Home » छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » टाटा-मिस्त्री वाद न्यायालयात

टाटा-मिस्त्री वाद न्यायालयात

=उद्योगजगतात शह-प्रतिशह!=
ratan-tata-syrus-mistryमुंबई/नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर उद्योगजगतात शह-प्रतिशहाने वातावरण ढवळून निघाले आहे. टाटा यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यांच्याकडे मिस्त्रींविरुद्ध कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. मिस्त्री यांनी कारवाईविरुद्ध कुठलेही पाऊल उचलण्यापूर्वी, आपलेही म्हणणे संबंधित न्यायालय आणि लवाद यांनी ऐकून घ्यावे, यासाठी टाटांतर्फे हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आपणाकडून कुठलाही कॅव्हेट दाखल करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण सायरन मिस्त्री यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आले.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना सोमवारी नाट्यमय घडामोडीनंतर हटविण्यात आले. त्यांच्या जागी चार महिन्यांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून ७८ वर्षीय रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थैर्य आणि सातत्य कायम राहिले पाहिजे. या बाबींअभावी कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये, यासाठी मी हंगामी अध्यक्षपद स्वीकारले आहे, अशी भूमिका रतन टाटा यांनी आज मंगळवारी कंपनीच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांपुढे मांडली. संबंधित बाजारपेठेचे नेतृत्व करा आणि समभागधारकांना अधिकाअधिक परतावा कसा देता येईल, याकडे लक्ष ठेवा, असे त्यांनी यावेळी समूहातील वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितले.
सन २०२२ पर्यंत टाटा समूहाची उलाढाल ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मिस्त्री यांना टाटा अपेक्षेनुरूप कामगिरी बजावता आली नाही, असे म्हटले जाते. शापूरजी पालोनजी या कंपनीच्या शिफारसीवरून सायरन मिस्त्री यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. टाटा सन्सचे सर्वाधिक समभाग या कंपनीकडे आहेत, हे विशेष.
बदलांची चिंता करू नका : रतन टाटा
व्यवसायावर लक्ष केंद्रीत करा. वरिष्ठ पातळीवर बदलांची चिंता करू नका, असे आवाहन रतन टाटा यांनी टाटा समूहातील कंपन्यांना उद्देशून केले आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचे त्यांचे हे पहिलेच आवाहन आहे, हे विशेष. आपली निवड ही अल्प काळासाठी असून लवकरच टाटा समूहाला नवे नेतृत्व मिळणार आहे, असे ते म्हणाले.
दिवसभर कॅव्हेट नाट्य!
मंगळवारी दिवसभर ‘कॅव्हेट नाट्य’ बघायला मिळाले. प्रारंभी, मिस्त्री यांनी कॅव्हेट दाखल केल्याची बातमी उद्येगजगतात पसरली. रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरुद्ध हे कॅव्हेट दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी मात्र, मिस्त्री यांच्या कार्यालयातर्फे ‘कॅव्हेट नाही’, असे स्पष्टीकरण जारी करण्यात आले.
शेअर्समध्ये घसरण
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्याने टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम झाला. कंपनीच्या समभागांची घसरण झाली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तीन टक्के तर टाटा मोटर्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली. ‘निफ्टी’वर टाटा स्टील, टाटा पॉवर यांच्या समभागांना फटका बसला.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google