो. तसाच कडक उपाय आता मी काळा पैसा असणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी केला आहे. तुमचा पैसा बँकांमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. आता तर महिलांच्याही खात्यात त्यांंच्या घरच्यांनी अडीच लाख रुपये भरल्याचे दिसून आले आहे. अडीच लाख कुठून आले, हा प्रश्‍न माझे सरकार विचारणार नाही. पण, ज्यांच्याजवळ कोट्यवधी रुपये आहेत, त्यांना मात्र सोडणार नाही, असा इशारा त्यांनी  दिला. ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करून मी तुमच्या कल्याणाचेच काम करीत आहे. हा निर्णय गरीब, गाव, शेतकरी आणि देशाच्या हिताचा आहे. या निर्णयामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरकच दूर करून टाकला आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

आणिबाणीचा काळ आठवा
कॉंगे्रसने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी १९७५ मध्ये देशात आणिबाणी लादली होती. असंख्य सर्वसामान्यांना १९ महिनेपर्यंत तुरुंगात डांबले होते. रात्रभर पोलिसांच्या गाड्या गल्लोगल्ली फिरत होत्या. वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद केले होते. या काळात संपूर्ण देशच कारावासात होता. त्यामुळे नोटांच्या बंदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍या कॉंगे्रसने आधी आणिबाणीवर उत्तर द्यावे, अशी जोरदार चपराकही मोदी यांनी हाणली.
संयम बाळगा, सर्व सुरळीत होईल
जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्यांच्या जागी मुबलक प्रमाणात नव्या नोटा चलनात आणण्यासाठी काही वेळ लागेल. आणखी काही दिवस हा त्रास सहन करा. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी हमी देखील मोदी यांनी यावेळी दिली.
नेहरूंचे काम पूर्ण करणार
ताडीघाट पुलाचा उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात १९६२ मध्ये झाला होता. पं. नेहरू यांच्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेलीत, नेते आले आणि गेले, पण गंगा नदी पार करण्यासाठी कोणतीही व्यवस्था झाली नाही. २०१६ पर्यंत या पुलाचे काम सुरू झाले नाही. पण नेहरूंच्या जयंतीदिनी त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यास मी सुरुवात केली आहे. ते काम वेळेत पूर्ण करून दाखवेन, असे मोदी म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google