Home » छायादालन, ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » तुरुंगातून पळालेल्या ८ सिमी अतिरेक्यांचा खात्मा

तुरुंगातून पळालेल्या ८ सिमी अतिरेक्यांचा खात्मा

=भोपाळमध्ये ‘जेलब्रेक’, मालीखेडा येथे भीषण चकमक=

8 SIMI terrorists who escaped Bhopal Central Jail killed in encounterभोपाळ, [३१ ऑक्टोबर] – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका सुरक्षा रक्षकाला ठार करून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास पळ काढणार्‍या सिमी या पाकधार्जिण्या संघटनेच्या आठ अतिरेक्यांना सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी भीषण चकमकीत ठार मारले.
सिमीच्या ८ अतिरेक्यांनी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळ काढला होता. पोलिस रक्षक रमा शंकर याने त्यांचा पळण्याचा कट हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असता, अतिरेक्यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. यात हा सुरक्षा रक्षक जागीच ठार झाला. त्यानंतर अतिरेक्यांनी अनेक चादरी एकमेकांना बांधल्या आणि कारागृहाच्या भिंतीवर चढून पळ काढला.
या घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भोपाळ आणि राज्यातील काही शहरांमध्ये पोलिस व सुरक्षा जवानांना सतर्क करण्यात आले. पळून जाणार्‍या सर्वच मार्गांची नाकेबंदी करण्यात आली आणि प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू झाली.
चार अधिकारी निलंबित
सिमी अतिरेक्यांनी पळ काढल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत राज्याच्या गृहमंत्रालयाने या सर्व अतिरेक्यांचे रेखाचित्र जारी केले आणि कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह चार अधिकार्‍यांना निलंबित केले. या अधिकार्‍यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अतिरेक्यांबद्दल माहिती देणार्‍यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
सुगावा मिळाला
सिमीचे अतिरेकी कोणत्या मार्गाने पळाले, याबाबतची माहिती काही गावकर्‍यांकडून पोलिसांना मिळाली आणि पोलिस व सुरक्षा जवानांनी श्‍वानपथकाच्या मदतीने त्यांचा मागोवा घेतला. भोपाळला अगदी लागून असलेल्या मालीखेडा येथे या अतिरेक्यांना पोलिस व जवानांनी चहूबाजूंनी घेतले आणि शरण येण्याचे आदेश दिले. पण, अतिरेक्यांनी गोळीबार केला असता त्यांना गोळीबारानेच प्रत्युत्तर देण्यात आले आणि या चकमकीत सर्व आठही अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. अमजद, झाकिर हुसैन सिद्दिकी, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, मोहम्मद खालिद, अकील व माजिद अशी या अतिरेक्यांची नावे आहेत.
केंद्राने मागवला अहवाल
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना फोन करून या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले. कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे काय आणि भविष्यात अशा  घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतची संपूर्ण माहिती यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
एनआयए करणार तपास
या संवेदनशील घटनेचा तपास राष्ट्रीय सुरक्षा संस्था अर्थात एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. राज्य पोलिस त्यांच्या पातळीवर तपास करणार असले, तरी एनआयए संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
दुसरी घटना
सिमीच्या अतिरेक्यांनी मध्यप्रदेशातील कारागृहातून पळ काढण्याची मागील तीन वर्षांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर २०१३ रोजी मध्यप्रदेशच्या खांडवा येथील मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या सात अतिरेक्यांनी पळ काढला होता. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून त्यांना अटक करण्यात आली होती.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google