Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » घोटाळ्यात गुंतलेला पक्षच नोटाबंदीला विरोध करतोय

घोटाळ्यात गुंतलेला पक्षच नोटाबंदीला विरोध करतोय

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर –
arun-jaitly-in-rajyasabhaकाळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या निर्णयावर सरकार ठाम असून विरोधकांना फक्त कामकाजात अडथळा आणायचा आहे. एकेकाळी घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या पक्षाकडूनच आता नोटाबंदीला विरोध होतो आहे, या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जेटलींनी आपली भूमिका मांडली.
अरुण जेटली म्हणाले, विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधात गोंधळाचे प्रमाण जास्त होते आणि वास्तविकता कमी होती. मुळात विरोधकांना कोणतीही चर्चाच करायची नाही. पहिल्या दिवशी नोटाबंदीवर कोणत्याही पूर्व अटींविना चर्चा झाली.
मिशन डिजिटल बँकिंग
बँकांनी डिजिटल बँकिंगला ‘मिशन’ समजून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी केले. प्रत्यक्षातील चलनाचा उपयोग कमी-कमी करत नेण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँक प्रमुखांची बैठक आज गुरुवारी जेटली यांनी दिल्लीत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

उद्योग आणि जीडीपीवर विपरीत परिणाम
केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा सकल राष्ट्रीय उत्पन्न दर दोन टक्क्यांनी कमी होईल, असा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज गुरुवारी येथे दिला. ते गुरुवारी राज्यसभेत नोटाबंदीवरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीसंदर्भातील कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
मनमोहन सिंग म्हणाले, केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल कोणताही आक्षेप नाही. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारकडून अक्षम्य चुका आणि हलगर्जीपणा झाला आहे. आमचा विरोध या गोष्टीस आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे व्यवस्थापन चुकले आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे संघटित लूट आहे. या निर्णयामुळे देशातील शेती, लघुउद्योग आणि असंघटित क्षेत्राला मोठा ङ्गटका बसून त्याचा विपरीत परिणाम देशाच्या जीडीपीवर होईल.
अनेकजण जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दीर्घकालीन फायद्याचा आहे, असे म्हणत आहेत. ते ज्या दीर्घकाळाबद्दल बोलत आहेत तेव्हा आपण सगळे या जगात नसू. आपला मृत्यू झालेला असेल, अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली. मला पंतप्रधानांनी जगातील असा एक देश दाखवावा, जेथे लोकांना बँकेत स्वत:चे पैसे भरता येतात, मात्र काढता येत नाहीत. सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा बँकिंग प्रणालीवरील विश्‍वास उडेल.
सहकारी बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी घालण्याच्या निर्णयावरही सिंग यांनी यावेळी टीका केली. सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात व्यवहार करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील लोकांच्या हातात पैसा उरलेला नाही.  त्यामुळे सरकारने व्यावहारिक तोडगा काढायला हवा, असे मनमोहन सिंग म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google